सोमवार, 9 जनवरी 2012

एकदा एकहाती संधी द्या - राज ठाकरे

प्रतिनिधी , मुंबई
altगेल्या ५० वर्षांत राजकारण्यांनी महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान केले आहे. एकदा मला संधी द्या. अपयशी झालो तर पन्नास-पंचावन्न वर्षे फुकट गेली म्हणून समजा. माझ्याकडे सर्व गोष्टींचा ‘तोड’ गा आहे. माझे इंजिन केवळ आत्मविश्वासावर धावत आहे. एकदा एकहाती संधी देऊन तर पाहा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. लोकमान्य सेवा संघ श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालय आणि मॅजेस्टिक बुक डेपो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मॅजेस्टिक गप्पांमध्ये संजय मोने आणि प्रशांत कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ही मुलाखत ऐकण्यासाठी लोकसेवा संघाच्या मैदानात प्रचंड गर्दी जमा झाली होती.
गेल्या पन्नास वर्षांमध्ये महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे. मिळतील तेवढे पैसे ओरबाडण्याचे काम चालू आहे. मुंबई सुधारण्याचे सर्व तोडगे माझ्याकडे आहेत. प्रथम तुम्ही तोडगा तर स्वीकारा, असे ते म्हणाले.
पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या परीक्षांसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, पालिकेत निवडून जाणारे नगरसेवक सक्षम असले पाहिजेत म्हणून हा खटाटोप केला. नगरसेवक, आमदारांची आणि खासदारांची कर्तव्ये काय आहेत, हे सर्वाना माहीत असायला हवे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी हिंदू मिलची जागा मिळावी, याकरिता गोंधळ सुरू आहे. निवडणुका जवळ आल्या की असे मुद्दे उपस्थित होतात. आणि निवडणुका पार पडल्या की त्यांचे विस्मरण होते, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील नेते देशाचा विचार करतात, तर इतर प्रांतांतील नेते आपापल्या प्रांतांचा विचार करतात. त्यामुळे आता आपण सर्वानी महाराष्ट्राचा विचार करण्याची वेळ आली आहे. बेळगाव प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, वर्षांतून एकदा सत्यनारायणाची पूजा घालावी, तसा हा प्रश्न हाताळला जात आहे. बेळगाव-निपाणीसारखी आदी शहरे महाराष्ट्रात आली तर त्याने काय फरक पडणार आहे, तिथली २५ लाख माणसे इथे आली तर पस्तावतील. येथे रामराज्य आहे का, असा सवालही त्यांनी केला.
असामान्य व्यक्तींनी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे वागू नये. एक कलाकार म्हणून अमिताभ बच्चन यांनी देशाच्या सीमाही ओलांडल्या. प्रांताची भाषा त्यांनी करू नये, असेही ते म्हणाले. पेडर रोडचा पूल होऊ नये, यासाठी तेथील रहिवासी लतादीदी आणि आशा यांना पुढे करीत आहेत, असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्र श्रोत्यांच्या साक्षीने रेखाटले. तत्पूर्वी ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांना गेल्या काही वर्षांमध्ये मी पाहिलेले नाही. त्यावर एका मुलाखतकाराने सांगितले की, मग तुमच्या हृदयातील बाळासाहेब साकारा, या प्रतिप्रश्नामुळे भावूक झालेल्या  राज ठाकरे यांनी मार्कर घेऊन कॅनवासवर शिवसेनाप्रमुखांचे व्यंगचित्र रेखाटले.

1 टिप्पणी: