मंगलवार, 21 फ़रवरी 2012

'मनसे'च्या पर्यायावर मतदारांची मोहोर

'मनसे'च्या पर्यायावर मतदारांची मोहोर
विष्णू सोनवणे - सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 21, 2012 AT 03:45 AM (IST)


मुंबई - मुंबई महापालिकेत महायुतीला बहुमत मिळाले असले, तरी खणखणीत पर्याय म्हणून लोकांनी मनसेला स्वीकारले आहे. मुख्य राजकीय पक्षांना मतदान करणाऱ्या मतदारांनी या वेळी 28 जागांवर मनसेच्या बाजूने कौल दिला. 2007 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीच्या तुलनेत अडीच लाख इतके मताधिक्‍य मनसेला मिळाले आहे. सर्वच राजकीय पक्षांची नकाराची मते पर्याय म्हणून मनसेकडे वळली असल्याचे यावेळच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मनसेचा फटका या वेळी सर्वच राजकीय पक्षांना बसला आहे.

मनसेने 2007 मध्ये 221 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी सात नगरसेवक निवडून आले होते. त्या निवडणुकीत मनसेने चार लाख 38 हजार मते मिळविली होती. मनसेचा सर्वाधिक फटका त्या वेळी शिवसेनाला बसला होता; मात्र या वेळी मनसेच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तब्बल सहा लाख 40 हजार मते मिळवून मनसेने 28 जागा जिंकल्या आहेत. 52 जागांवर मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला. सर्वच राजकीय पक्षांना मनसेने ब्रेक लावला. राज ठाकरे यांचा तरुणांवर असलेला प्रभाव या वेळीही कायम राहिला असला, तरी तरुणांचे मतदानाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. राज यांच्या भाषणाच्या प्रभावाने तरुण, दलित, मुस्लिम, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांनी मनसेच्या पारड्यात भरभरून मते टाकली. या मतदारांच्या मोठ्या रांगा मतदान केंद्रांवर होत्या. या मतदारांनी मनसे हा पर्याय निवडल्याचे दिसून आले. शिवसेनेसह, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाची मतेही या वेळी मनसेला मिळाली. दलित आणि मुस्लिमांचे प्राबल्य असलेल्या अनेक मतदारसंघात मनसेने उमेदवार दिले होते. तेथेही मनसेला चांगली मते मिळाली.

नगरसेवकपदाची तिसरी-चौथी टर्म पूर्ण करणाऱ्या प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांच्या संस्थानांना मतदारकंटाळले होते. मराठीचा मुद्दा, त्यानंतर सतत बदलत गेलेल्या राज ठाकरे यांच्या भूमिका यामुळे मनसेच्या मतांवर परिणाम झाला नाही; किंबहुना विखुरलेल्या दलित आणि मुस्लिम समाजाचा मतदारही मनसेकडे आकृष्ट झाला. तरुणांची 70 टक्के मते मनसेला पडली. दादर, भांडुप, मुलुंड, घाटकोपर, विक्रोळी, चांदिवली, अंधेरी, मागाठणे, दहिसर, गिरगाव या भागांतून मनसेचे बुलंद गड निर्माण झाले आहेत.

शिवसेनेची मते मनसेला महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आलेल्या 29 जागांपैकी फक्त एकच जागा त्या पक्षाला मिळाली. या निवडणुकीतील पराभव रामदास आठवले यांच्या जिव्हारी लागला आहे. कॉंग्रेसला पालिकेच्या सत्तेपासून रोखण्याचे काम आरपीआयने केले, हे निकालाने दाखवून दिले आहे; मात्र शिवसेना आणि भाजपची मते आरपीआयला न मिळता ती मनसेला मिळाली, हे आरपीआयच्या पराभवाचे कारण ठरले आहे; मात्र ती मते आरपीआयकडे का वळली नाहीत, याबद्दल आता आत्मपरीक्षण करणे आठवलेंना भाग आहे. किंबहुना या निकालाने आठवलेंना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें