शनिवार, 18 फ़रवरी 2012

सत्तेसाठी लाचारी नाही - राज ठाकरे

सत्तेसाठी लाचारी नाही - राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 19, 2012 AT 04:00 AM (IST)
  
पुणे - 'अन्य कोणत्याही पक्षाच्या यार्डात "मनसे'चे इंजिन जाणार नाही; आता त्यांच्याबरोबर गेलो तर पाच वर्षानंतर कोणाला तोंड दाखवू ? सत्तेसाठी लाचारी पत्करणार नाही,'' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी आपली भूमिका स्पष्ट केली.

'पुणेकरांनी दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी मी आणि माझे नगरसेवक जबाबदारीने काम करू. पुण्यात विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी तांत्रिक बाबी पाहाव्या लागतील. मात्र, पुण्यात पुढील पाच वर्षांत "मनसे' हा विरोधी पक्षाची भूमिका उत्तम प्रकारे बजावेल. प्रशासनावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी मी आणि माझे नगरसेवक पार पाडतील'' असे राज यांनी नमूद केले.

राज यांनी आज पुण्यात येऊन "मनसे'च्या नगरसेवकांची भेट घेतली. त्या वेळी "कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही,' असे राज यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ते म्हणाले, 'निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढायचे आणि सत्तेसाठी परत प्रतिस्पर्ध्यांशी जुळवून घ्यायचे, हे प्रकार मतदार फार काळ खपवून घेणार नाहीत. मी कोणासोबतही जाणार नाही. आज त्यांच्यासोबत जाऊन पाच वर्षांनंतर कोणाला तोंड दाखवू? या तडजोडी करणे मला पटत नाही. स्वत:चे आणि पक्षाचे काही मत आहे की नाही? मतदारांनी जबाबदारी सोपविली असल्यामुळे काम हे करून दाखवावेच लागणार आहे. निवडणुकीत उभे राहता, मते मागता आणि निवडून येता; मग काम तर करायलाच पाहिजे.''

'प्रचारसभा अधिक घेतल्या असत्या तर जागा निश्‍चित वाढल्या असत्या,'' असे सांगून ""मी पिंपरी-चिंचवड महापालिकेतही लक्ष घालणार आहे,'' असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथे पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करून राज म्हणाले, 'पुण्यातील निकाल हा अनपेक्षित आणि भारावून टाकणारा आहे. "हेही नको' आणि "तेही नको' म्हणून काही "मनसे'ला मते मिळालेली नाहीत. एक सक्षम पर्याय म्हणून पुणेकरांनी "मनसे'कडे पाहिले आहे. पुण्यातील पायाभूत सुविधा व्यवस्थित मिळण्यासाठी "मनसे'चा अंकुश सत्ताधाऱ्यांवर, प्रशासनावर राहील. आमची जबाबदारी वाढली असून, काम करून दाखवावेच लागणार आहे.''

सोलापूर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या राजीनाम्यांबाबत "नाराजी असतेच' एवढेच मत राज यांनी मांडले.
'निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांतील माणसे फोडण्याचे प्रकार योग्य नाहीत; तुमच्याकडे चांगली माणसे नाहीत का?'' असा सवालही राज यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना केला.

'निर्णय मुनगंटीवार घेतात' नाशिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरे म्हणाले,
'मी तेथील परिस्थितीची माहिती घेतलेली नाही. उद्या तेथे जाणार आहे. त्यानंतरच पुढील निर्णय घेईन.''
'मनसे'ला पाठिबा देणार नाही,' असे विधान भारतीय जनता पक्षाचे विनोद तावडे यांनी केल्याबाबत राज म्हणाले, 'तावडे असे काही बोलले असतील तर ते माझ्या कानावर आलेले नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे भाजपचे निर्णय सुधीर मुनगुंटीवार घेतात; तावडे नव्हे.''

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें