बुधवार, 15 फ़रवरी 2012

मुंबईतील मराठी मतदार कोणाला साथ देणार?

मुंबईतील मराठी मतदार कोणाला साथ देणार?
राजेश मोरे - सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, February 16, 2012 AT 12:49 AM (IST)
मुंबई - शेवटच्या सभेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमकपणा कायम ठेवला. मात्र त्याच वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र आक्रमकपणापासून सुरुवात करून भावनिक आवाहनात आपल्या प्रचार भाषणांची इतिश्री केली. मुंबईतील मराठी मतदार मात्र बाळासाहेबांच्या भावनिक आवाहनाला साद देतो की, राज यांच्या आक्रमकपणाला कौल देतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेच्या शेवटच्या सभेत राज यांच्या विरोधात एकही वाक्‍य उच्चारले नाही. पण त्याच वेळी राज यांनी मात्र स्वपक्षातील नेत्यांनाच "मर्दा'सारखे वागण्याचा आदेश बाळासाहेबांनी द्यावा, असे आवाहन करून आपला आक्रमकपणा कायम ठेवला.

ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या "करून दाखवलं' या कॅम्पेनवर टीकेची झोड उठवून त्याची यथेच्छ टिंगल केली होती. "वरून दाखवलं' असा टोलाही त्यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हवाई छायाचित्रणाच्या आवडीला उद्देशून मारला होता. या टीकेची दखल घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत राज यांना नकला करण्याऐवजी "मर्दा'सारखे समोर येण्याचे आवाहन केले. पण मुंबईतील वांद्रा-कुर्ला संकुलातील सभेत आपण ते मर्दासारखे वागण्याचे वाक्‍य राज यांना उद्देशून बोललोच नसल्याचा ओझरता उल्लेख बाळासाहेबांनी केला. राज यांचा उल्लेख न करता, मी ते वाक्‍य त्याच्यासाठी बोललो नसून आघाडीच्या नेत्यांना बोलल्याचा खुलासा बाळासाहेबांनी केला. त्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी राज यांच्या विरोधात घोषणा दिल्यावरही राजवरील टीका त्यांनी टाळली. फक्त त्यांना झाडू देऊ, असे सांगून शिवसैनिकांच्या घोषणांना बगल दिली. उलट माझ्याकडे संशयाने पाहू नका, कॉंग्रेसला गाडून टाका, पुतळ्याऐवजी गोरगरिबांसाठी टॉवर उभारा अशा भावनिक मुद्द्यांना बाळासाहेबांनी जास्त जागा दिली. आजच्या घडीला मुंबई, ठाणे, नाशिक आदी ठिकाणी शिवसेनेला सर्वाधिक फटका मनसेमुळे बसणार असल्याचे दिसत असतानाही महत्त्वाच्या सभेतच राज यांच्याबाबत बाळासाहेबांनी कोणतीही टीकाटिप्पणी न केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

याउलट बाळासाहेबांच्या ठाण्यातील टीकेला राज यांनी सडेतोड प्रत्त्युतर दिले. मी मर्दासारखाच लढतो आहे, तुमच्या पक्षातील नेत्यांनाच मर्दासारखे लढण्यास सांगा असे सांगितले. माझ्या सभेचे लाईव्ह टेलिकास्ट सुरू झाले की केबलचालकांकरवी केबलच बंद करायची, मुलाखत छापून आली की वृत्तपत्रांचे गठ्ठे गायब करायचे असले धंदे आपण करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाळासाहेबांविषयीचा आपला आदर कायम राहणार असून उद्धव आणि त्यांच्या चारपाच टाळक्‍यांसाठी एकही पाऊल पुढे टाकणार नसल्याचे सुनावले. मुंबईच्या निकालांचा अंदाज घेताना "त्रिशंकू' परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. अशा वेळी किंगमेकर बनण्याची संधी मिळाल्यास उद्धव यांच्यासोबत एकही पाऊल चालणार नसल्याचे स्पष्ट करून मनसेचा राजमार्ग शिवसेनेला समांतरच जाणार असल्याचे राज यांनी स्पष्ट केले आहे


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें