शुक्रवार, 9 मार्च 2012

गद्दारी सहन करणार नाही! - राज ठाकरे

गद्दारी सहन करणार नाही! - राज ठाकरे
-
Saturday, March 10, 2012 AT 04:00 AM (IST)

मुंबई - महापालिका निवडणुकीवेळी अन्य पक्षांनी केले ते राजकारण ठिक आहे. पण मनसेमध्ये ज्यांना ऐनवेळी अन्य पक्षातील मैत्री आणि संबंध आड आले, काही ठिकाणी "व्यवहार' झाले, तर काहीजण बेसावध राहिले, त्यांची कुणाचीही गय केली जाणार नाही. एप्रिल महिन्यात या सर्वांचे "ऑपरेशन' होईल. पक्षात गद्दारी कधीही सहन करणार नाही, असा सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या सहाव्या वर्धापनदिनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

मला इतका येडबंबू समजू नका. मला सगळे कळते, अशी सुरुवात करून राज म्हणाले, या महापालिका निवडणुकीने मला अनेक गोष्टी शिकवल्या. माणसे नक्की कळाली. आणखी काय काय कळाले ते तुम्हाला पुढील महिन्यात समजेलच. जे पक्षासाठी आहेत, पक्षासाठी झटताहेत त्यांच्यासाठी मीही जीव ओवाळून टाकेन. या निवडणुकीत असंख्य कार्यकर्त्यांनी अत्यंत निष्ठेने काम केले, त्यांना माझा प्रणाम!

मुंबई आणि ठाण्यात या निवडणुकीत अपेक्षित गणिताची मोडतोड झाली, असे सांगून राज म्हणाले, तरीही महाराष्ट्रात आज मनसेचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक आहेत. वणी आणि खेड या नगरपालिका ताब्यात आल्या आहेत. पुण्यात मनसेचा विरोधी पक्षनेता होणार आहे, तर नाशिकमध्ये कोणत्याही परिस्थितीत मनसेचाच महापौर होईल. मुंबईत गेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाला सात जागा मिळाल्या होत्या. गेल्या पाच वर्षांत हा सात वर्षांचा मुलगा एकदम 28 वर्षांचा झाला! असे अन्य पक्षांच्या बाबतीत झाले आहे का?

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे महाराष्ट्रात चमत्कार घडवून दाखवेल. आज कुणी यावर विश्‍वास ठेवणार नाही, पण 2014 नंतर आमच्या प्रत्येक गोष्टीवर विश्‍वास बसेल, असा दावा करून राज यांनी एप्रिलनंतर आपण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर बाहेर पडणार असून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले.

पक्षाची स्थापना केली तेव्हा "पक्ष चालवणे इतके सोपे नसते. लवकर उठावे लागते...' वगैरे उपदेश मला केले गेले. पण आज सहा वर्षांनंतर त्यांचीच झोप उडाली आहे, असा टोमणा मारून राज यांनी "जसजशी संधी मिळत जाईल, तसतसे स्वतःला सिद्ध करत जाईन. मी गंमत म्हणून पक्ष काढलेला नाही', असे विरोधकांना सुनावले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें