मंगलवार, 6 मार्च 2012

मनसेच्या मातोश्रीच्या प्रवासावर नाशिकची सुभेदारी

मनसेच्या मातोश्रीच्या प्रवासावर नाशिकची सुभेदारी
राजेश मोरे - सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, March 07, 2012 AT 03:45 AM (IST)


मुंबई - शिवसेनेचा ठाण्याचा "ठाणेदार' मनसेच्या पाठिंब्याने दणदणीत मतांनी महापौरपदावर बसला आहे. थेट राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानेच महायुतीचा वादात सापडलेला विजय "निर्विवाद" म्हणून सिद्ध झाला. अशावेळी किमान या पाठिंब्याची बुज राखून शिवसेना नाशिकमध्ये मनसेचा महापौर बसविण्यासाठी किमान आडकाठी आणणार नाही, अशी अपेक्षा मनसेचे पदाधिकारी बाळगून आहेत. मात्र त्याचवेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा "मातोश्री'च्या दिशेने प्रवास कधी सुरु होणार, यावरच नाशिकच्या सत्तेचा सारीपाट अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाण्याच्या महापौरपदाची निवडणूक यंदा प्रचंड चुरशीची झाली. भाजपच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे गायब झाल्याने तर महायुतीचा महापौरपदावरील दावा धोक्‍यात आला होता. अशावेळी अंबरनाथमध्ये मनसेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यात पुढाकार घेणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी थेट राज ठाकरे यांच्याबरोबर संवाद साधला. यासाठी त्यांनी आपल्या ठाण्यातील विश्‍वासू शिलेदार आमदार राजन विचारे आणि प्रताप सरनाईक यांनाही सोबत घेतले. या तिघांनी मनसेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केल्यावर मनसे ठाण्यात तटस्थ राहण्याची शक्‍यता व्यक्त होत होती; पण राज यांनी साऱ्यांचे अंदाज धुळीला मिळवून, बाळासाहेब ठाकरे यांना ठाण्याची सत्ता हवी असल्याने आपण युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. या निमित्ताने जांबोरी मैदानात प्रचाराच्या दरम्यान बाळासाहेबांच्या दिशेने आपण शंभर पावले चालण्यास तयार असल्याच्या विधानाचा त्यांनी प्रत्यय आणून दिला. त्याचवेळी नाशिकमध्ये मनसे सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून निवडून आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

ठाण्यातील सत्ता एकहाती शिवसेनेच्या ताब्यात देण्यात राज यांनी पुढाकार घेतल्याने नाशिकची सत्ता मनसेच्या ताब्यात देण्यास शिवसेनेचे उद्धव ठाकरे पुढाकार घेतील, अशी अपेक्षा मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. राज यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी शिवसेनेच्या तीन आमदारांना थेट संवाद साधावा लागला होता. मनसेच्या वतीने अशाप्रकारे कोण आमदार उद्धव यांना भेटण्यासाठी पुढाकार घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मनसेने सहकार्याची अपेक्षा केल्यानंतरच उद्धव ठाकरे आपले पत्ते उघड करण्याची शक्‍यता असल्याने मनसेचे पदाधिकारी नाशिकसाठी "मातोश्री'च्या दिशेने कधी जाणार, याकडे मनसेच्याच नव्हे तर शिवसेनेच्या नेत्यांचेही लक्ष लागलेले आहेकोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें