बुधवार, 4 अप्रैल 2012

मी मनसेचाच!

मी मनसेचाच!
- सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, April 04, 2012 AT 03:45 AM (IST)
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेमध्येच राहणार असल्याचा निर्वाळा दिला. राज यांच्यासमोर आपली कैफियत मांडली असून त्यावर योग्य तो न्याय मिळेल, असा विश्‍वास असल्याचे मत हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेने "राष्ट्रवादी'ला पाठिंबा दिल्याने हर्षवर्धन कमालीचे नाराज झाले होते. त्यांच्या समर्थकांनी अगदी निवडणुकीपासून दूर राहण्याचा पवित्रा घेतला होता. स्थानिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा दावाही त्यांनी केला होता. आपल्याला बेदम मारहाण करणारे पोलिस हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अखत्यारीत येतात. तसेच भविष्यातील राजकारणाचा विचार करून राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाण्यास हर्षवर्धन यांचा विरोध होता, मात्र मनसेच्या स्थानिक नेत्यांनी ही आघाडी घडवून आणल्याने हर्षवर्धन मनसेला रामराम करून शिवसेनेच्या "गडा'वर जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मध्यंतरी या विषयावर दूरध्वनीवर प्रतिक्रियेसाठी संपर्क साधल्यावर प्रकृती बरी नसल्याचे सांगून त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले होते. त्यामुळेच जाधव यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.

आज दुपारी हर्षवर्धन यांनी राज यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना आपली कैफियत मांडली असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यावर योग्य तो न्याय मिळेल, असा विश्‍वास जाधव यांनी व्यक्त केला. या भेटीनंतर आतापर्यंत विधानसभेच्या कामकाजापासून दूर असलेले हर्षवर्धन विधिमंडळ कामकाजात मनसे आमदारांसोबत बसून कामकाजात सहभागी झाले होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें