मंगलवार, 12 जून 2012

मनसेतील नासके आंबे पत्र पाठवून कळवा!

मनसेतील नासके आंबे पत्र पाठवून कळवा!
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 13, 2012 AT 03:00 AM (IST)
ठाणे -  नाशिकमध्ये मनसेचा महापौर झाला, पुण्यात विरोधी पक्षनेता आपला आहे; मग ठाण्यातच कोठे घोडे अडले? असा सणसणीत सवाल करत संघटनेतील नासके आंबे बाहेर काढावेच लागतील... मग ते कितीही मोठ्या पदावरचे असोत, असे सूतोवाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 12) ठाण्यात केले. मी एका मर्यादेपर्यंत सहन करतो, असे स्पष्टपणे बजावून त्यांनी ठाण्यातील पक्षसंघटनेतील फेरबदलांना सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले.

निवडणुकीच्या काळात कोणी कोणी काय काय केले ते आपल्याला "राजगडा'वर पत्रे पाठवून कळवा, असे आवाहनही त्यांनी गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या मनसेच्या मेळाव्यात बोलताना केले. मेळाव्यात राज यांनी संघटनेतील फुटीर मंडळींची चांगलीच झाडाझडती घेतली.

ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेला मिळालेले अपयश अनपेक्षित होते, असे सुरुवातीलाच सांगत राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना फैलावर घेण्यास सुरुवात केली. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मनसेला पडलेली मते आणि महापालिका निवडणुकीत पडलेली मते यातील फरक लक्षात घ्या, असे परखडपणे सुनावतानाच "तुमचा जनसंपर्क का कमी पडला याचा एकदा शांतपणे विचार करा', असेही त्यांनी सुचविले. प्रश्‍नांना वाचा फोडल्याशिवाय लोकसंग्रह होत नाही, असे सांगून त्यांनी ठाण्यातील असंख्य प्रश्‍न हातात घ्या, असे आवाहनही उपस्थितांना केले. तुमच्यात जर जनतेचे प्रश्‍न सोडवण्याची संवेदनाच नसेल तर तुम्ही पुढे जाणार कसे? निवडणुका आल्या की उमेदवारी मात्र हवी. इतर वेळी गळ्यात गळे घालून फिरणार आणि निवडणुकीला तिकीट मिळाले नाही की एकमेकांना पाण्यात पाहण्यास सुरुवात करणार, असे सांगून त्यांनी ठाण्यात तुम्ही अशी काय क्रांती केलीत? असा प्रश्‍नही विचारला. एकीकडे मी पक्ष उभा करायचा, जनतेचा विश्‍वास संपादन करायचा आणि तुम्ही मात्र तो घालवायचा हे चालणार नाही, असेही त्यांनी सडेतोडपणे बजावले.

टोलनाके-क्वॉरीमालकांविरोधात आंदोलन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावरही राज ठाकरे यांनी जोरदार आसूड ओढले. ""सध्या राज्यात काय चालू आहे तेच कळत नाही. राज्यकर्ते लुटत आहेत आणि विरोधी पक्षांना त्यांनी खिशात घातले असल्याने तेही काही करीत नाहीत. पण आपल्या पक्षाकडून जनतेच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, हे लक्षात ठेवा,'' असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र पिशव्यामुक्त करण्यापेक्षा टोलमुक्त करा, असे सांगून राज्यभर मनसे टोलमुक्तीसाठी आंदोलने करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. दुसरीकडे सर्वत्र डोंगर पोखरणाऱ्या क्वॉरीमालकांविरोधात आंदोलनाने दणका देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलनाच्या नावाखाली तिकडे स्वतःचा वेगळा टोल लावू नका, असा चिमटाही त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना लगावला.

"राजगडा'वर थेट पत्रे पाठवा
महापालिका निवडणुकीत काय चुकले आणि काय करायला हवे होते, याचे सविस्तर पत्र आपल्याला थेट "राजगडा'वर पाठवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले आहे. आलेली पत्रे आपण स्वतः वाचणार असून ती हर्षल देशपांडे आणि केदार अंबाळकर यांच्याकडे लिफाफ्यातून द्या, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. महापालिका निवडणुकीत कोणी संघटनेचे काम केले नाही आणि कोणी प्रामाणिकपणे केले असेल तर तेही सांगण्याचा मोठेपणा तुमच्याकडे असला पाहिजे, असेही त्यांनी बजावले.

वाढदिवसाची होर्डिंग्ज बंद करा
राज ठाकरे यांनी मेळाव्यात वाढदिवसाची होर्डिंग्ज दिसली नाही पाहिजेत, असा इशारा आपल्या कार्यकर्त्यांना दिला. माझ्याही आणि तुमच्याही वाढदिवसाची होर्डिंग्ज बंद करा, असे त्यांनी स्पष्टपणे सुनावले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें