मंगलवार, 24 जुलाई 2012

टोल न भरताच वाहने सुसाट!

टोल न भरताच वाहने सुसाट!
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 25, 2012 AT 01:30 AM (IST)

नवी मुंबई - राज्यातील पथकरवसुलीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याने आजपासून टोल भरू नका, असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सर्व टोल नाक्‍यांवर ठाण मांडून वाहनचालकांना टोल न भरण्याचे आवाहन केले. त्यामुळे आज शेकडो वाहनांनी टोल न भरताच टोल नाका ओलांडला.

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी टोल नाक्‍यावर नवी मुंबईतील मनसेचे शेकडो कार्यकर्ते ठिय्या देऊन होते. गजानन काळे, कौस्तुभ मोरे, अनंत चौघुले आदी कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेऊन "टोल भरू नका' असे आवाहन करणारे फलक दाखवत जोरदार घोषणा दिल्या. "जे वाहनचालक स्वखुशीने टोल देत आहेत, त्यांच्याकडून टोल घ्या; पण जे टोल भरू इच्छित नाहीत त्यांना अडवू नका', असे या कार्यकर्त्यांनी टोलनाक्‍यावरील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यामुळे बहुतेक वाहने टोल न भरताच रवाना झाली; शंभरातून एखादे वाहनच टोल भरण्यासाठी थांबत होते. तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परिमंडळ एकचे सहायक पोलिस उपायुक्त मुजीब शेख परिस्थितीवर लक्ष ठेवत होते.

आधी चांगले रस्ते द्या!
मुंबईहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाशी टोल नाक्‍याजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे टोल न भरण्याचे आवाहन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचे वाहनचालक आभार मानत होते. खड्ड्यांतून जाताना वाहनांचे कसे नुकसान होते, याबाबतही ते सांगत होते. "आधी चांगले रस्ते द्या, नंतर टोल वसूल करा', अशी मागणी वाहनचालक करत होते.

खारेगावात टोल वसुली थांबली
कळवा येथील खारेगाव टोलनाका हा ठाणे जिल्ह्यातील सर्वांत मोठा टोल नाका आहे. नाशिक, नगर, पुणे (जुन्नर मार्गे) आदी ठिकाणी या टोल नाक्‍यावरूनच जावे लागते. तेथे मनसेने महिनाभरापूर्वी "टोल बंद' आंदोलन सुरू केले होते. त्या वेळी टोलवसुलीला काहीसा फटका बसला होता; मात्र त्यानंतर काही दिवसांनी टोलवसुली जोरात सुरू झाली. मनसे कार्यकर्त्यांनी आज सकाळी पुन्हा या टोल नाक्‍यावर धडक दिली. त्यामुळे टोलवसुली थांबली आहे. ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्‍यावरील वसुली दिवसभर बंद होती.

मुलुंड टोल नाक्‍यावर आंदोलन फसले
मुंबईतील मुलुंड टोल नाक्‍यावर मनसेच्या 30 ते 35 कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. हा टोल नाका आज सुरूच होता. मनसेच्या विरोधामुळे सकाळी काही वेळ वाहने टोल न देताच गेली; पण नंतर "ये रे माझ्या मागल्या' अशीच स्थिती होती. तेथे महिनाभरापूर्वी मनसेचे आमदार शिशिर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन फसले होते. त्या वेळी टोलवसुली करणाऱ्या कंपनीने वाहनांची मोजदाद करण्यासाठी आलेल्या मनसे कार्यकर्त्यांना जागाही दिली नव्हती.

दहिसर टोल नाका
उत्तर मुंबईतील दहिसर टोल नाक्‍यावर आज सकाळी मनसेच्या 250 ते 300 कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही जणांनी वाहने थांबवून टोल भरू नका, अशी दमदाटीही केली. जमावबंदीचा आदेश मोडून आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर जामिनावर सोडण्यात आले.

रायगड जिल्ह्यात आंदोलन सुरू
रायगड जिल्ह्यातील टोल नाक्‍यांवर आंदोलन सुरू असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष खवले यांनी अलिबाग येथे सांगितले. मनसेचे कार्यकर्ते मुंबई-पुणे एक्‍स्प्रेसवे, शेंडुंग, कोन, उरण, अलिबाग-धरमतर, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा पूल, आपटा फाटा येथील टोल नाक्‍यांवर ठाण मांडून आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. जिल्ह्यातील टोल नाक्‍यांवर मनसे कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.

धरमतरमध्ये टोल धुडकावला
पेण तालुक्‍यातील धरमतर टोल नाक्‍यावर मनसेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांनी घोषणा देत टोलवसुलीस विरोध केला. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी त्यामुळे टोल न घेताच वाहने सोडली. या आंदोलनात शालम पेणकर, मनोहर पाटील, अंकुश म्हात्रे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होतेकोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें