बुधवार, 22 अगस्त 2012

राज यांचे शक्तिप्रदर्शन

राज यांचे शक्तिप्रदर्शन
-
Thursday, August 23, 2012 AT 04:00 AM (IST)


प्रक्षुब्ध जनभावनेला व्यक्त होण्याची संधी देत राज ठाकरे यांनी निष्क्रिय सरकारला धारेवर धरले. पण, मूळ प्रश्‍न पोलिस दलाच्या एकूण अपयशाचा आहे, हे विसरता येणार नाही.

आसाम आणि म्यानमारमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मुस्लिम संघटनांच्या पुढाकाराने आझाद मैदानात जमलेल्या जमावाने पोलिस आणि प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींवर केलेल्या अनपेक्षित हल्ल्याचा आणि हिंसाचाराचा मुंबईकरांना किती मोठा धक्का बसला, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला मिळालेल्या प्रतिसादावरून साऱ्या जगासमोर आले. चौपाटी आणि आझाद मैदानामध्ये या मोर्चासाठी जेवढे लोक जमले; त्यापेक्षा कित्येक पट मुंबईकरांनी टीव्हीसमोर बसून तेथून या निदर्शनात आपला सहभाग नोंदविला. खरे तर, पोलिस यंत्रणेवर झालेल्या हल्ल्यानंतर जनभावनेला आश्‍वस्त करण्याचे, जनमानसाची समजूत काढण्याचे आणि झाल्या घटनेच्या विश्‍लेषणाला दिशा देण्याचे काम राज्यातील सरकारचे, म्हणजे "पृथ्वीराजां'चे होते. पण, कसोटीच्या क्षणी तलवार म्यान करून दुसऱ्याकडे बोट दाखविणारे नेतृत्व ते करू शकत नाही. तेव्हा विरोधी पक्षातून "राज'सारख्यांवर ती जबाबदारी येऊन पडते. अस्वस्थ, अशांत, प्रक्षुब्ध जनभावनेला व्यक्त होण्याची वाट करून देऊन संबंधितांना इशारा देण्याची ही जबाबदारी राज ठाकरे यांनी योग्यवेळी पार पाडली. त्यामुळे त्याला मुंबईकरांनी एकमुखी पसंती दिली. राज्यात सत्तेवर असलेले लोकशाही आघाडीचे सरकार सुंदोपसुंदीत, परस्परांचे पाय ओढण्यात मग्न असल्याने आणि त्यात खुद्द नेतृत्वाचाच पुढाकार असल्याने हतबल, निष्क्रिय आणि निष्प्रभ सरकारला राज ठाकरे खणखणीत इशारा देऊ शकले. जनमानस नेमके ओळखण्याची आणि तरंगत्या जनभावनेवर स्वार होण्याची आपली क्षमता राज यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदादाखवून दिली.

मुस्लिमांच्या संघटनांनी आयोजित केलेल्या निदर्शनांना निषेधार्ह हिंसक वळण लागल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आणि तोच राजकीय कार्यक्रम असलेले राजकीय पक्ष दुसऱ्या बाजूने पुढे येतील, अशी अपेक्षा होती. पण, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, या दोन्ही पक्षांनी आपापल्या अंतर्गत मर्यादांमुळे केवळ अस्तित्व दाखविण्यापुरते कार्यक्रम केले. शिवसेनेने राजकीय अजेंडा आणि आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठीच या घटनेचा उपयोग करून घेतला. अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे अस्तित्व पत्रक काढणे आणि फार तर आझाद मैदानातच पत्रकार परिषदा घेण्यापुरते असल्याने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेच या सर्व पक्षांच्या आणि संघटनांच्या अनुयायांचे लक्ष होते. राज यांनी त्यांची अपेक्षा पूर्ण केली. आक्रस्ताळी हिंदुत्वनिष्ठ भूमिका घेऊन राजकीय लाभ उठविण्यापेक्षा त्यांनी समंजस आणि वास्तववादी भूमिका घेतल्याने मुंबईतल्या वातावरणातील ताण निवळला. मुस्लिम संघटनांच्या अनुयायांनी घातलेल्या हैदोसानंतर तशाच अरेरावी पद्धतीने इशारे देणे अवघड नव्हते. पण, तसे केल्याने मुंबईतील वातावरण अधिक अशांत होण्याखेरीज काहीच झाले नसते. गणपतीपासून दिवाळीपर्यंत येणाऱ्या साऱ्या सणासुदीवर त्याची कायमची अशुभ छाया राहिली असती. ती टाळून, घडलेल्या घटनेची गंभीर दखल मुंबईकरांनी घेतली आहे, हे दाखवून देत त्यांनी संबंधितांना योग्य तो इशाराही दिला. तमाम मुस्लिम जनसमुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यापेक्षा उपऱ्या, बांगलादेशी घुसखोरांनी येथे सामाजिक तेढ वाढविण्याचे उद्योग चालविले आहेत, त्यांना लगाम घालण्याचे आवाहन त्यांनी सुरक्षा यंत्रणेसह मुस्लिम समाजालाही केले. त्यांच्या भूमिकेवर त्यामुळेच फारसे आक्षेप घेतले गेले नाहीत. हिंसाचाराबद्दल सर्व बाजूंनी मुंबईचे पोलिस आयुक्त अरूप पटनायक यांना टीकेचे लक्ष्य केले गेले आहे. राज यांनीही तेच केले. वास्तविक, हिंसाचार झाल्यानंतर हाताळल्या गेलेल्या परिस्थितीपेक्षा तो घडण्यापूर्वीच नेस्तनाबूत करण्यामध्ये पोलिस दलाला अपयश आले, ही गंभीर बाब आहे. पण, अंडरवर्ल्डमध्ये जेवढे गॅंगवॉर नसेल; तेवढे ते पोलिस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर सुरू आहे, हे आता सर्वश्रुत आहे. ते आता उफाळून आले आहे आणि त्यात पटनायक यांचा बळी मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. त्यातून केवळ पटनायक किंवा गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याच खांद्यावर सगळी जबाबदारी टाकणे सोयीचे असले, तरी धोकादायक आहे. त्या दिवशी जे घडले; त्याला केवळ या दोघांचे अपयश कारणीभूत नाही, हे मनात सगळ्यांनाच कबूल आहे. ते जाहीरपणे स्वीकारून आता त्यापेक्षाही गंभीर अशा पोलिस दलाच्या एकूण अपयशाचीच चिकित्सा केली गेली पाहिजे. पोलिस कॉन्स्टेबलपासून निरीक्षकांपर्यंत सगळ्यांचाच बेफिकीरपणा दूर करण्याचे उपाय शोधले नाहीत, तर अशा घटना पुनःपुन्हा घडत राहतील. पटनायक-आरआर आबा बदलले गेल्याने त्यात फरक पडणार नाही, हे नीट समजून घेतले पाहिजे



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें