मंगलवार, 21 अगस्त 2012

महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघाल तर खबरदार

महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघाल तर खबरदार!
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 21, 2012 AT 04:30 PM (IST)
मुंबई- महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघाल तर खबरदार. महाराष्ट्राकडे वाकडा डोळा करून बघायची हिंमत कुणी करणार नाही, अशी मराठी माणसाची ताकद दिसायला हवी, असे भावनिक आवाहन करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांच्यावर सडकून प्रहार केला. मनसेने आज (मंगळवार) गिरगाव चौपाटीवरून आझाद मैदानापर्यंत विशाल निषेध मोर्चा काढला होता. त्यानंतर आझाद मैदानावर राज ठाकरे यांनी सभा झाली. सभेला लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले,""लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याची, सभा घेण्याची आम्हाला परवानगी दिली जात नाही. दुसरीकडे रझा अकादमीचा इतिहास बघितला तर त्यांच्या प्रत्येक मोर्चात हिंसाचार झाला आहे. तरीही त्यांना आझाद मैदानासारख्या भागात परवानगी दिली जाते. मुख्यमंत्र्यांशी बोलल्यावर आम्हाला परवानगी दिली, ही कोणती लोकशाही? आर. आर. पाटील म्हणतात, की जो कुणी कायदा सुव्यवस्था मोडेल त्याला बघून घेऊ. परंतु, मुंबईत हिंसाचार झाला तेव्हा पाटील कुठे गेले होते? तेव्हा त्यांनी कठोर कारवाई का केली नाही?''

राज म्हणाले,""या हिंसाचारात पोलिसांचे खच्चीकरण झाले आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग झाला, पोलिसांना मारहाण झाली तरी कारवाईचे आदेश देण्यात आले नाही. उलट हिंसाचार करणाऱ्या व्यक्तीला पकडणाऱ्या उपायुक्त दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अरुप पटनायक लोकांसमोर झापतात. जर पोलिसांचे असेच खच्चीकरण सुरू राहिले तर लोकांनी कुणाकडे जायचे. मी हिंदुत्वाचा पुरस्कार करीत नाही. मला केवळ महाराष्ट्र धर्म समजतो. पोलिसांवर हात टाकणारा कुठल्याही धर्माचा असतो, त्याला फोडून काढलेच पाहिजे.''

राज म्हणाले,""आर. आर. पाटील आणि अरुप पटनायक यांचा राजीनामा मागण्यासाठी आणि हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आम्ही मोर्चा काढला आहे. पोलिसांना आणि प्रसार माध्यमांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आम्ही एकत्र उभे राहिलो आहोत. जेव्हा अशा घटना घडतील तेव्हा याच ताकदीने उभे राहायचे आहे. मी जेव्हा केव्हा तुम्हाला हाक देईल तेव्हा तुमचा मला असाच पाठिंबा राहील, अशी आशा करतो.''

भाषण झाल्यावर कॉन्स्टेबल प्रमोद तावडे या पोलिसाने व्यासपिठावर जाऊन राज ठाकरे यांना गुलाबपुष्प भेट दिले. त्यानंतर बोलताना तावडे म्हणाले, की मला कारवाईची भीती नाही. मी स्वयंस्फूर्तीने हे पाऊल उचलले आहे. राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी मी व्यासपिठावर आलो होतो.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें