बुधवार, 12 सितंबर 2012

राजसाहेब, करा हो एकदा तरी टीका..!

राजसाहेब, करा हो एकदा तरी टीका..!
सु. ल. खुटवड
Wednesday, September 12, 2012 AT 12:06 PM (IST)
(राज ठाकरे आणि 'मनसे'तील आमदार व पदाधिकारी कृष्णकुंजवर गप्पा मारत बसले आहेत. वेळ सकाळची. राज यांच्या लागोपाठच्या दोन सभांना मिळालेल्या प्रतिसादामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहताना दिसतो आहे).

नितीन सरदेसाई - साहेब, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार सुशीलकुमार शिंदे तुमच्यावर खूप नाराज आहेत?
राज - असणारच. त्यांना संसदेत बारा राज्यांची बारा टाळकी भंडावून सोडत असतीलच ना. 'कारवाई करा. कारवाई करा' म्हणून.
राम कदम - त्याबद्दल ते नाराज नाहीत. तुम्ही जाहीर सभांमधून राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा राजीनामा मागता. त्यांच्यावर टीका करता. तुमची सगळी भाषणे चॅनेलवाले दिवसभर दाखवतात. त्यामुळं त्यांची प्रसिद्धी पार दिल्लीपर्यंत पोचलीय. बिहार, उत्तर प्रदेशच काय, पण झारखंडमधील खेडोपाड्यांतही आर. आर. आबांचे नाव सर्वतोमुखी झालंय. पण मी देशाचा गृहमंत्री असूनही राज ठाकरे माझा साधा उल्लेखही करत नाहीत. टीका करणं तर लांब राहिलं. दिल्लीतील मराठी माणसांविषयी एवढा परकेपणा बरा नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं देशाच्या खेड्यापाड्यांत त्यांचं नाव पोचणं तर दूरच राहिलं. त्यांच्या सोलापुरात अजूनही लोकांना ते केंद्रीय उर्जामंत्री आहेत, असंच वाटतंय.
बाळा नांदगावकर - गृहखात्याचा कारभार घेतल्यापासून अनेक मोठमोठ्या दुर्घटना घडल्या. पण राजीनामा मागणं तर राहिलं लांब, एकदाही साधी बिनपाण्यानंही केली नाही, अशी सुशीलकुमारांची खंत आहे.
राज - आयला ते राहिलंच. उर्जामंत्री असताना निम्मा देश यांनी अंधारात घालवला. ते पाहून सोनिया गांधी खूप चिडल्या आणि 'गो टू होम' असं जोरात ओरडल्या. आपल्या पंतप्रधानांनी नेमकं ते ऐकलं आणि त्याच रात्री त्यांना तातडीने 'होम मिनिस्ट्री' दिली. मॅडमचा आदेश डावलणार कसा? असला दळभद्री कारभार या काँग्रेसचा. कोण काय म्हणतंय आणि कोण काय त्यातून अर्थ काढतंय, काही सांगता येत नाही.
बाळा नांदगावकर - साहेब अभिनेता गोविंदा आणि अनुराधा पौडवाल यांचाही फोन होता. गोविंदाचं म्हणणं आहे, की चार- पाच वर्षांपूर्वी अमिताभ बच्चनवर तुम्ही कडाडून हल्ला चढवला होता. तेव्हापासून त्यांचं करिअर एकदम जोरात चालू झालंय. माझ्यावर अशी एकदा तरी टीका करा ना. हल्ली माझं कुठंच नाव नसतं. हिंदीतील मराठी नटांवर असा अन्याय करू नका आणि आशाबाईंवर टीका करण्यापेक्षा मला जाहीर सभेतून काहीतरी सल्ला द्या. एकदा तरी दिवसभर टीव्हीवर झळकू द्या, अशी अनुराधा पौडवाल यांची अपेक्षा आहे.
राज - अरे, यांच्या प्रसिद्धीसाठी मी काय सुपाऱ्या घेतल्यात का?
शिरिष पारकर - त्यांचं तेच म्हणणं आहे. निवडणुकीत तुमच्या पक्षाचा प्रचार करायला कितीही दिवस फुकट येऊ. पण तेवढी आमच्यावर टीका करा. मराठी माणसांचं हित तुमच्या डोळ्यासमोर आहे ना. मग करा ना आमच्यावर कडाडून हल्ला. दिसू द्या ना आम्हाला दिवसभर चॅनेल्सवर. होऊ द्या आमची प्रसिद्धी. लागू द्या आमचंही करिअर मार्गी.
राज - आयला ! मराठी माणसांचं हे असं जगावंगळंच असतंय.

(दिल्लीतील दिग्विजयसिंग यांचं निवासस्थान. वेळ सकाळची. कपिल सिब्बल आणि मनीष तिवारी आणि स्वतः दिग्विजयसिंग लॉनवर गप्पा मारत आहेत).

कपिल सिब्बल -
दिग्गिराजा, मानलं हं तुम्हाला. काय अचूक टायमिंग साधलंत?
दिग्गिराजा - अहो सवयच आहे मला तशी. तुम्हाला नाश्‍त्याला छोले - भटुरे आवडतात, हे माहिती आहे मला.
सिब्बल - नाश्‍त्याविषयी मी बोलत नाही. ठाकरे कुटुबियांचं मूळ हे बिहारमध्ये आहे, हे शोधलंत त्याबद्दल.
दिग्गिराजा - मीडियाला आपल्या तालावर कसं नाचवावं, हे देशात फक्त दोघांनाच जमतं. एक म्हणजे राज ठाकरे आणि दुसरा मी.
विषय अण्णा हजारेंचा असो, ठाकरे कुटुबियांचा असो, संततीनियमन असो की भाववाढ असो, मी बरोबर भाव खाऊन जातो.
सिब्बल - तेच म्हणतो मी. मी एवढा कायदेपंडित असूनही मला जमत नाही ते.
दिग्गिराजा - काय आहे इथं फार हुशार असून चालत नाही. निरर्थक आणि बाष्कळ बोलायला थोडा - फार अभ्यास लागतो. नाही असं नाही. पण सरावानं जमतं सगळं.
मनीष तिवारी - ते ही बरोबर आहे म्हणा. मुख्यमंत्री असताना व केंद्रात मंत्री असताना तुम्ही ते सिद्ध केलंच आहे.
दिग्गिराजा - कसं आहे पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली असते. ती पार पाडायची असते. पक्षाने सांगितलं, की वेड्यासारखं चॅनेल्ससमोर बडबडत रहा. आपण तेच करायचं. त्यामुळं मूळ मुद्दा बाजूला पडतो व चर्चा दुसरीकडे जाते. हेच पक्षाला अभिप्रेत असतं. मी माझं काम चोख बजावतो.
मनीष तिवारी - पण ठाकरे कुटुबियांचं मूळ कसं शोधलंत?
दिग्गिराजा - शोधायचं कशाला? दिलं ठोकून. चॅनेल्समोर बोलायला पुरावे लागत नाहीत. उद्या गरज पडली तर बिहारमधील ठाकोर मंडळी ही ठाकरे कुटुबियांपैकीच आहेत, असंही सांगेन. त्यामुळं हीच ठाकोर मंडळी नंतर धारला गेली व तेथून मुंबईला गेली. असं म्हणायचं. तशी कागदपत्रं रंगवायची. हाय काय आणि नाय काय !
सिब्बल - मग आता आणखी कोणाचं मूळ शोधणार आहात?
दिग्गिराजा - काय आहे. गेली सात- आठ वर्ष मी संशोधन करून असं सिद्ध केलंय, की सोनिया गांधी यांचे मूळ हे दिल्लीतलंच आहे. त्यांचे पूर्वज सहज इटलीला सहलीसाठी गेले आणि त्यांना भारतात येण्यासाठी वर्षभर जहाजच मिळालं नाही. त्यामुळं ते तिकडंच राहिले व तिथंच रूळले. पण मूळच्या त्या भारतीय वंशाच्या आहेत. त्यामुळं त्या अस्सल भारतीयच आहेत. त्यांचा परदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करणं हा महामूर्खपणा आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधान होण्यासाठी त्याच योग्य आहेत. त्यांच्यासारख्या कर्तबगार आणि धाडसी महिला...

(त्यानंतर तासभर दिग्गिराजांनी सोनिया स्तुतीची कॅसेट लावली. ज्यावेळी त्यांची तंद्री भंगली. त्यावेळी कपिल सिब्बल व मनीष तिवारीही त्यांच्यासमोर नसल्याचे त्यांना दिसले...)
 


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें