शनिवार, 8 सितंबर 2012

अराजकधर्म सोडावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ।।

अराजकधर्म सोडावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ।। (हेमंत देसाई)
हेमंत देसाई hemant.desai001@gmail.com
Sunday, September 09, 2012 AT 03:45 AM (IST)

राज ठाकरे यांचं नेतृत्व उद्या देशस्तरावरही फुलू शकतं. राज्याराज्यांतल्या प्रादेशिक अस्मितांचे ते "सेंट्रल हीरो' बनू शकतात. मात्र, हे करताना त्यांनी विधायक आणि विकासाधारित राजकारण करायला हवं.

"माझ्या डोक्‍याचा पारा चढवू नका...' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी "सिंघम'मधल्या अजय देवगणप्रमाणं "आता माझी सटकली' असा इशारा हावभाव करत बिहारला दिला, तेव्हा पुन्हा एकदा माध्यमकेंद्रित "हाय ड्रामा' निर्माण झाला...

"बिहारमध्ये जाऊन गुन्हेगारांना पकडणाऱ्या महाराष्ट्राच्या पोलिसांवर जर अपहरणाच्या केसेस टाकल्या, तर इथल्या बिहारींना घुसखोर ठरवून हाकलून दिलं जाईल', अशी थेट धमकी देऊन राज पुन्हा मूळपदावर गेले."आपली विधानं महत्त्वाचे शब्द गाळून विकृत स्वरूपात दाखवणाऱ्या हिंदी चॅनेल्सचा खेळ थांबवू,' अशी गर्जनाही त्यांनी केली. 11 ऑगस्टला आझाद मैदानाच्या दिशेनं मोर्चा काढून राज यांनी पोलिसांचं मनोधैर्य वाढवलं आणि "आता पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या अंगाला हात लावाल तर...,' असा पवित्रा घेत पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या मतदारसंघांवर ताबा मिळवला आहे. पाकिस्तानी कलाकारांना विरोध करण्यावर मनसेनं इतके दिवस भर दिला नव्हता. "26/11' नंतर राजकीय संबंध तोडूनही उपयोग होत नाही, हे लक्षात आल्यावर भारतानं पाकिस्तानबरोबरचा व्यापार वाढवला. व्हिसा-निर्बंध सैल केले. शिवसेना वा मनसेनं याला ठोस विरोध न करता, कलावंतांचं "सॉफ्ट टार्गेट' निवडलं. पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली यांची मैफल उधळणारी शिवसेना व "कलर्स' या वाहिनीला धमकावणारी मनसे यात फरक राहिलेला नाही.

"माय नेम इज खान'च्या प्रदर्शनाला शिवसेनेनं विरोध दर्शवला, राहुल गांधींविरुद्ध निदर्शनं केली, त्या वेळी मनसे शांत राहिली होती. आज मात्र मनसेनं पाकिस्तानी कलावंतांविरुद्ध भूमिका घेतली व शिवसेनेनं त्याची "री' ओढली. काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या "बिहारदिना'च्या वेळी राज यांनी वातावरणात सुरुंग पेरले, तेव्हा शिवसेना बघ्याच्या भूमिकेत होती. त्या वेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अत्यंत चतुराईनं परिस्थिती हाताळली व संघर्ष टाळला. आज राज यांनी संघर्ष उकरून काढला असताना, नितीशकुमार यांच्यासारख्या नेमस्त नेत्यानं राज यांना "सरफिरा' असं संबोधून वातावरणात आरडीएक्‍स ठासून भरलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका बिहारी मंत्र्यानं "राज यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला भरावा,' अशी मागणी केली, तेव्हा महाराष्ट्रात मनसेसमवेत महायुतीसाठी गोपीनाथ मुंडे-सुधीर मुनगंटीवार आग्रही असल्याचं त्या मंत्र्याच्या गावीही नसावं... संयुक्त जनता दलाचे जुने-जाणते, मूळचे समाजवादी नेते शिवानंद तिवारी यांनी तर "कॉंग्रेसचेच नेते महाराष्ट्रात "राजरूपी भिंद्रनवाले'ला जन्म देत आहेत,' असा आरोप केला...तर "ठाकरे घराणं मूळचं बिहारचं आहे,' असा जावईशोध कॉंग्रेसचे "पोपटराव' दिग्विजयसिंग यांनी लावला.

थोडक्‍यात, राज ठाकरे यांना जे पाहिजे, तेच घडत गेलं. वाहिन्यांच्या साक्षीनं वादग्रस्त व जहरी वक्तव्यं करायची, लोकांना "प्रोव्होक' करायचं, मराठी विरुद्ध परप्रांतीय, असा विरोध निर्माण करायचा आणि आपणच महाराष्ट्राचे व मराठीचे तारणहार असल्याचा भ्रम तयार करायचा, ही राज यांची व्यूहरचना आहे. "वेक अप सिद' या चित्रपटात नायिका कोंकणा सेन हिच्या तोंडात "बॉम्बे' हा शब्द येतो, तेव्हा त्याला मनसेनं आक्षेप घेतला. मग निर्माता करण जोहर राज यांना भेटला व नंतर चित्रपटात "मुंबई' असा उल्लेख करण्यात आला. पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याबद्दल शाहरुख खाननं केलेल्या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी हरकत घेतली व "माय नेम इज खान'च्या प्रदर्शनात अडथळा आणला. वातावरण थंडावल्यानंतर काही दिवसांतच "सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात या चित्रपटाची पूर्ण पान जाहिरात प्रसिद्ध झाली होती...!

"ठाकरे मूळचे भोर संस्थानातील पाली ह्या गावचे; पण आमचा नि पालकर ठाकऱ्यांचा आडनावापलीकडं फारसा संबंध कधीच आलेला नाही, घोडपकर असेही आमचे एक जादा आडनाव आहे; पण आमचे वडील किंवा ठाकरेबंधू या आडनावाच्या आडवळणाला फारसे कधी गेले नाहीत. नाशिक जिल्ह्यात घोडप किल्ला आहे. तेथे आमचे एक पूर्वज किल्लेदार होते', असं "प्रबोधन'कार ठाकरे यांनी "जीवनगाथा' ह्या त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं आहे.



"प्रबोधन'कारांचं वय 18 असतानाच त्यांचे वडील वारले. लहान-थोर दहा-बारा माणसांची जबाबदारी त्यांच्यावर पडली. खरं तर "प्रबोधन'कारांचं शिक्षण देवास इथं झालं. आज देवास (शास्त्रीय गायक दिवंगत कुमार गंधर्व यांचं गाव) मध्य प्रदेशात आहे. देवास संस्थानात त्यांचे मामा वकिली करायचे. ते "प्रबोधन'कारांना घेऊन देवासला गेले आणि त्यांनी तेथील व्हिक्‍टोरिया हायस्कुलात त्यांचं नाव दाखल केलं. धारचे लेलेमास्तर भूगर्भशास्त्रापासून ते मिल्टन, ऑलिव्हर गोल्डस्मिथ यांचं काव्य शिकवत. ऍनी बेझंट आदींची व्याख्यानंही तिथं होत असत. व्हिक्‍टोरिया क्‍लासमध्ये "प्रिन्सिपॉल गंगाधर नारायण शास्त्री, एम. ए.' यांच्यापुढं "प्रबोधन'कार प्रवेशासाठी गेले. तेव्हा त्यांनी सुरवातच इंग्लिशमधून केली...

देवासमध्ये सब कुछ हिंदी होतं. हिंदी, मराठी, उर्दू सगळ्या शाळांतलं शिक्षण मोफत होते. 1902 मध्ये देवासहून परतल्यावर पुढच्या सहा-सात वर्षांत अधिक शिक्षणासाठी आणि नंतर कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी "प्रबोधन'कारांनी नाना उद्योग केले. नोकरीसाठी आजूबाजूच्या गावांतून कुणीही तरुण आला, की ते त्याला वृत्तपत्राच्या कार्यालयात घेऊन जायचे. तिथं "वॉंटेड'च्या जाहिराती दाखवायचे आणि नोकरीसाठी अर्ज लिहून देण्याचं काम करायचे. मुंबईत नोकरीसाठी कुठून कुठून लोक येतात, हे "प्रबोधन'कारांना ठाऊक होतं. नाटकात शिरल्यानं त्यांनी महाराष्ट्रपर्यटन केलं आणि नाना उपक्रमांसाठी ते देशात इतरत्रही फिरले. त्यांना बऱ्याच भाषा यायच्या आणि लोकमान्यांपासून ते नाथमाधवांपर्यंत अनेकजणांशी त्यांचा परिचय होता. त्यामुळे त्यांची दृष्टी व्यापक झाली. याउलट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुळात फारसं फिरलेले नाहीत. त्यांचं वाचन चौफेर असलं, तरी दृष्टी व्यापक नाही. त्यामुळे 1969 मध्ये शिवसेनेनं "यंडूगुंडूं'ना "टार्गेट' करताना "मुंबईचा कलकत्ता होईल,' अशी गर्भित धमकीही दिली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी झगडतानाच "यंडूगुंडूं'च्या हॉटेलांचीही जाळपोळ केली गेली.

"बिहारनं मुंबई पोलिसांना गुन्हेगारांसाठी आत येऊ न दिल्यास आम्ही छत्रपतींच्या भूमीतले आहोत, हे दाखवून देऊ' असे उद्गार बाळासाहेबांनी काढले आहेत. नितीशकुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतले (रालोआ) एका पक्षाचे नेते असले, तरी "देशापेक्षा महाराष्ट्र मोठा,' ही शिवसेनेची लाईन आहे. दुर्दैवानं मनसेचं रूपांतर आता शिवसेनेत होऊ लागलं आहे. त्यामुळे बांगलादेश घुसखोरांविरुद्ध रस्त्यावर उतरणारे राज बिहारींनाही घुसखोर ठरवू लागले आहेत. राज हे "जर-तर'ची शब्दयोजना करत असले, तरी त्यांचे काही सहकारी मुंबईतील सगळ्याच बिहारींना घुसखोर मानत आहेत. अशा वक्तव्यांमुळं उद्या मुंबईत भाषिक दंगे झाले, तर त्यांना कोण जबाबदार असेल? गंमत म्हणजे, "पृथ्वीराज चव्हाण सरकारनं राज यांच्या प्रक्षोभक भाषणांकडं दुर्लक्ष करून सरकारी गव्हर्नन्स आउटसोर्स केलं आहे' असा आरोप करून नितीशकुमार यांनीही सुजाणपणाशी फारकत घेतलेली आहे. वास्तविक मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी हा केवळ मनसेच्या मागणीचा परिपाक नव्हता, तर एकूणच जनमताचं दडपणही होतं. हे दडपण "रिलीज' होण्यासाठी कारवाई करणं जरुरीचं होतं. काही वर्षांपूर्वी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ ह्यांनी बाळासाहेब ठाकरे ह्यांना अटक करून दाखवली खरी; पण तेव्हा शहरातलं टेन्शन वाढलं होतं. शिवाय ठाकरे ह्यांच्या अटकेनं साधलं काय? उद्या राज ह्यांच्यावर अशीच कारवाई केल्यास तिचे काय परिणाम होतील? बाबा-आबा मोठे होतील की राजच, ह्याचा डोकं शांत ठेवून विचार केला पाहिजे.राज ह्यांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला राजकीय आखाड्यात उतरावं लागेल. न्यायालयात खटले दाखल करून त्यांचा पाठपुरावा करावा लागेल. राज यांची भडक विधानं वाहिन्यांवरून किती व कशी दाखवावीत, हे माध्यमांनीही पाहिलं पाहिजे.

पण प्रश्‍न केवळ तेवढाच नाही. आज पश्‍चिम बंगाल सरकारवर टीका करणाऱ्या लेखक-पत्रकार-व्यंगचित्रकारांची "ममते'नं मुस्कटदाबी सुरू आहे. जयललिता यांच्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या कार्यकर्त्यांनीही असहिष्णुतेचं प्रदर्शन केलं होतं. आज श्रीलंकेतील पर्यटकांना तामिळनाडूत पाऊल ठेवण्याचीही भीती वाटत आहे. आसाममधील कोक्राझारमध्ये बोडो आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या संघर्षात देशातील विविध जाती-धर्मांचे लोकही भरडले गेले. या हिंसाचारानंतरच्या पाकिस्तानपुरस्कृत टेक्‍नो-अपप्रचारामुळे पुण्यापासून बंगळूरपर्यंत सर्वत्र ईशान्य भारतीयांची पळापळ सुरू झाली. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात परप्रांतीयांना मारहाण झाल्यामुळं पुणे, नाशिक, मुंबईतील भय्ये भयभीत होऊन आपापले गमछे तोंडासमोर धरून पलायन करते झाले...

बाळासाहेबांनी पूर्वी शीख समाजावर बहिष्कार टाकण्याची हाक दिली होती. "मुसलमानांनो, इथं राहायचं असेल, तर हिंदुस्थानचे नागरिक होऊन राहा' अशी त्यांची विधानं प्रसिद्ध आहेत. "आमच्या आघाडीचं सरकार केंद्रात आले, तर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा चुटकीसरशी निकाल लावू,' "मी पंतप्रधान झालो, तर आठ दिवसांत काश्‍मीर प्रश्‍न सोडवीन' अशीही त्यांची विधानं आहेत. राज यांच्यासमोर केवळ बाळासाहेबांचाच नव्हे, तर नरेंद्र मोदी यांचाही आदर्श आहे. सन 1969 वा 1992-93 मधले आक्रमक बाळासाहेब आधी मराठीहृदयसम्राट व मग हिंदुहृदयसम्राट झाले. शिवसेना मुंबईहून मराठवाडा-विदर्भापर्यंत विस्तारली. "विकासाचे मुद्दे घेऊन लोकप्रियता मिळणार नाही, तेव्हा बाळासाहेब वा मोदी यांच्याप्रमाणं प्रथम भावना पेटवण्याचं राजकारण करावं व मग सत्ता आल्यावर विकासाचं पाहू या,' ही राज यांची योजना दिसते. त्यामुळे मनसेचे काही आमदार व नगरसेवकही विकासाचं कोणतंही काम करत नाहीत. "निवडणुका आल्या की विकासाचा अजेंडा मांडू', असं राज म्हणतात. कार्यक्रमाच्या आधारे नव्हे, तर टाळ्याखाऊ भाषणांच्या आधारेच राजकारण करण्याचा व निवडणुकाही जिंकण्याचा हा प्रकार वैशिष्ट्यपूर्ण मानावा लागेल. इतरांना वगळणारं, हुल्लडबाजीचं, आगलावू राजकारण ही शिवसेनेची स्टाईल. राज ह्यांनी या राजकारणाला अभ्यासाची जोड दिली. पत्रकारांवर कधीही हात चालवला नाही, मराठी पुस्तकांची प्रदर्शनं भरवली, तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरं घेतली, हुशार व तळमळीची माणसं पक्षाशी जोडली.

उद्या राज यांचं नेतृत्व देशस्तरावरही फुलू शकतं. राज्याराज्यातल्या प्रादेशिक अस्मितांचे ते "सेंट्रल हीरो' बनू शकतात. ते बाळासाहेबांपेक्षाही मोठे होऊ शकतात; पण त्यासाठी त्यांनी बाळासाहेबांचे गुण घेताना दोष टाळले पाहिजेत. विद्वेषी, विखारी राजकारण सोडलं पाहिजे. मुंबईवर लोंढ्यांचा ताण येत आहेच; परंतु हा प्रश्‍न पायाभूत सुविधांशी जोडला पाहिजे. बिहार, उत्तर प्रदेशात जाऊन आपले मुद्दे तिथल्या जनतेला पटवून दिले पाहिजेत. मुंबई-पुणे-नाशिकमधील परप्रांतीयांचे मेळावे घेऊन त्यांना "मराठी संस्कृती म्हणजे काय,' हे प्रेमानं समजावून सांगितलं पाहिजे. त्यांना मराठी भाषा शिकवली पाहिजे.

राज्यात येणाऱ्यांची नोंद ठेवायलाच हवी; पण केरळात तशा फक्त हालचालीच सुरू आहेत. गोव्यात प्रतापसिंह राणे यांनी मुख्यमंत्री असताना ते करून दाखवलं; कारण गोव्यात परदेशी पर्यटकांवरील हल्ले वाढले होते. आपल्याकडं "आधार कार्डा'चा उपयोग करून लक्ष ठेवता येऊ शकतं.

मुंबईतील परप्रांतीयांची गुन्हेगारी वाढली आहे, हे कॉंग्रेस पक्षानंही मान्य करून टाकावं. सुरक्षारक्षक, मोलकरणी यांची माहिती पोलीस ठाण्यांना देण्याचं कर्तव्य हाउसिंग सोसायट्यांत राहणारे मध्यमवर्गीयही बजावत नाहीत. प्रगत देशांत नोंदी चोख असतात, त्यामुळे गुन्ह्यांचा शोध त्वरेनं लागतो. बिहार, उत्तर प्रदेशातील लोकांबद्दल शीला दीक्षित, पी. चिदंबरम यांनीही टीका केली होती. तिथले लोक नियम पाळत नाहीत, असं मत एका न्यायाधीशांनीही व्यक्त केलं होतं. तेव्हा हे फक्त राजच बोलतात असं नव्हे.

राज ठाकरे यांना लाखोली वाहणाऱ्यांनी आपल्या चुकांचाही विचार केला पाहिजे. तसा ते तो करत नाहीत. मनसेला वा मोदींना टार्गेट करून मुसलमानांमधील व बिहारींमधील मतं वाढतात, असं नितीशकुमारांना वाटतं. एकूण, राज व नितीशकुमार एकमेकांना वाढवत आहेत!

आज नागपूरसारख्या शहरात हा संघर्ष दिसत नाही. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा, बालाघाट, सिवनी या जिल्ह्यांमधील लोक नागपुरात येऊन रिक्षा चालवतात. छत्तीसगड मजूर बांधकामाच्या "साइट्‌स'वर दिसतात. भाजी मार्केटमध्ये छत्तीसगढी स्त्रिया टोपल्या उचलतात. चंद्रपूर, गडचिरोली ह्या जिल्ह्यांना लागून असलेल्या आंध्र प्रदेशातून शेकडो लोक नागपूरला येऊन चाटविक्रीचा व्यवसाय करतात. पाव-भाजी, पुलाव तयार करण्यात राजस्थानी, फळविक्रीत उत्तर प्रदेशी, तर भेळ-पुरीच्या व्यवसायात बिहारी आहेत.

मध्य प्रदेश व छत्तीसगड ह्या राज्यांतील काही शहरं पूर्वी मध्य प्रांताचा भाग होती. तिथल्या बऱ्याच मुली नागपुरातील घरच्या सुना होऊन सुखानं नांदत आहेत. त्यामुळे हिंदी भाषा नागपूरच्या जनजीवनाचा भाग आहे. वर्षानुवर्षं नागपुरी असणारे पंजाबी, सिंधी, हिंदी, गुजराती, दाक्षिणात्य आपापल्या भाषांत बोलतात व मराठीभाषकही एकमेकांशी हिंदीत बोलतात.

हे चांगलं की वाईट हा निवाडा कोण करणार? राज यांना विकास हवा असेल, तर या प्रक्रियेत स्थलांतरितांचा समावेश करावाच लागणार. कारण त्यांच्यामुळं वेतनावरचा खर्च कमी होतो. मनसेच्या धमक्‍यांमुळं इथले परप्रांतीय कायमचे गावी गेले, असं झालं नाही व होणारही नाही. आज अर्ध्या दादरवासीयांची मुलं-मुली युरोप-अमेरिका-ऑस्ट्रेलियात आहेत. त्यांनाही तिथून हाकलता येणार नाही.

मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा
हे समर्थ रामदास यांचं वचन आपल्याला ठाऊकच आहे. शिवाजीमहाराजांनी महाराष्ट्रात जी राज्यक्रांती घडवून आणली, त्यापूर्वी मराठी साधू-संतांनी सामाजिक क्रांतीनं महाराष्ट्रातील जनतेला जागृत केलं होतं. जन्ममूलक वर्णभेद, आचार, संप्रदाय, यज्ञयाग, कर्मकांडाच्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी हल्ला केला होता. संतांचं आवाहन माणुसकीसाठी होतं. राज यांनी मनसेला अवश्‍य मोठं करावं, स्वतःही मोठं व्हावं; पण महाराष्ट्राला कुठंही छोटेपण आणू नये. मराठीपण विस्तारावं आणि स्थलांतरितांचे प्रश्‍न आर्थिक-सामाजिक चौकटीतच सोडवावेत. नाहीतर "मनसे गयी मन से' असंच लोक म्हणतील!

महाराष्ट्रातच का?
न्या. महादेव गोविंद रानडे यांनी "मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष' या ग्रंथात विचारलं आहे , "भारतामध्ये येणाऱ्या प्रत्येक परकीय सत्तेशी टक्कर देण्याचा प्रयत्न प्रथम महाराष्ट्रातच का झाला?' याचं उत्तर त्यांनीच असं दिलं आहे, ""आपली स्वभावतःच ठेवण अशी आहे, की महाराष्ट्रातल्या लोकांचा उत्कर्ष झालाच पाहिजे. महाराष्ट्राच्या पश्‍चिमेस सह्याद्री आहे व उत्तरेस विंध्याद्री व सातपुडा. त्यांच्या दऱ्या-खोऱ्यातून उगम पावणाऱ्या व गोदावरी व कृष्णेला मिळणाऱ्या लहानसहान नद्यांचे जाळे आहे. बहुतेक टेकड्यांवरील किल्ल्यांमुळे महाराष्ट्राचा बचाव स्वभावतःच होतो. उत्तर हिंदुस्थानासारखी आपल्याकडील हवा कधी अती थंड तर कधी अती उष्ण नाही. हवा उत्साहजनक असून लोक सशक्त, काटक व काटेकोर आहेत. मराठी माणसाच्या अंगी स्वाभिमान, बाणेदारपणा तुडुंब भरलेला आहे. यालाच आम्ही मराठीपण म्हणतो.''

या मराठीपणाचे "महाराष्ट्र नवनिर्माण सेना'कृत प्रदर्शनीय सामने आपण अलीकडील काळात पाहिले आहेत; पण मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून निर्माण झालेली शिवसेना व तिच्या उदरातून जन्माला आलेली "मनसे' रोजगार, व्यवसाय, प्रशिक्षण याविषयी आज बोलत नाही



3 टिप्‍पणियां:

  1. राज यांनी मनसेला अवश्‍य मोठं करावं, स्वतःही मोठं व्हावं; पण महाराष्ट्राला कुठंही छोटेपण आणू नये. मराठीपण विस्तारावं आणि स्थलांतरितांचे प्रश्‍न आर्थिक-सामाजिक चौकटीतच सोडवावेत. नाहीतर "मनसे गयी मन से' असंच लोक म्हणतील!
    barobar aahe , nusta bhavnik mudda kay kamacha

    जवाब देंहटाएं
  2. aajchi pidhi baghun waet watte , shivaji maharaj ki jay mhanayla saglech jan tayar astat pan tyanche gun ghyala konich tayar nahi , maharaj parstree la matesaman manat hote aani aajche tarun mula he kartil ka ?

    जवाब देंहटाएं
  3. बिहारी वर काय बोलता ? कितीही झाले तरी ते भारतीय आहेत , बांगलादेशी , पाकिस्तानी विरुद्ध बोला जरा

    जवाब देंहटाएं