शनिवार, 27 अक्तूबर 2012

बाळासाहेबांच्या हाकेला राज ठाकरेंचा प्रतिसाद

बाळासाहेबांच्या हाकेला राज ठाकरेंचा प्रतिसाद
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, October 27, 2012 AT 03:45 AM (IST)मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या भावनिक हाकेला तत्काळ प्रतिसाद देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी "मातोश्री'वर धाव घेतली. सुमारे दीड तास राज "मातोश्री'वर उपस्थित होते. गेल्या महिन्याभरात प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज दुसऱ्यांदा "मातोश्री'वर आले होते.

दुपारी साडेबारा वाजता "मातोश्री'वर आलेले राज ठाकरे दोनच्या सुमारास "मातोश्री'च्या बाहेर पडले. पण त्यांनी या भेटीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. राज यांच्या भेटीच्या वेळी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेही उपस्थित असल्याचे समजते. पण ही कौटुंबिक बाब असल्याचे सांगत दोन्ही पक्षांच्या वतीने या भेटीची सविस्तर माहिती देणे टाळण्यात आले.

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी शिवसेनेचे दादर पडल्याचे दुःख व्यक्त केले होते. मनसेचे नाव न घेता मराठी मतांचे तुकडे पाडल्यानेच हा पराभव झाल्याची खंत व्यक्त करून यापुढे मराठी माणसाने एकजुटीने शिवसेनेच्या मागे उभे राहण्याचे भावनिक आवाहन केले होते. ही हाक केवळ मराठी माणसालाच नव्हे, तर मनसेचे अध्यक्ष राज यांच्यासाठीही होती, असे मानले जात होते. विशेष म्हणजे या हाकेला प्रतिसाद देत राज तत्काळ "मातोश्री'वर दाखल झाल्याचे पाहावयास मिळाले. दसरा मेळाव्यात "मला आता चालवतही नाही,' असे उद्‌गार बाळासाहेबांनी काढताच शिवाजी पार्कवरील लाखो शिवसैनिकांच्या जिवाची घालमेल झाली होती. एरवी मेळाव्यानंतरही घोषणांनी दुमदुमणारा शिवाजी पार्क बाळासाहेबांच्या भाषणानंतर मात्र यंदा निःशब्द झाल्याचे पाहावयास मिळाले होते. अशा वेळी राज यांनी बाळासाहेबांची घेतलेली भेट ही राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें