शनिवार, 1 दिसंबर 2012

ठाकरे बंधू एकत्र येतील

ठाकरे बंधू एकत्र येतील
 

 ः सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 02, 2012 AT 02:30 AM (IST)
गोपीनाथ मुंडे यांना विश्‍वास
मुंबई- "मंत्रालयावर भगवा झेंडा फडकविण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील,' असा ठाम विश्‍वास भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केला. "दोघांची शिवसेनाप्रमुखांवर प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात वेगळे राजकीय चित्र दिसेल,' असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर प्रथमच मुंडे यांनी असा विश्‍वास व्यक्त केला. त्याला अनेक राजकीय अर्थ आहेत.
"राजकारणात कोणीच कोणाचा फार काळ शत्रू आणि मित्र नसतो. अनेक वेळा तत्त्वावर मतभेद असल्यामुळे तणाव निर्माण होतो; परंतु शिवसेनाप्रमुखांबद्दल मनाने दोघेही ठाकरे बंधू एकत्र येतील,' असेही मुंडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, "राज्यातील आघाडी सरकार घालवून 2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या मंत्रालयावर भगवा झेंडा मला पाहायचा आहे, अशी जाहीर इच्छा बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळा व्यक्‍त केली होती. हे त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी दोघे ठाकरे बंधू एकत्र यावेत, अशी इच्छा माझ्यासह लाखो कार्यकर्त्यांची आहे.'
"राज ठाकरेंना महायुतीत आणले तर रिपाइंचा विरोध असेल, असे वक्‍तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. याबाबत विचारले असता मुंडे म्हणाले, "इंदूमिल प्रश्‍नी आठवले यांची नाराजी होती; परंतु आता इंदूमिल प्रश्‍न सुटणार असल्यामुळे त्यांचा विरोध राहणार नाही. काही मतभेद असतील तर आपण दोघांशी चर्चा करू आणि मार्ग काढू; परंतु सरकारला घालविण्यासाठी राज ठाकरे महायुतीत असावेत, अशी हजारो कार्यकर्त्यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्‍त केली आहे.'

"आघाडी सरकार हटविणे हीच बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे. त्यामुळे दोघे बंधू एकत्र येण्याची कार्यकर्त्यांची मागणी आणि आम्हा सर्वांचे प्रयत्न यशस्वी होतील,' असा विश्‍वास श्री. मुंडे यांनी व्यक्‍त केला.

"ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी मी पुढाकार घेईन. या वेळी काहीतरी सकारात्मक निर्णय होईल. जनमताचा आदर आम्हा नेते मंडळींना करावाच लागतो. त्यामुळे मी आशावादी आहे,' असेही खा. मुंडे यांनी सांगितले