गुरुवार, 10 जनवरी 2013

नववर्षाच्या सुरुवातीलाच उद्धव व राज 'ऍक्‍शन'मध्ये

नववर्षाच्या सुरुवातीलाच उद्धव व राज 'ऍक्‍शन'मध्ये

राजेश मोरे - सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, January 11, 2013 AT 02:45 AM (IST)
मुंबई- शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच अधिक जोमदारपणे पक्षात आक्रमक झाले आहेत. उद्धव यांनी पक्षशिस्त धाब्यावर बसविण्याचा ठपका ठेवून नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांना थेट बाहेरचा रस्ता दाखविला आहे; तर राज यांनी रस्ते आणि आस्थापना संघटनेनंतर मनसेच्या नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बरखास्तीचा मार्ग दाखविला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत कोणत्या पद्धतीने निर्णय होणार, याकडे शिवसैनिकांसह इतरांचेही लक्ष आहे. कोकणातील शिवसेनेचा एक चेहरा असलेले परशुराम उपरकर मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, पण उपरकर यांनी जाहीरपणे अद्याप त्यांची भूमिका मांडली नसल्याने ते शिवसेनेतच असल्याचे मानले जात आहे. तसेच आज शिवसेनाभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत विधिमंडळ नेते सुभाष देसाई यांनी उपरकर यांच्याशी आमचा संवाद असल्याने हा विषय तूर्त थांबविल्याचे संकेत दिले.

नाशिकमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनी नाशिकच्या जिल्हाप्रमुख आणि महापालिकेतील नेत्यांसह पक्षनेतृत्वाबद्दलही आक्रमक भाषा वापरल्याची माहिती "मातोश्री'वर पोहोचली होती. नाशिकमध्ये मनसेचा वारू चौफेर उधळून थेट महापौरपद मनसेकडे गेल्याने आधीच शिवसेनेत चिंतेचे वातावरण असताना या गटातटाचा फटका पुढे ऐनवेळी बसू नये यासाठी या विषयाचा थेट "निक्काल' लावून भविष्यात मीडियाच्या साक्षीने पक्षनेतृत्वाला लक्ष्य केल्यास त्यांना याच मार्गाने जावे लागणार असल्याचा इशारा यानिमित्ताने उद्धव यांनी पक्षातील नेत्यांना दिल्याचे मानले जात आहे.

राज ठाकरे यांनीही पक्षबांधणीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. फेब्रुवारीत राज्याचा दौरा सुरू करण्याबरोबरच त्यांनी पक्षामधील वादग्रस्त पदाधिकाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखविला आहे. एकीकडे हर्षवर्धन जाधव यांनी पक्षनेतृत्वावर थेट टीका करीत मनसेचा राजीनामा दिल्यावरही त्याची दखल राज यांनी घेतली नाही. त्याच वेळी पक्षांतर्गत तक्रारीची दखल घेऊन रस्ते आस्थापनेनंतर वाहतूक सेनेच्या अध्यक्षांचा अपवाद सोडून इतरांना घरचा रस्ता दाखविला आहे. तसेच यापुढील कोणतीही नेमणूक परस्पर न करण्याचा आदेश दिला आहे. काही दिवस शिवसेनेसह मनसेच्या गोटातही शांतता होती, पण आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला दोन्ही पक्षांनी नवी सुरुवात पक्षातून आक्रमकपणे केल्याचे दिसते आहे.

2 टिप्‍पणियां: