रविवार, 24 मार्च 2013

जनतेचा कुणीही वाली राहणार नाही - राज

जनतेचा कुणीही वाली राहणार नाही - राज
 

- सकाळ वृत्तसेवा
Monday, March 25, 2013 AT 02:00 AM (IST)
अमरावती - राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारने जनतेला गृहीत धरले आहे. निवडणुकीच्या तोंडावर पैसा आणि जातीचे शस्त्र उगारून मते मागितली जातील. येणाऱ्या निवडणुकीत पैसा आणि जातीच्या परत आहारी जाल, तर राज्यातील जनतेला कुणीही वाचवू शकणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

संपूर्ण विदर्भाचा दौरा केल्यानंतर राज ठाकरे यांच्या दौऱ्याची सांगता रविवारी (ता.24) अमरावतीमधील सभेने झाली. या सभेने अमरावतीतील गर्दीचे सारे उच्चांक मोडीत काढले. यापूर्वी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेपेक्षा राज ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाल्याने जिल्ह्यात तुलनात्मक चर्चाही सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी या सभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

राज्यातील सरकारने इतक्‍या घाणेरड्या गोष्टी करून ठेवल्या आहेत की, त्यापैकी नेमक्‍या किती गोष्टी अमरावतीत जनतेपुढे मांडायच्या, असा प्रश्‍न पडल्याचे ते म्हणाले. सिंचनाच्या मुद्द्यावर त्यांनी विविध पुराव्यांचा हवाला देत 70 हजार कोटी रुपये गेले कुठे?, हे विचारण्याची वेळ आता आली असल्याचे सांगितले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वीज, पाणी, शेती आदी विषयांवर मत व्यक्त केले आहे. हे करायचेय, ते करायचेय, असे ते सांगत आहेत. परंतु, इतक्‍या वर्षांपासून सत्ता यांच्या हातात असताना सिंचनाचे प्रकल्प अपूर्ण राहिलेच कसे, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेल्या 14 वर्षांपासून पाच मोठी खाती आहेत. तरीही आज विदर्भाची ही स्थिती आहे, असा आरोप करीत विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा पाढाच राज ठाकरे यांनी वाचला.

2009 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका व्हायच्या आधी या सरकारने 25 हजार 856 कोटी किंमत असलेले सिंचन प्रकल्प मंजूर केले आणि कंत्राटदारांना आगाऊ पैसेदेखील दिले. हे पैसे राज्यकर्त्यांच्या खिशात जात असून, यांच्याकडूनच मराठवाडा आणि विदर्भ भकास केला जात असल्याचा आरोप श्री. ठाकरे यांनी केला. अमरावती जिल्ह्यातील एका वीज प्रकल्पामुळे सिंचन आणि पिण्याचे पाणी जाणार असेल, तर उद्यापासून आंदोलने झालीच पाहिजेत, असे आव्हान त्यांनी केले.

विधानभवनात पोलिस उपनिरीक्षकाला झालेल्या मारहाणीत मनसेचा आमदार असला तरी कारवाई कठोर झालीच पाहिजे, असे सरकारला मी सांगितले. सरकारने पाच आमदारांना निलंबित केले. परंतु, गुन्हे फक्त दोघांवर दाखल केले. विशेष म्हणजे, त्या मारहाणीत 15 ते 20 आमदार असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने स्वतःचे आमदार वाचवले. अर्थसंकल्पाला विरोध होऊ नये म्हणून त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. मुळात पोलिसांवर हात उगारणेच चुकीचे आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी अमरावती येथील सभेतही केला.

बेरोजगारीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर असताना विदर्भात परप्रांतीयांना नोकरीच्या संधी दिल्या जात आहेत. पण, इथले लोकप्रतिनिधी गप्प बसले आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतून 1379 मुली पळवल्या गेल्या. त्यापैकी 886 मुलींचा शोध लागला. पण, इतर मुलींचे काय झाले, हे कोणालाच माहिती नाही. तरीही राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील राज्यात सगळे आलबेल असल्याचे सांगत असल्याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. मध्यंतरी ज्येष्ठ उद्योजक रनत टाटा यांच्यासोबत झालेल्या भेटीत ताडोबात "रिसॉर्ट' काढण्याची विनंती त्यांना केली. ताडोबात वाघ दाखविण्याचेदेखील पैसे मिळतात, हे जेव्हा कळेल तेव्हा वाघांच्या हत्या बंद होतील, असा विश्‍वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

राज्यात एक जागा अशी नाही की, जी चांगली राहिली. या सरकारच्या काळात सगळं बरबटल्याचा आरोप त्यांनी केला. पिण्याच्या पाण्याचा नियमभंग कोणी केला, शेती पिकाला भाव का नाही, चांगले शिक्षण का नाही, असा प्रश्‍न राज्य मंत्रिमंडळाला विचारीत पिण्याच्या पाण्याचा भंग कोणी केला, शेती पिकाला भाव का नाही, चांगले शिक्षण का नाही, असा मुद्दा उपस्थित करीत राज्य मंत्रिमंडळ याचे उत्तर देणार का, असा प्रश्‍न राज ठाकरे यांनी केला. प्रत्येकाचा भंग राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार करणार आणि हेच हक्कभंग आणणार. किती वर्षे हे करायचे ते सांगा? इतके राजकीय पक्ष आले आणि ते तसेच निघाले. पण, राज ठाकरे तसा नाही. त्याचा स्वीकार करा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील शेतकऱ्यांना आणि जनतेला सरकार भाव देत नाही. त्यामुळे कृषिमालाला भाव नाही. जनतेच्या समस्यांनादेखील किंमत नसल्याचा आरोप त्यांनी केल्या. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गो-शाळा सुरू करायच्या असल्याचे सांगत "आमची पिल्लं' कसायांकडे जाता कामा नये, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

सभेच्या व्यासपीठावर आमदार बाळा नांदगावकर, आमदार प्रवीण दरेकर, मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर, अरविंद गावंडे, रिटा गुप्ता, पप्पू पाटील, माजी आमदार ज्ञानेश्‍वर धाने पाटील आदी उपस्थित होते.

मी जणू काही इनडोअर प्लांटच
राज्यात पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर विदर्भाचा दौरा केला. चंद्रपुरातून आल्यानंतर डॉक्‍टरांनी दोन दिवस आराम करायचा सल्ला दिला आणि खर्डेघशी सुरू झाली. मी काही जणू "इनडोअर प्लांट' असल्यासारखा ऊन, वारा, थंडी, पावसाची तमा बाळगत नसल्याचे सांगत राज ठाकरे यांनी काही नेत्यांची टिंगलही उडविली.

...अन्‌ राज खुर्चीवर बसले
सभेच्या सुरुवातीला मनसेच्या काही नेत्यांची भाषणे झाली. सव्वासातच्या सुमारास राज ठाकरे यांचे आगमन होताच टाळ्यांच्या गजरात आणि घोषणाबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. राज ठाकरे बोलायला उभे राहिले. पण, गोंधळ थांबत नसल्याचे बघताच जोपर्यंत हे थांबणार नाही, तोपर्यत मी बोलणार नाही, असे सांगत परत खुर्चीवर जाऊन बसले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें