शुक्रवार, 7 जून 2013

युतीतील नाट्याचा फिरता रंगमंच!

युतीतील नाट्याचा फिरता रंगमंच!
- पद्मभूषण देशपांडे
शनिवार, 8 जून 2013 - 12:45 AM ISTयुतीच्या राजकीय नाट्याचे कथानक अनपेक्षित वळणे घेत आहे. अद्याप लोकसभा निवडणुकाही जाहीर झालेल्या नाहीत, तोवर युतीने विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजप व रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येकी एक असे दोन उपमुख्यमंत्री, असे वाटप करून टाकलेले दिसते!

"निवडणूक येईल तेव्हा तुम्ही मागाल तेवढ्या जागा देऊ. वाटलं तर दोन-चार जास्त देऊ; पण तोवर गप्प बसायचं काय घ्याल,' असे युतीतल्या कोणा तरी नेत्याने म्हणण्याची वाट रामदास आठवले पाहतायत की काय कोणास ठाऊक! जेव्हा उद्धव ठाकरेंनी टाळीसाठी हात पहिल्यांदा पुढे केला, तेव्हा राज ठाकरे यांनी तो ठोकरला. एकीकडे मुंबईत असा प्रस्ताव नाकारत असताना अमरावतीला सभेसाठी गेले असता राज यांना अचानक उपरती झाली आणि तिथूनच त्यांनी नाशिक, ठाणे, कल्याण आणि भिवंडीत शिवसेनेला महापालिकेत मदत करण्याची तयारी दाखवली. तटस्थ राहून अप्रत्यक्ष मदत करण्यापेक्षा थेट मतदान करूनच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्तेत भागीदारी केली पाहिजे, असा नवा विचार त्यांनी स्वतःहून मांडल्याचे सांगितले जाते. ठाण्याच्या स्थायी समितीच्या अध्याक्षांची निवड अद्याप न्यायालयात अडकली आहे. त्यामुळे तिथली भागीदारी राहिली. मात्र, अन्य तीनही ठिकाणी शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन सत्तेची पदे मटकावली. हे सगळे घडले तेव्हा आठवले युतीतच होते अन्‌ राज यांच्या युतीतल्या सहभागाला विरोध करत होते! आठवले आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येत होते, युतीच्या गर्जना करत होते. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला आठवले राज यांच्या म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीतल्या प्रवेशाला विरोध करत होते. शिवसेना आणि मनसे त्याच वेळी सत्तेत भागीदारी करत होते. आठवले यांना हे कळत नव्हते की समजत नव्हते?

आठवले यांना रिपब्लिकन पक्षासाठी लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या 35 जागांचा वाटा युतीत हवा आहे. गेले तीन-चार महिने ते याच आकड्याचा जप करताहेत. गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांबरोबर झालेल्या भेटींमध्ये आठवलेंनी आपला हा आकडा काही सोडला नाही. अगदी सुरवातीला उद्धव यांच्याकडेही त्यांनी तीच मागणी केली होती. मनसे युतीमध्ये आली तर त्यांनाही त्यांचा वाटा द्यावा लागणार. त्यातून आपल्या वाट्यावर अतिक्रमण होणार. शिवसेना आणि भाजप आधीच आपल्या वाट्याविषयी काही बोलत नाहीत; त्यात मनसेने उडी घेतली तर आपला दावा आणखी कमजोर होईल, या विचाराने आठवले मनसेला युतीत येण्याला विरोध करत होते. पण दरम्यानच्या काळात काय जादूची कांडी फिरली कळेना. आठवलेंनी राज ठाकरे यांना युतीत येण्याचे आमंत्रण द्यायला अचानक सुरवात केली. शिवसेना आणि आठवले यांच्यात काही ठरले असावे आणि त्यातूनच आठवलेंचे आमंत्रण आले असावे, असे वाटत असतानाच शिवसेनेच्या "सामना'तून आठवलेंची झाडाझडती घेण्यात आली. "चौथा कशाला?' असे विचारता विचारताच या अग्रलेखाने भाजपचे दिल्लीतील नेते "तिसरा तरी कशाला?' असा प्रश्‍न विचारत असल्याचे उघड केले. भाजपचे महाराष्ट्रातले नेते मनसेच्या मतांच्या बेरजेसाठी गळ टाकून बसले आहेत; पण दिल्लीतल्या नेत्यांना मात्र मनसेच्या महाराष्ट्रातील बेरजेने महाराष्ट्राबाहेर वजाबाकी घडेल, अशी भीती वाटते आहे. रिपब्लिकन पक्षाला बरोबर घेऊन असा काय फायदा होणार आहे, आपल्या मतदाराला अशी युती पचनी पडेल काय, असे प्रश्‍न भाजपच्या नेत्यांना अजूनही आहेत. "तिसरा तरी कशाला' हा प्रश्‍न त्यातूनच येत असावा. आठवलेंनी स्वतःचा जागांचा धोशा कमी करावा यासाठी शिवसेनेने पद्धतशीरपणे भाजपचा प्रश्‍न पुढे टाकून आठवलेंना "बॅकफूट'वर ढकलण्याचा प्रयत्न केला.
-->

आता आठवले पुन्हा एकदा "मनसे नकोच' असे म्हणू लागले आहेत. भाजपच्या नेत्यांनीही राज यांना भेटू नये, त्यातून भांडणे वाढतात, असा आठवले यांचा सल्ला आहे. आठवले यांच्या या नव्या साक्षात्काराने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा काही तरंग उठले आहेत. आठवले "पोटात एक आणि ओठात एक' असे करू शकत नाहीत, हे राजकारणात सगळ्यांनाच माहीत आहे. आठवले यांच्या प्रामाणिक सरळपणाबद्दलही कुणाला शंका नाही. त्यामुळे आठवले जे बोलतात त्यातून युतीमध्ये नक्की काय चालले आहे याचा थोडा फार अंदाज येतो. मध्यंतरी अहल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त नगर जिल्ह्यात चौंडी येथे बोलताना आठवले यांनी मुंडे यांच्या उपस्थितीत "मी उपमुख्यमंत्री होणार' अशी घोषणाच करून टाकली. याचा अर्थ आठवले यांना युतीमध्ये उपमुख्यमंत्रिपद देऊ केले असणार. शिवसेना किंवा भाजपला रिपब्लिकन मते हवी आहेत. आठवले यांच्या युतीत असण्याने त्यातला काही तरी वाटा निश्‍चित मिळेल, असा युतीच्या नेत्यांचा अंदाज आहे. त्यामुळे "नसण्यापेक्षा असलेले काय वाईट?' या न्यायाने युतीचे नेते आठवले यांना झुलवताहेत.

रिपब्लिकन उमेदवारांनी युतीचे उमेदवार म्हणून युतीतून निवडणूक लढवली तरी युतीची मते त्यांना मिळणार नाहीत याबाबत उद्धव, मुंडे आणि आठवले या तिघांमध्येही एकमत आहे. मग आठवले यांना काही जागा देऊन त्या गमावण्यापेक्षा लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्यक्ष रणमैदानात शिवसेना आणि भाजपचे उमेदवार लढले, त्यांना रिपब्लिकन मते मिळाली तर युतीच्या एकूण जागा वाढतील. त्या वाढीव जागांच्या बळावर आठवलेही उपमुख्यमंत्री होऊ शकतील, असे हे गृहीतक असणार. युतीने घालून दिलेल्या पायंड्यानुसार लोकशाही आघाडीने उपमुख्यमंत्री कायम करून टाकला. आता पुन्हा सत्ता मिळालीच तर दोन उपमुख्यमंत्री करून टाकू, असे युतीच्या नेत्यांनी ठरवले असावे. आठवले त्याशिवाय उपमुख्यमंत्रिपदाची भाषा जाहीरपणे बोलणार नाहीत. म्हणजे अद्याप लोकसभा निवडणुकाही जाहीर झालेल्या नाहीत, तोवर युतीने विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजप व रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येकी एक असे दोन उपमुख्यमंत्री, असे वाटप करून टाकलेले दिसते!!

आठवले यांच्या जाहीर वक्तव्यांनी अनेकदा करमणूक होते. आताही ते ज्या वेगाने भूमिका बदलताहेत त्यामुळे युतीच्या राजकीय नाट्याचे कथानक जी अनपेक्षित वळणे घेत आहे, त्यामुळे हमखास करमणूक होते आहे. उद्धव ठाकरे 18 जूनपर्यंत परदेशात आहेत. ते येईपर्यंत आठवले युती नाट्याला आणखी एखादे वळण तर देणार नाहीत ना? शिवसेनेतले नेते मात्र त्यांची "18 जूनपर्यंत तरी काही बोलू नका', अशी मनधरणी करत असतील

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें