बुधवार, 22 जनवरी 2014

'राज' इफेक्‍टमुळे हलली सारी "मनसे'

महापौरांसह नगरसेवक रस्त्यावर, रामकुंडाची अडीच तास पाहणी, महापालिकेकडे वळले नगरसेवकांचे पाय
नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (ता. 21) केलेल्या झाडाझडतीचा महापौरांसह नगरसेवकांवरही चांगलाच इफेक्‍ट झाला असून, मुंबईवारीनंतर लगेचच महापौरांसह नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात रस्त्यावर उतरून कामाला सुरवात केली आहे. महापौर ऍड. यतीन वाघ यांनी आज अधिकाऱ्यांचा ताफा घेऊन रामकुंड परिसराची पाहणी करत स्वच्छतेसाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. रामकुंडावरील ड्रेनेजलाइन साफ करण्यासह तीन सुलभ शौचालयांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. दुसरीकडे "मनसे'च्या नगरसेवकांनी कामांचा पाठपुरावा सुरू केला आहे.

नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगिरीवर नाराज असलेल्या राज ठाकरे यांनी काल महापौरांसह सर्व 38 नगरसेवकांना "कृष्णकुंज'वर पाचारण केले होते. झाडाझडतीत महापौरांसह नगरसेवकांना आक्रमक होण्याचे आदेश दिले. "जनतेची साधी कामे होत नसतील, तर सत्ता काय कामा'ची असा सवाल करत दोन महिन्यांत इफेक्‍ट दाखविण्याचेही आदेश दिले.

महापौर ऍड. यतीन वाघ यांनी आज सकाळी महापालिकेचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांच्यासह आरोग्य अधिकारी व इतर अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन रामकुंडावरील स्वच्छतेची पाहणी केली. थेट नागरिकांची भेट घेऊन तेथील समस्या जाणून घेत उपाययोजनांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तब्बल अडीच तास महापौरांनी रामकुंडावरील भाजीबाजार, रामसेतूचा परिसर पिंजून काढला. होळकर पुलापासून गाडगे महाराज पुलापर्यंतच्या परिसरात फिरून महापालिकेच्या सुरू असलेल्या कामांची उभे राहून पाहणी करत आढावा घेतला. भाजीबाजारातील गल्ली-बोळात घुसून त्यांनी उपाययोजनांची पाहणी केली. गोदेच्या स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या संबंधित ठेकेदारांना अधिकाऱ्यांनीही तत्काळ बोलावून घेत त्यांचीही हजेरी घेतली. "आपण उद्या परत येऊ', असे सांगत त्यांनी महापालिकेत येऊन गोदावरीवरील उपाययोजनांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

रामकुंडावर वाढविणार सुलभ शौचालय
नागरिकांनी रामकुंड परिसरात अस्वच्छतेसंदर्भात सर्वांत जास्त तक्रारी या वेळी महापौरांपुढे मांडल्या. परिसरातील नागरिकांसह भाजीबाजारातील विक्रेते रामकुंडाच्या आजूबाजूलाच कचरा टाकतात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरते, तर गोदेच्या पश्‍चिम भागावर शौचालय नसल्याने उघड्यावरच येथील नागरिक शौचास बसतात. नागरिकाच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर महापौरांनी तीन सुलभ शौचालयांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनाला जागेवरच दिले. दत्तकोट, बालाजीकोट आणि रामसेतूजवळ "पे ऍण्ड यूज' तत्त्वावर शौचालय उभारण्यात येणार आहे. तसेच रामकुंड परिसरातील ड्रेनेजलाइन तुंबल्याने गटारी फुटून पाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे जेट मशिनच्या मदतीने नदीच्या दोन्ही बाजूंच्या ड्रेनेजलाइनमधील गाळ काढण्याचे आदेश त्यांनी दिले. होळकर पूल ते टाळकुटेश्‍वर मंदिरापर्यंतच्या ड्रेनेजलाइनमधील गाळ काढण्यात येणार आहे.

"मनसे' नगरसेवक सक्रिय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जवळपास सर्वच नगरसेवकांनी आपल्या प्रभागावर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला. आपल्या प्रभागातील समस्यांची यादी करण्यातच आज नगरसेवक व्यस्त होते. विशेष म्हणजे तत्काळ सुटणाऱ्या समस्यांसाठी त्यांनी थेट महापौरांकडेच कामांचा तगादा लावल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. महापौरांनीही आक्रमकता दाखवत अधिकाऱ्यांना केबीनमध्ये बोलावत कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले.

-----------------------------------------------------
"रामकुंडावर नदीच्या पश्‍चिम भागात एकही शौचालय नाही. महिलांनाही शौचालयात जाण्याची व्यवस्था नाही, तर पूर्व भागातील शौचालयात लघुशंकेचेही पैसे घेतात. त्यामुळे नागरिक उघड्यावरच लघुशंका करतात.'
इरफान पठाण, स्थानिक
-----------------------------------------------------
"नदीवर कचरा टाकण्यासाठी तीन संकलन केंद्रे वाढवणे व तीन सुलभ शौचालय नव्याने तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच दोन्ही बाजूंच्या ड्रेनेजलाइनमधील साचलेला गाळ बकेट व जेट मशिनने स्वच्छ करण्यात येणार आहे.'
ऍड. यतीन वाघ, महापौर

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें