रविवार, 26 जनवरी 2014

टोलला 'मनसे'विरोध, 'राजा'ज्ञेने तोडफोड

कुठेही टोल भरू नका, टोलनाक्यावर कोणी अडवलं तर त्याला तुडवा, टोलवसुली करू देऊ नका, वाहतूक कोंडी झाली तरी चालेल, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आदेश देताच त्याचे पडसाद लगेच उमटले. मनसे कार्यकर्त्यांनी राज यांचे नवी मुंबईतले भाषण संपताच ऐरोली टोलनाक्यावर तोडफोड केली. ऐरोली नंतर मुंबई, ठाणे, कल्याण, सांगली आणि नागपूर येथे मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवर तोडफोड केली.

राज यांच्या भाषणानंतर लगेच राडा करुन मनसेने आपणही टोलच्या टोलवाटोलवीचे राजकारण करणार असल्याचे कृतीतून दाखवून दिले आहे. याआधी कोल्हापूरमध्ये टोलवसुली विरोधात हिंसक आंदोलन झाले. या आंदोलनाला शिवसेनेकडून पाठिंबा मिळाला. नंतर शिवसेनेने ठिकठिकाणी रस्त्यांवर खासगी कंपन्यांकडून होणा-या टोलवसुलीला विरोध करण्याचे संकेत दिले. शिवसेनेच्या भूमिकेला नागरिकांचा पाठिंबा मिळण्याची चिन्हे दिसताच राज यांनी जुनेच टोलविरोधाच्या आंदोलनाचे अस्त्र नव्याने बाहेर काढले.

नवी मुंबई येथे मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या राज यांनी टोलवसुलीला जाहीर विरोध केला. जोपर्यंत टोल कशासाठी घेतला आणि त्याचा काय उपयोग केला? हे सांगितले जात नाही तोपर्यंत टोल देऊ नका, अशा स्वरुपाची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. टोलवसुलीसाठी कोणी अडवल्यास त्याला तुडवा, वाहतूक कोंडी झाली तरी टोल बिलकूल देऊ नका; असे राज ठाकरे म्हणाले.

सरकार खासगी कंपन्यांना हितसंबंध जपण्यासाठी टोलवसुलीची परवानगी देते. या टोलच्या बदल्यात नागरिकांना प्रवास सुरळीत आणि सुरक्षितपणे व्हावा म्हणून किमान सुविधाही मिळणार नसतील तर टोल देण्याची गरज काय?, अशा स्वरुपाची भूमिका राज यांनी आधीच मांडली होती. याच भूमिकेचा पुनरुच्चार करत राज यांनी टोल विरोधाचे राजकारण तीव्र केले आहे. लोकसभा निवडणूक जवळ येत असताना राज यांनी टोल विरोध सुरू केला आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातली टोलवसुली पूर्णपणे बंद करता येणार नाही, अशा स्वरुपाचे वक्तव्य केले आहे. राज्यात टोलचे राजकारण नव्याने जोर धरणार असे चित्र दिसत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें