रविवार, 2 फ़रवरी 2014

खऱ्या कलावंतांकडेच वेगळा "अँगल' - राज ठाकरे

पुणे - ""एखादी दर्जेदार कादंबरी लेखक शब्दबद्ध करतो किंवा एखादा चित्रकार प्रभावी व्यंग्यचित्र रेखाटतो. कारण, त्या कलावंतांकडे मुळातच वेगळा "अँगल' असतो. त्यामुळेच, उत्तम कलाकृती तयार होते. पण, त्या जन्माला येण्याआधी कलावंताला कल्पना सुचते कशी, हे फार महत्त्वाचे आहे. पण, ते शब्दांत सांगता येत नाही,'' असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

"ग्रंथाली'च्या समारंभात समीरण वाळवेकर लिखित "चॅनल 4 लाइव्ह' कादंबरीचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते झाले. दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, साहित्यिक अरुण साधू, "सकाळ' (मुंबई)चे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे, पत्रकार राजीव खांडेकर उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ""दर्जेदार कलाकृती पुनःपुन्हा पाहायला मिळत नाहीत. म्हणूनच, "सिंहासन'सारखा चित्रपट पुन्हा रसिकांसमोर आला नाही. "चॅनल 4 लाइव्ह' ही कादंबरीसुद्धा वेगळा दृष्टिकोन ठेवूनच लिहिली गेलेली आहे.''

डॉ. पटेल म्हणाले, ""समाजातील गंभीर प्रश्‍न सोडून देऊन माध्यमांमध्ये वेगळेच प्रश्‍न हाताळले जात आहेत. अशा स्थितीत एकमेकांमध्ये स्पर्धाही वाढली आहे. त्यामुळे समाजात मानसिक चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. लोकशाहीला धक्का लागेल असे वर्तन माध्यमांच्या हातून होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी.''

साधू म्हणाले, ""पूर्वी माध्यमांची प्रतिमा साजूक होती. ती आता धक्कादायक, भीतीदायक झाली आहे. राजकारणाचे क्षेत्र जेवढे कुरूप आहे तेवढेच ते माध्यमांचेही झाले आहे. त्यामुळेच, लोकशाही धोक्‍यात आली आहे. हे चित्र बदलायचे असेल, तर दोनही क्षेत्रात संयम नियंत्रणाची आवश्‍यकता आहे.'' कॅमेऱ्यामागचे जग लोकांसमोर यावे, हा उद्देश ठेवून मी ही कादंबरी लिहिली, असे वाळवेकर यांनी सांगितले.

जे काही बोलायचे ते रविवारी... सभागृहात पोलिस बसले होते. काही पोलिस सर्व घटना लिहूनही घेत होते. हे चित्र व्यासपीठावरील ठाकरे यांनी बरोबर टिपले. आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच याकडे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत ते म्हणाले, ""इथं पोलिस का आलेत, हे मला माहीत नाही. पण, मी कुठं सापडतोय का, हे पाहण्यासाठीच ते इथं आले असावेत. मी असा-तसा नाही सापडणार. मला जे काही बोलायचं आहे, ते मी याच पुण्यात बोलेन. पण, येत्या रविवारी (ता. 9) होणाऱ्या जाहीर सभेत.''

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें