मंगलवार, 11 फ़रवरी 2014

आज रस्त्यावर 'राज'

टोलप्रश्‍नी राज्यातील महामार्गांवर मनसेचा "रास्ता रोको'

मुंबई- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयातून टोलवसुलीवर चर्चा करण्याचे आमंत्रण देण्यात आले असले तरी यापूर्वीही चर्चेतून टोलवसुलीवर मार्ग निघाला नसल्याने उद्या (ता. 12) राज्यभरातील महामार्गावर टोलवसुलीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिली. राज यांच्या नेतृत्वाखाली वाशी टोल नाका येथे "रास्ता रोको' करण्यात येणार आहे.

टोलप्रश्‍नी उद्या (बुधवारी) राज्यात करण्यात येणाऱ्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी राज यांनी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद बोलावली होती. राज ठाकरे म्हणाले, की राज्यभरातील रास्ता रोकोचा शहरांतील नागरिकांना त्रास होणार नसून केवळ महामार्गावर राज्य भरात रास्ता रोको होणार आहे. तसेच या आंदोलनानंतर 21 फेब्रुवारी रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानदरम्यान टोलवसुलीच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यभरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. लोकशाही मार्गांनी सरकारला जाग आली नाही तर मात्र मनसेच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देऊन ते म्हणाले, की मुख्यमंत्र्यांना राज्यातील प्रश्‍नांमध्ये नव्हे तर आघाडीच्या जागावाटपात जास्त रस आहे. तसेच शिवसेनेने या आंदोलनाला "नाटक' म्हणून संबोधले असले तरी सध्या या टीकेवर उत्तर देणार नाही. मनसेच्या आंदोलनामुळे राज्यातील 67 टोल नाके बंद झाले आहेत.

राज ठाकरेंना नोटीस मनसेने टोलप्रश्‍नी रास्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर आज राज्यभरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी 149 कलमाच्या नोटीस बजावल्या आहेत. यानुसार जमावासह जमा होण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवाजी पार्क पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी राज यांनाही नोटीस बजाविली आहे.

भुजबळांशी चर्चा नाही
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ टोलवसुलीबाबत खुल्या चर्चेला तयार असल्याबाबतचा प्रश्‍न राज यांना विचारण्यात आला. त्या वेळी दरोडेखोरांबरोबर कोण चर्चा करणार, असा प्रश्‍न त्यांनी केला. ज्यांच्याबद्दल आक्षेप आहेत, त्यांच्याशी चर्चा करण्यात आपल्याला रस नसल्याचे ते म्हणाले. हा विषय मुख्यमंत्र्यांबरोबर संबंधित असल्याने त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

राज म्हणाले
- खळ्ळखट्याक नाही
- शहरातील जनजीवन विस्कळित करणार नाही
- बारावीच्या परीक्षेमुळे शहरांमध्ये रास्ता रोको नाही.
- पत्रकारांच्या उपस्थितीत सरकारशी चर्चा करणार
- उपाययोजना करण्यात येत असेल तरच चर्चेला येणार
- भास्कर जाधव यांना कोणीतरी सांगितले म्हणून पत्र लिहिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें