गुरुवार, 13 फ़रवरी 2014

टोल भरण्यास जबरदस्ती केल्यास ठेकेदाराच्या घरात धुमशान

मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर 21 फेब्रुवारीला टोलविरोधात काढण्यात येणारा मनसेचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. "टोल बंद' आंदोलन मात्र सुरू राहील, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. टोल भरण्यास नकार देणाऱ्या वाहनचालकांवर ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्ती केल्यास ठेकेदाराच्या घरात घुसून माझे कार्यकर्ते जे थैमान घालतील त्याला आपण जबाबदार नसू, असा इशाराही राज यांनी दिला.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राजसोबत मनसेचे काही नेते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहात गेले होते. त्यानंतर दुपारी "कृष्णकुंज' या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज यांनी ठेकेदारांना वाहनचालकांवर टोलसाठी जबरदस्ती करू नका, असा इशारा दिला. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही टोलविषयी आश्‍वासने दिली आहेत. या वेळी त्यांचा प्रतिसाद सकारात्मक वाटल्यानेच 21 फेब्रुवारीचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. त्यानंतरही नवे धोरण आणण्याचा दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही तर नागरिकांनी टोल भरू नये, या भूमिकेवर आपण ठाम आहोत, असे राज यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी टोल नाक्‍यावरील कामगारांकडून जबरदस्तीने टोल घेतला जातो, याकडे लक्ष वेधल्यावर अशा संबंधित ठेकेदाराच्या घरात शिरून माझे कार्यकर्ते थैमान घालतील, असा इशारा त्यांनी दिला.
टोलच्या एकूण कारभाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी ऑडिटरची नेमणूक करण्यात यावी, या मागणीवर आपण ठाम आहोत. लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी एसटी बसना टोल माफ केला जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. बेस्टच्या बसनाही टोल माफ करण्याची आपली मागणी आहे, असे ते म्हणाले. या वेळी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील रस्त्यांमधील फरक दर्शविणारी छायाचित्रे त्यांनी पत्रकारांना दाखविली. टोल न देता कर्नाटकमधील नागरिकांना चांगले रस्ते मिळाले आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणले. आंदोलन वाढत जाईल या धास्तीनेच मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेऊन चर्चा केली, असे राज म्हणाले. टोल आकारण्यात येत असलेल्या रस्त्यांवर वैद्यकीय सुविधा नसल्याने अनेकांचा अपघातांत मृत्यू झाला आहे. त्यामुळेच या धोरणात त्रुटी असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले, अशी टीकाही त्यांनी केली.

ठेकेदारांना भेटण्यात रस नाही टोलचे काही ठेकेदार आपल्याला भेटण्यासाठी आले होते का, असे पत्रकारांनी विचारले. त्यावर ठेकेदारांना भेटण्यात आपल्याला रस नाही, असे राज ठाकरे म्हणाले. सरकारबरोबर चर्चा करुन टोलविषयक धोरणावर निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळेच चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या "मिफ्टा'च्या कार्यक्रमासाठी सिंगापूरला जाणे मी टाळले. या कार्यक्रमाचे प्रायोजक "आयआरबी' असल्याने मी गेलो नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

"मनसेमुळे 67 टोल नाके बंद' मनसेच्या आंदोलनामुळे राज्यात 67 टोल नाके बंद पडल्याचा दावा राज यांनी केला. 10 ऑगस्ट 2012 पासूनच टोलविरोधातील भूमिका मनसेने मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. टोलविरोधी आंदोलनात मी सरकारविरोधात बोलत असताना विरोधक मात्र माझ्याच विरोधात बोलत आहेत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भाषा सरकारला कळली नाही. त्यामुळेच आमच्या आंदोलनानंतर सरकारला जाग आली, असे ते म्हणाले.

येथे होते दामदुप्पट वसुली सरकारचे नियम धाब्यावर बसवून दामदुप्पट वसुली सुरू आहे, असा दावा राज यांनी केला. कागल - सातारा रस्त्यावर सरकारी सूत्रांप्रमाणे 62 रुपये टोल अपेक्षित असताना 124 रुपये घेतले जातात. आणेवाडी (सातारा) - खेड शिवापूर रस्त्यावर 24 रुपये अपेक्षित असताना 50 रुपये, खेड शिवापूर - पुणे रस्त्यावर 15 रुपये अपेक्षित असताना 70 रुपये, मुंबई - पुणे रस्त्यावर 53 रुपये अपेक्षित असताना 87 रुपये, पुणे - शिरुर रस्त्यासाठी 30 रुपये अपेक्षित असताना 37 रुपये, शिरुर - नगर रस्त्यासाठी 26 रुपये अपेक्षित असताना 35 रुपये, नगर - औरंगाबाद रस्त्यासाठी 58 रुपये अपेक्षित असताना 75 रुपये, औरंगाबाद- जालना रस्त्यासाठी 32 रुपये अपेक्षित असताना 50 रुपये, मुंबई - पुणे (एनएच 4) - नगर - औरंगाबाद-जालना रस्त्यासाठी 205 रुपये अपेक्षित असताना 284 रुपये, पुणे - बेळगाव रस्त्यासाठी 167 रुपये अपेक्षित असताना 294 रुपये, मुंबई-पुणे-बेळगाव रस्त्यासाठी 240 रुपये अपेक्षित असताना 381 रुपये टोल घेतला जातो, असा आरोप राज यांनी केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें