शुक्रवार, 7 फ़रवरी 2014

राज ठाकरे यांची सभा मुठा नदीच्या पात्रात

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा अखेर मुठा नदीच्या पात्रात घेण्याचे शुक्रवारी निश्‍चित झाले. सभा कोठे होणार, याबाबत गेले चार दिवस सुरू असलेली चर्चा यामुळे थांबली असून मनसेचे पदाधिकारी तातडीने सभेच्या नियोजनात मग्न झाले आहेत.

राज ठाकरे यांची सभा स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्याचा "मनसे'चा प्रयत्न होता; परंतु मैदान उपलब्ध न झाल्यामुळे तो अयशस्वी झाला. अलका टॉकीजच्या चौकातही पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली होती. न्यू इंग्लिश स्कूलच्या टिळक रस्त्यावरही सभा घेण्यासाठी मनसेला मैदान उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे सभा घ्यायची कोठे, असा प्रश्‍न मनसेपुुढे होता. त्यातच मनसेने काही ठिकाणी फ्लेक्‍स लावले, त्यात स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार, असे म्हटले होते. त्यामुळे सभेबाबत कुतूहल निर्माण झाले होते.

नदीपात्रात मनोरंजननगरी मागे आणि "एसएसपीएमएस'चे मैदान या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिली होती. नदीपात्रात मनोरंजन नगरीच्या मागे सभा घेण्याचा निर्णय मनसेचे सरचिटणीस दीपक पायगुडे आणि शहराध्यक्ष प्रकाश ढोरे यांनी जाहीर केला. नदी पात्रात मंडप उभारणीसाठी शुक्रवारी सायंकाळी त्यांनी पाहणी केली. शनिवारी सकाळपासून मंडप उभारण्यात येणार आहे. संभाजी उद्यानातून तसेच पुलाची वाडी मधून कार्यकर्ते सभास्थळी पोचू शकतील, असे ढोरे यांनी सांगितले. या सभेसाठी शहरातील चारही दिशांच्या उपनगरांतून कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें