मंगलवार, 1 अप्रैल 2014

राज यांचा 'संकल्प'

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आपणच वारस आहोत, असा दावा करणारे ठाकरे बंधू कधी तरी एकत्र येतील आणि राज्यावर पुन्हा एकदा "शिवशाही'ची गुढी उभारतील, अशी स्वप्ने पाहणाऱ्यांची झोप कायमची उडवण्याचे काम राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याचाच मुहूर्त साधून केले आहे. पुण्यातील जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा प्रारंभ करताना, त्यांनी आपल्या स्वभावधर्मानुसार नेहमीप्रमाणे एका दगडात अनेक पक्षी तर मारलेच; पण त्याच वेळी महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या प्रमुख घटकांमधील परस्परसंबंधांबाबत मतदारांमध्ये अधिकाधिक दुराव्याचे, तसेच अविश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्याचे कामही केले. त्यानंतर लगोलग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेबरोबर समझोता अशक्‍य असल्याचे स्पष्ट केल्याने आता ही भाऊबंदकी अशीच पुढे चालत राहणार, यावर शिक्‍कामोर्तबही होऊन गेले.

खरे तर या निवडणुकीत मनसेने भाजपला बहुतांशी सूट देऊन केवळ शिवसेनेविरोधातच उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हाच राज यांचे डावपेच स्पष्ट झाले होते. शिवाय, त्याच वेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा जाहीर करत, आपण भाजपबरोबर जाऊ इच्छितो हेही सूचित केले होते; पण या "गुगली'नंतरही पुण्यातील सभेत मात्र त्यांचा बहुतांश वेळ आपण हे का केले, याबाबतचा खुलासा करण्यातच गेला. राज यांना महायुतीत सामील होण्याची मनापासून इच्छा होती, हे त्यांच्या शब्दाशब्दांतून आणि देहबोलीतूनही स्पष्ट होत होते. "मला खरोखरच बरोबर घ्यायचे होते, तर ती चर्चा मीडियातून कशी होऊ शकते, त्यासाठी एक फोन करावयाचा होता. मी विचार केला असता...' या विधानातूनच त्यांची अंतरीची इच्छा जाहीर झाली, शिवाय त्याचवेळी मतदारांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा उद्देशही स्पष्ट झाला.

पण या सभेतील राज यांचा "दुसरा' हा अधिक रोखठोक होता. "मनसे' महायुतीत येऊ नये, ही उद्धव यांचीच इच्छा असल्याचे भाजप नेत्यांनीच आपल्याला सांगितल्याचे त्यांनी एकवीरादेवीची शपथ घेऊन जाहीर केले! त्यामुळे भाजप नेते तर अडचणीत सापडलेच; शिवाय आपण भाजपबरोबर जाऊ इच्छितो, हेही जाहीर करून ते मोकळे झाले. शिवाय, आपली "औकात' नेमकी काय आहे, ते या निवडणुकीत दाखवून देण्याचा विडाही त्यांनी मुळा-मुठेच्या साक्षीने उचलला आहे. त्यामुळे एकदा का लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बोजवारा उडाला, की मोदी-गडकरी आदी कंपनी विधानसभेच्या वेळी शिवसेनेशी काडीमोड घेऊन मनसेबरोबर जाण्याचा आग्रह धरणार, हेही उघड आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर होणाऱ्या पहिल्या-वहिल्या निवडणुकीतच शिवसेनेला नामोहरम करण्याचा राज यांचा इरादाही उघड झाला आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत देशापुढील अजेंडा काहीही असला तरी, या दोन भावांची लढाई मात्र एकमेकांशीच राहणार आहे. एका अर्थाने ही निवडणूक या दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाचीच लढाई आहे, हेच खरे!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें