शनिवार, 31 मई 2014

मी विधानसभा निवडणूक लढवणार! - राज ठाकरे

लोकसभा निवडणुकांनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच महाराष्ट्रातील जनतेला सामोरे गेले. यावेळी त्यांनी देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विजयाबद्दल अभिनंदन केले. कोणत्याही कुबड्यांचा आधार न घेता बहुमताने सरकार स्थापन केल्याबद्दल राज यांनी नरेंद्र मोदींचे कौतूक केले. तसेच आपण इतर पक्षांप्रमाणे चार भिंतीच्या आत चिंतन न करता, थेट जनतेसमोर येण्याचा पर्याय निवडल्याचे सांगितले. लोकसभेतील विजयाचे श्रेय हे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नसून हे यश फक्त नरेंद्र मोदींचेच असल्याचे राज यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे वर्णन राज यांनी विरोधी पक्ष कधी जिंकत नसतात, तर सत्ताधारी हरत असतात असे केले. यावेळी राहुल गांधी हे खऱ्या अर्थाने महात्मा गांधीचे अनुयायी असल्याची उपरोधिक टीका राज यांनी केली. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करण्याची मागणी केली होती. मात्र स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी राहुल गांधी यांना महात्मा गांधींच्या संदेशाचा अर्थ उमगला व त्यांनी खऱ्या अर्थाने निवडणुकीत हा संदेश प्रत्यक्षात आणल्याचे सांगत राज यांनी राहुल गांधींची खिल्ली उडविली. लोकसभेच्या पराभवाने मी खचून गेलेलो नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मी नक्कीच मुसंडी मारून दाखवेन असा विश्वास राज यांनी व्यक्त केला.
तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघातील पराभवासाठी राज यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मनसेतर्फे नाशिकमध्ये अनेक लोकोपयोगी कामे हाती घेण्यात आली आहेत, मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्य़ात अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राज यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या मनमानीचा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा यापुढील काळात पक्षाच्या आदेशाशिवाय कोणतेही मनसे स्टाईल आंदोलन न करण्याचा इशारा राज यांनी सभेत दिला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें