सोमवार, 29 सितंबर 2014

भाजप बेभरवशाचा, तर शिवसेनेचा भंपकपणा -राज


मुंबई - भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवताच येणार नाही, त्यांचा काय भरवसा, असा सवाल करून दुसरीकडे शिवसेनेचा केवळ भंपकपणा सुरू असल्याची कडवट टीका राज ठाकरे यांनी केली. कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज येथे आयोजित केलेल्या मनसेच्या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांवर टीकास्त्र सोडले.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाल्याने मनसेच्या प्रचाराचा शुभारंभ राज यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार प्रवीण दरेकर, बाळा नांदगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी संपुष्टात आलेल्या शिवसेना- भाजप युती आणि कॉंग्रेस आघाडीच्या घडामोडींवर राज ठाकरे यांनी मार्मिक टिप्पणी केली. भाजप नेते अतुल भातखळकर आणि नगरचे माजी आमदार सदाशिव लोखंडे मनसेत प्रवेश करण्यासाठी आले असता त्यांना प्रवेश न देता ही बाब नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणल्याचा गौप्यस्फोट राज यांनी केला. मी तुमच्याशी प्रामाणिकपणा दाखवला, तुम्ही मात्र माझा आमदार पळवता, असा सवाल करून भाजप नेत्यांवर विश्वासघातकी असल्याची टीका त्यांनी केली. युती- आघाडी तुटल्याच्या दिवशी भाजप नेत्यांना शरद पवार यांचा फोन गेला होता. तुम्ही युती तोडा, मी अर्ध्या तासात आघाडी मोडतो, असे पवार म्हणाल्याची माहिती असताना शिवसेना नेते भाजपशी चर्चा का करत होते, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर महिन्याभरापूर्वीच युतीला लाथ मारली असती. युती तोडता आणि केंद्रातील मंत्रिपद आणि मुंबई महापालिकेतील युती ठेवता, हा कसला भंपकपणा आणि ढोंगीपणा, असा सवाल करून राज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. ""भाजप हा पक्ष वाळवीसारखा कोपऱ्याकोपऱ्याने पोखरत असताना उद्धवना हे कळले कसे नाही, मी तिथे असतो तर भाजपवाल्यांना लाथ मारून हाकलले असते,‘‘ असा टोलाही त्यांनी लगावला.

सत्तेवर आल्यास ब्लू प्रिंटमधील विकास करून दाखवणार, हे माझे वचन असल्याचे राज म्हणाले. सत्तेवर आल्याचा पहिला दिवस म्हणजे झोपडपट्ट्यांचा शेवटचा दिवस असेल, असे सांगून राज यांनी परप्रांतीयांनाही इशारा दिला. मुंबईसारख्या शहरात झोपडपट्ट्या वाढण्यास परप्रांतीय लोंढे आणि बिल्डर लॉबी जबाबदार असून, त्यांचा योग्य बंदोबस्त केला जाईल, सत्तेवर आल्यास बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रत्येकावर माझी करडी नजर असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

तर राज्य 15 वर्षे मागे जाईल

राज्यात सुरू असलेल्या नेत्यांच्या पक्षांतरावर राज ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, ""निवडणुका झाल्यावर विधानसभेत कुणालाच बहुमत न मिळाल्यास राज्य 15 वर्षे मागे जाईल, त्यामुळे या पक्षांना पर्याय म्हणून मी आणि मनसे तुमच्यासमोर ठामपणे उभा आहे. मला एक संधी देऊन बघा.‘‘

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें