मंगलवार, 7 अक्तूबर 2014

...मोदी देश कधी चालविणार ?

डोंबिवली - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात सगळीकडे जाहीर प्रचार सभा घेण्यासाठी तळ ठोकून आहेत. पंतप्रधान निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत, तर ते देश कधी चालविणार ? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केला.

येथील डीएनसी मैदानावर मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, की विधानसभेच्या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुका येतील. त्यानंतर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्याचाही प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी फिरणार आहेत का ? कारण भाजपकडे महाराष्ट्रात एकही चेहरा असलेला नेता नाही. याचा दाखला देण्यासाठी ठाकरे यांनी मोदी यांच्याच विधानाचा आधार घेतला. त्यांनी सांगितले की, मुंडे असते, तर मला प्रचारासाठी येण्याची गरज भासली नसती. यावरून त्यांनी राज्यातील भाजप नेत्याची लायकीच काढली आहे. मोदींनी कितीही सभा घेतल्या, तरी मला काही फरक पडत नाही. भाजपने कॉंग्रेस व राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेचे उमेदवार आयात केले आहेत. त्यांच्या नावाची जंत्रीच ठाकरे यांनी वाचून दाखविली. त्यामुळे मोदी हे कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात फिरत आहेत. ज्या लोकांनी राज्याच्या विकासावर वरवंटा फिरविला. त्याच लोकांच्या हाती सत्ता देण्यासाठी मोदी त्यांच्या प्रचारासाठी फिरत आहेत. हा भाजपचा प्रचार नसून, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचाच प्रचार आहे. याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. राज यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांची नक्कल करून सभेत एकच हशा पिकविला. खडसे विधानसभेत सहा तास बोलतात. विधानसभा ही काय प्रवचन देण्याची जागा आहे का ? त्यांची जागा आस्था चॅनेलवर आहे, असा सल्लाही राज यांनी खडसे यांना दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें