गुरुवार, 9 अक्तूबर 2014

वेळप्रसंगी आम्ही भाऊ एकत्र येऊ - राज ठाकरे

मुंबई - वेळप्रसंगी आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ, असे वक्‍तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यामुळे सत्तेच्या समीकरणात कोणता पक्ष कुणासोबत आघाडी करेल, याबाबत आतापासून चर्चा सुरू झाली आहे.

जागावाटपाच्या मुद्द्यावर महायुती तुटल्याच्या दिवशी राज ठाकरे आजारी असल्याने रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या प्रकृतीची फोनवरून विचारणा केली होती. तब्येतीची विचारपूस केली त्यात गैर काय, अशा शब्दांत उद्धव यांनी त्यांच्यातील संभाषणाची कबुलीही दिली होती. तसेच उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी "कृष्णकुंज‘वर जाऊन राज यांची भेट घेतल्याची चर्चा होती. आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना राज आणि उद्धव यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष केल्याने शिवसेना-मनसे एकत्र येणार का, या विषयावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यातच राज यांनी वेळप्रसंगी आम्ही भाऊ एकत्र येऊ, असे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें