सोमवार, 3 नवंबर 2014

मनसे सरचिटणीसपदाचा वसंत गितेंचा राजीनामा

नाशिक - लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही सपाटून मार खालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा नाशिकमध्ये मनसे रुजवणारे माजी आमदार वसंत गिते यांनी दिला आहे. तसेच जिल्हाध्यक्षपदाचीही राजीनामा सचिन ठाकरे यांनी दिला आहे. 

या दोघांनीही वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणास्तव पदाला न्याय देणे शक्‍य होत नसल्याचे कारण देत पदाच्या जबाबदारीतून कार्यमुक्त करण्याची विनंती पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या बुधवारपासून (ता. 5) नियोजित नाशिक दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर ही घटना घडल्याने मनसेमध्ये खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी गिते हे पक्षातून बाहेर पडतील अशी अटकळ व्यक्त करण्यात येत होती. मात्र राज यांनी रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस केल्याने या अटकळीवर पडदा पडला होता. तसेच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून गिते यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र गिते यांना यशाने हुलकावणी दिली. शिवाय राज्यातही पक्षाला केवळ एका आमदारांवर समाधान मानावे लागले. अशा परिस्थितीत गिते पक्षातून बाहेर पडण्याचा विचार तरी करत नाही ना? अशा शंकेची पाल नाशिककरांच्या मनात चुकचुकू लागली आहे. गिते आणि ठाकरे यांचा पदाचा राजीनामा मंजूर झाला आहे अथवा नाही याबद्दलचे स्पष्टीकरण पक्षाकडून करण्यात आलेले नाही. मुलगी उर्वशीला अपघात झाल्याने राज्याचा राज यांचा दौरा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे राज हे नियोजित दौऱ्यानुसार बुधवारी (ता. 5) नाशिकमध्ये मुक्कामी येतील की नाही हे स्पष्ट झालेले नाही.
गितेंचे "टाईमिंग‘ चुकलेसध्यस्थितीत "पॉलिटिकल ऍक्‍टिव्हिटी‘ नसताना गिते यांनी पदाचा राजीनामा दिला असल्याने त्यांचे "टाईमिंग‘ चुकल्याची भावना नाशिककरांमध्ये आहे. पण तरीही स्थानिक पक्षातंर्गत गटातटाच्या राजकारणात संघटनात्मकदृष्ट्या वरचष्मा राहावा म्हणून कदाचित गिते यांनी हे पाऊल उचलले असावे, असा तर्क राजकीय अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र महापालिकेतील 37 पैकी गिते यांना मानणाऱ्या 18 नगरसेवकांनी राजीनामा देण्याच्या हालचाली सुरु केल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. महापालिका कामकाजाच्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार महापौर अशोक मुर्तडक यांच्याविरुद्ध अविश्‍वास येऊ शकत नाही आणि स्वतंत्र गट स्थापन होण्यासाठी पुरेशी नगरसेवक संख्या कितीपत जुळणार याबद्दल शंका आहे. म्हणूनच राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी निकालानंतर नाशिकमध्ये मी ठाण मांडून बसणार असेही राज यांनी नाशिककरांना अश्‍वस्त केले होते. नाशिककरांनी त्यावर विश्‍वास न ठेवता मनसेचे इंजिन तीनही विधानसभा मतदारसंघात नापसंत केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें