सोमवार, 9 मार्च 2015

स्वच्छतागृहांसाठी मनसेचा आवाज

मुंबईमध्ये स्वच्छ, सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, या महिलांच्या मागणीला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बळ दिले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मनसेने 'स्वच्छतागृह माझा अधिकार' ही मोहीम सुरू करून दिंडोशी येथील सन्मित्र क्रीडा मैदानामध्ये पन्नास बायोटॉयलेट्सची उभारणी केली.

'राइट टू पी मोहिमे'ने वेळोवेळी केलेल्या सर्व आग्रही मागण्यांची नोंद घेऊन मनसेच्या उपाध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी 'स्वच्छतागृह माझा अधिकार' ही जनमोहीम सुरू केली आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहांची उपलब्धता ही केवळ राजकीय मागणी नसून तो त्यांच्या आरोग्यासाठीही अतिशय गंभीर विषय असल्याचे शालिनी यांनी स्पष्ट केले. 'राइट टू पी' मोहिमेच्या मागणीला बळ देण्यासाठी ही मोहीम पूरक असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मनसेच्या महिला सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची दैना पुढे आली. योग्य नियोजनाअभावी बंद पडलेली, बांधकाम खचलेली, पाणी-वीज या मुलभूत सुविधांअभावी दुरवस्था झालेली, अशी सध्याच्या स्वच्छतागृहांची स्थिती आहे. पे अॅण्ड यूज तत्त्वावर चालवायला दिलेल्या स्वच्छतागृहांच्या ठेकेदारांवरही पालिकेचे नियंत्रण राहिलेले नाही. स्वच्छतागृहांची झाडाझडती घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच सरकारला नसली तरीही महिलांना लाज आहे, म्हणूनच केवळ एक दिवसाचा महिला दिन साजरा करण्यापेक्षा महिलांसाठी स्वच्छतागृहांची उपलब्धता वाढवा, असे मत मांडत या मोहिमेच्या उद्धाटन सोहळ्यावेळी सरकारवर टीका केली.

प्रत्यक्ष कृतीवर भर देताना पश्चिम उपनगरामध्ये साठ बायोटॉयलेट्स उपलब्ध करून दिले आहेत. या मोहिमेच्या पुढच्या टप्प्यांमध्ये प्रवासादरम्यान महिलांची होणारी कुंचबणा लक्षात घेता हायवेलगत बायोटॉयलेट्स उभारण्यात येणार आहेत.

देवेंद्र 'भाऊं'ना बहिणींचे पत्र

राज्याचा मुख्यमंत्री हा तमाम कष्टकरी, नोकरदार स्त्रियांचा भाऊ असतो, असे म्हणतात. या आपल्या भावाने महिलांची कुंचबणा टाळण्यासाठी बहिणींना स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत, असे कळकळीचे आ‍वाहन करणारी पत्रे महिला मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहेत. त्यासाठी अतिशय कल्पक मजकूर असलेली पोस्टकार्ड्स तयार करण्यात आली आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें