गुरुवार, 29 अक्तूबर 2015

केडीएमसीच्या नवनिर्माणाची संधी द्या - राज ठाकरे

कल्याण - नाशिकमध्ये करून दाखवले आता कल्याण-डोंबिवलीचे नवनिर्माण करण्याची संधी द्या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (ता. 28) येथे केले. साई चौकातील सभेत नाशिकच्या विकासाचा लेखाजोखा त्यांनी मांडला.
नाशिकचा विकास कुंभमेळ्यामुळे झाला. मनसेचे त्यात कर्तृत्व नाही, अशी टीका विरोधक करत असल्याने राज यांनी महापालिकेने शहराचा कसा विकास केला याचे सादरीकरण केले. तेथे जे नव्हते ते करून दाखवले. इथे मात्र होत्याचे नव्हते केले, अशी टीका त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली. नाशिक महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर 11 महिने आयुक्त नव्हते किंवा काहीकाळ सक्षम आयुक्त नव्हते. त्यामुळे 33 महिन्यांत मनसेने काय काय केले याची झलक सादर करतोय, असे ठाकरे म्हणाले. शहरातील रस्ते, गोदा नदीवरील पूल आणि गोदापार्क अशा अनेक प्रकल्पांचे फोटो त्यांनी दाखवले. ही सर्व कामे राज्यात भाजपचे सरकार येण्यापूर्वी सुरू केल्याचे त्यांनी तारीखवार सांगितले.

सामान्य नागरिकांचा विचार करून महापालिकेने केलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. तेथे 33 महिन्यांत जे केले ते इथे करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या कामांसाठी अनेक उद्योजक पुढे आले. त्यांनी सढळ निधी दिला. राज्यकर्त्याची इच्छाशक्ती प्रामाणिक असेल तर असे हात पुढे येतात; मात्र कल्याण-डोंबिवलीमध्ये 20 वर्षे सत्ता हातात असतानाही या शहरात काहीच करता न आल्याने आज पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने मते मागावी लागत असल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.
विधानसभेतील पराभवाने खचलो नसल्याचे सांगताना असे पराभव पाहतच लहानाचा मोठा झालोय, असे त्यांनी सांगितले. संघाच्या स्थापनेनंतर पक्षाला बहुमत मिळण्यासाठी किती वर्ष वाट पाहावी लागली ते पाहा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मला लोकांशी प्रतारणा करायची नाही. एकदा विश्‍वास ठेवून पाहा तुम्ही विचार केला नसेल इतकी चांगली कामे करून दाखवीन, असे आश्‍वासन त्यांनी नागरिकांना दिले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें