बुधवार, 9 दिसंबर 2015

केंद्र सरकार राजकीय खेळी करतेय- राज ठाकरे

मुंबई- स्मार्ट सिटी योजनेवरून केंद्र सरकार राजकीय खेळी करत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत केला.

ठाकरे म्हणाले, ‘प्रत्येकाला आपले शहर उत्तम झालेले आवडते. परंतु, स्मार्ट सिटी ही योजना पूर्णपणे फसवी आहे. या योजनेबाबत राज्यांनाच अनेक शंका आहेत. महानगरपालिकेत केंद्र सरकारची लुडबूड कशासाठी. शहरे स्मार्ट करणे हे केंद्र व राज्यांचे कर्तव्य आहे. स्मार्ट सिटी योजनेला अत्यल्प निधी देणार आणि महापालिकांकडून जी चांगली कामे होतील त्याचे श्रेय केंद्र सरकार घेणार स्मार्ट सिटी योजनेसाठी वेगळी कंपनी कशाला हवी. शहरात चांगल्या योजना राबवण्यासाठी केंद्र व राज्याने पुढाकार घ्यावा, त्याचे राजकारण करू नये.‘

‘नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्राला प्राप्तिकर देणार नसल्याचे सांगितले होते, मग आता राज्यांकडून मागणी का करत आहेत? निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीसाठी पॅकेज जाहीर केले, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. चांगल्या गोष्टींना माझा पाठिंबा असेल, मी विनाकारण राजकारण करणारा माणूस नाही,‘ असेही ठाकरे म्हणाले.

स्वतंत्र विदर्भाची मागणी चुकीची- ठाकरे
राज्याचे महाधिवक्ता ऍड. श्रीहरी अणे स्वंतत्र विदर्भाचा केलेली मागणी अत्यंत चुकीची आहे. त्यांचा बोलवता धनी कोण आहे, हे पाहिले पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र राज्य एक राहिले पाहिजे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें