गुरुवार, 4 अगस्त 2016

राज ठाकरेंनी दिला पूरग्रस्तांना दिलासा

नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेला गोदापार्क महापुरामुळे पूर्णतः उद्‌ध्वस्त झाला असून, पार्कच्या पुनःनिर्माणासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत. राज यांनी अंधारात केलेल्या पाहणीतही उद्‌ध्वस्त झालेल्या गोदापार्कचे वास्तव समोर आले. गोदापार्कसह गोदाकाठावरील पुराचा तडाखा बसलेल्या ठिकाणांना भेट देऊन राज यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा दिला. 

गोदावरी नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर गोदापार्क निर्माण करण्याचे राज ठाकरे यांचे स्वप्न आहे. 2002 मध्ये महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना चोपडा पुलापासून अडीच किलोमीटरपर्यंतचा गोदापार्क उभारण्यात आला होता. 2008 मध्ये आलेल्या पुरामुळे युतीच्या काळात बांधलेल्या पार्कची दुरवस्था झाली. 2012 मध्ये महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर आसारामबापू पुलापासून नव्याने गोदापार्क उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार नियोजन करण्यात आले. महापालिकेच्या निधीऐवजी कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक दायित्वाच्या निधीतून (सीएसआर) गोदापार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. रिलायन्स फाउंडेशनने त्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले. गोदापार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम नुकतेच पूर्णत्वास आले आहे. गेल्या महिन्यात उद्‌घाटन करण्याची तयारी करण्यात आली. राज यांच्या तारखा निश्‍चित न झाल्याने उद्‌घाटन बारगळले. मुसळधार पावसाने आलेल्या पुराने गोदापार्क कवेत घेत उद्‌ध्वस्त करून टाकल्याने राज यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. गोदापार्कमधील फरशी, आकर्षक पथदीप, हिरवळीचे मोठे नुकसान झाले आहे. 

पूरग्रस्त भागाला भेट 
नाशिकमध्ये पुराने हाहाकार माजविल्याचे कळाल्यानंतर राज काल (ता. 2) नाशिकला निघाले होते; परंतु पोलिस नियंत्रण कक्षातून येण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे राज यांचे आज सायंकाळी आगमन झाले. अहिल्याबाई होळकर पूल, रामकुंड, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्‍वर पूल येथे प्रत्यक्ष, तर काझीगढीच्या धोकादायक भागाचे त्यांनी दुरून दर्शन घेतले. या वेळी महापौर अशोक मुर्तडक, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें