शुक्रवार, 23 सितंबर 2016

पाकिस्तानी कलाकारांनो भारत सोडा! - मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फतवा; चित्रीकरण थांबविण्याचा इशारा
मुंबई - उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पाकिस्तानी कलाकारांना भारत तातडीने सोडण्याचा फतवा शुक्रवारी काढला. देश सोडून हे कलाकार न गेल्यास चित्रीकरण थांबविण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

शाहरुखअभिनित "रईस‘ चित्रपटात काम करणारी अभिनेत्री माहिरा खान आणि "ऐ दिल है मुश्‍कील‘ चित्रपटातील अभिनेता फवाद खान यांच्यासारख्या पाकिस्तानी कलाकारांमुळे भारतीय कलाकारांची संधी हिरावून घेतली जात आहे, असा आरोप मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला. या कलाकारांना तातडीने देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे. हे कलाकार परत न गेल्यास आमचे कार्यकर्ते त्यांना हाकलून देतील, तसेच त्यांना येथे काम करू देणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
करण जोहर यांचा "ऐ दिल है मुश्‍कील‘ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. यात फवाद खान हा सहायक अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. माहिरा ही शाहरुख खान याच्या "रईस‘ चित्रपटात मुख्य अभिनेत्री आहे.
मुंबई पोलिसांनी मात्र, या कलाकारांनी चिंता करण्याची गरज नसून, त्यांना संरक्षण देण्यात येईल, असे आश्‍वासन दिल आहे. मनसेच्या चित्रपट विभागाने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडून जाण्यास 48 तासांची मुदत दिली आहे. पाकिस्तानी कलाकारांना पत्रेही पाठविण्यात आली असून, यात म्हटले आहे, की तुमचा देश दहशतवादाला प्रोत्साहन देत असताना तुम्ही येथील व्यवसाय बंद करा. याबाबत चित्रपट निर्मात्यांनाही पत्रेही पाठविण्यात येणार आहेत. देशात मोठ्या संख्येने कलाकार असून, ते काम मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. तुम्ही कोणत्या आधारावर पाकिस्तानी कलाकारांना संधी देत आहात, असा प्रश्‍न निर्मात्यांना विचारण्यात येणार आहे.

भारतासारख्या सुमारे सव्वा अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात लाखो जण चित्रपटातील संधीसाठी संघर्ष करीत असताना मोठे बॅनर्स पाकिस्तानी कलाकारांना संधी देत आहेत.
- शालिनी ठाकरे, सरचिटणीस, मनसे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें