शुक्रवार, 13 जनवरी 2017

मुंबईत मनसे स्वबळावर लढणार - राज ठाकरे

मुंबई - मी ट्रेलर नव्हे, तर पिक्‍चर दाखवतो. शिवसेना, भाजपकडे पैसे आहेत. माझ्याकडे नाहीत. दुसरे पक्ष पैशांच्या जोरावर माणसे विकत घेत आहेत, असा घणाघाती आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबई महापालिकेत सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचेही राज यांनी जाहीर केले. निवडणुकीसाठी मनसेने "वॉर रूम' तयार केली आहे. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी फेसबुक लाइव्हद्वारे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या थेट प्रश्‍नांना रोखठोक उत्तरेही दिली.

मनसेकडे युतीचा प्रस्ताव आला तर या वेळी विचार करीन, असे राज मंगळवारी म्हणाले होते. अद्याप मी कुणाकडे गेलेलो नाही आणि कुणी माझ्याकडे आलेले नाही. त्यामुळे या सर्व चर्चांना सध्या तरी काहीही अर्थ नाही, असे ते बुधवारी म्हणाले. शिवसेनेने भ्रष्टाचार केला असेल तर भाजप काय करत होता? त्यांना हा भ्रष्टाचार रोखावा असे वाटले नाही का? दोघांनी मिळूनच फावडा मारला आहे, असा टोला राज यांनी लगावला. मनसेच्या चांगल्या कामांबद्दल कुणी बोलत नाही. ज्यांना पक्षातून बाहेर पडायचे आहे त्यांनी जावे. मी ट्रेलर दाखवत नाही, डायरेक्‍ट पिक्‍चर दाखवतो. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुढे काय करणार ते आताच सांगू शकत नाही. समुद्रात शिवस्मारक उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये आहेत, मग माणसे जिवंत राहावीत यासाठी पैसा खर्च का करत नाहीत? सरकार नको त्या गोष्टींवर खर्च करत आहे. शिवस्मारकाऐवजी राज्यातील गडकिल्ल्यांची दुरुस्ती करा, असे ते म्हणाले.
नाशिक महापालिकेचे कर्ज फेडून मी कामे करून दाखवली. नाशिकमध्ये केलेले काम इतर शहरांतही दाखवा. अजूनही बरीच माणसे माझ्यासोबत विश्‍वासाने आहेत. मी पुन्हा 60 नगरसेवक निवडून आणून दाखवीन.
- राज ठाकरे, मनसे प्रमुख
राज ठाकरे उवाच
राज्यात टोलनाके मनसेच्या प्रयत्नामुळे बंद
भाजपकडून योजनांचा, उद्‌घाटनांचा धडका
कॉंग्रेसने जी योजना केली त्याचे मोदींकडून जलपूजन
शिवसेना-भाजपकडे सांगण्यासारखे काहीच नाही
महापालिकेतील भ्रष्टाचाराला दोन्ही पक्ष जबाबदार

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें