शनिवार, 19 अगस्त 2017

राज ठाकरे सभांपासून दूरच... मनसे घेणार "सोशल मीडिया'चा आधार

पुणे - राज्याच्या राजकारणात पक्षाची पाळेमुळे पुन्हा घट्ट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता "सोशल मीडिया'चा आधार घेण्याचे ठरविले आहे. नागरिक आणि आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे "फेसबुक पेज' सुरू होणार असून, येत्या 27 सप्टेंबरला त्याचा "श्रीगणेशा' होणार आहे. सभा आणि कार्यक्रमांऐवजी "सोशल मीडिया'ला प्राधान्य देत राज सभांपासून लांब राहण्याची शक्‍यता आहे.
पक्षासह आपला संपर्क वाढविण्यासाठी ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. येत्या 21 सप्टेंबरला मुंबईत सभा घेणार असल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील निवडणुकांमध्ये मनसेची जोरदार पीछेहाट झाल्यानंतर पक्ष संघटनेत मरगळ आली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या नगरसेवकांची संख्या 28 वरून दोनपर्यंत घसरली. पक्षाच्या या स्थितीनंतर ठाकरे यांनी पुण्यात फारसे लक्ष घातले नव्हते; मात्र आता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पुन्हा वाढविण्यासाठी ठाकरे गेले दोन दिवस पुण्यात होते. अशोकनगरमधील क्‍लब हाउसमध्ये ठाकरे यांनी शनिवारी शाखाध्यक्ष आणि उपविभाग अध्यक्षांशी चर्चा केली. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. राज्यातील राजकीय स्थिती, तिचे परिणम या मुद्यांसह आपल्या पक्षाच्या वाटचालीबाबत ठाकरे यांनी चर्चा केली.
ते म्हणाले, ""सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे सामान्य लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्यास मदत होईल. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत होईल. राजकारणातील दिवस पुढे सरकत असतात. तसे ते होईल.''
प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा
शहरातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी राज ठाकरे यांनी शनिवारी शाखा अध्यक्ष आणि उपविभाग अध्यक्षांबरोबर संवाद साधला. दिवसभरात चार विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें