मंगलवार, 28 नवंबर 2017

मार खाणारे नाही तर मार देणारे कार्यकर्ते अपेक्षित - राज ठाकरे

मुंबई - आंदोलनात मला मार खाणारे नाहीत, तर मार देणारे मनसैनिक हवे आहेत, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या बैठकीत व्यक्त केली असल्याची माहिती मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी दिली. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुंबईतील फेरीवाले आणि त्यांना समर्थन देणारे मुंबई कॉंग्रेसचे विभागीय अध्यक्ष संजय निरुपम यांच्यातील संघर्ष विकोपाला जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
विक्रोळीत दुकानदारांत मराठी पाट्यांच्या मुद्द्यासाठी गेलेल्या मनसैनिकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी कृष्णकुंज येथील निवासस्थानी मनसे पदाधिकारी व विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली असल्याचेही बोलले जात आहे. या सगळ्या घटनांबाबत कठोर कारवाई करण्याची मागणीही मनसेकडून करण्यात येणार आहे.
मनसैनिक विरोधी गटाकडून मार खातातच कसे? असा सवाल करत राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. मारहाणीत आपल्या कार्यकर्त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, हे माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे, असेही ठाकरे म्हणाल्याचे शालिनी ठाकरे यांनी सांगितले.
आमचे कार्यकर्ते दुकानदारांना नुसते निवेदन द्यायला गेले होते. त्यांच्यावर अचानक हल्ला होतो, तसेच हा हल्ला पूर्वनियोजित असून, ही गंभीर बाब आहे. यात प्रशासनाचे लक्ष नाही. किंबहुना प्रशासन हे जाणूनबुजून करत असल्याचा आरोपही शालिनी ठाकरे यांनी केला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें