मंगलवार, 8 मई 2018

"बुलेट ट्रेन'ला "मनसे'ची धडक

ठाणे - केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर विरोध दर्शवल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार ठाण्यातील दिवा-शिळ भागात बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असतानाच सोमवारी सकाळी मोजक्‍या स्थानिकांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवत पोलिस बंदोबस्तात सुरू असलेला जमिनीच्या सर्वेक्षणाचा डाव उधळून लावला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीनेही दिवा-म्हातार्डी गावात स्थानिक भूमिपुत्र आणि तहसीलदार, पोलिस, रेल्वे अधिकारी आदींची बैठक घेऊन जोपर्यंत योग्य मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत सर्व्हे करून देणार नसल्याची भूमिका घेतली होती.

दिवा-शिळ येथील शिळ, डवले, पडले, आगासन, बेतवडे, देसाई आणि म्हातार्डी या सात गावांतून बुलेट ट्रेन जात असून नियोजित स्थानक दिवा-म्हातार्डी परिसरात असल्याने भूसंपादनासाठी आवश्‍यक असलेल्या जमिनीच्या सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाचे पथक सोमवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात दिवा-शिळ भागात आले होते. तेव्हा सरकारच्या या सर्वेक्षणाला मनसेने विरोध दर्शवत मोजणीसाठी आणलेले यंत्र उधळून लावत सर्वेक्षण बंद पाडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळल्याने अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी सर्वेक्षणासाठी उपस्थित असलेले तहसीलदार अधिक पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, गावकऱ्यांशी वेळोवेळी बैठका तसेच जिल्हास्तरावर चर्चा झाल्या आहेत. शिळ गावातील नागरिकांच्या मागण्या नाहीत. मात्र, म्हातार्डी येथील नागरिकांना जमिनीचे दर वाढवून देण्याची मागणी आहे. तरीही आंदोलन करणाऱ्या मनसेला प्रकल्पाची माहिती देऊन चर्चेतून मार्ग काढला जाईल.
दरम्यान, सकाळी बुलेट ट्रेनच्या सर्व्हेला विरोध दर्शविल्यानंतर सायंकाळी ठाणे तहसीलदार कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पुन्हा एकदा बुलेट ट्रेनच्या भूसंपादनास विरोध दर्शवणाऱ्या घोषणा देत सर्वेक्षण होऊ देणार नसल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. मनसेच्या या आंदोलनाला मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनविसे अध्यक्ष संदीप पाचंगे, मनोहर चव्हाण, पुष्कर विचारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या या प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व बाधितांना नोटिसा दिलेल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून प्रशासनाने जमिनीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. तरीही मनसेचा विरोध असेल तर त्यांना शासनाची भूमिका समजावून सांगितली जाईल.
- सुदाम परदेशी, प्रांताधिकारी, ठाणे.  
पाठ फिरताच पुन्हा सर्वेक्षण 
मनसेने बुलेट ट्रेनसाठी लागणाऱ्या भूमी सर्वेक्षणाला सोमवारी क्षणिक विरोध दर्शवल्यानंतरही प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने मनसेची पाठ फिरताच पुन्हा पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे आता संघर्ष अटळ बनल्याची चिन्हे दिसत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें