गुरुवार, 30 अगस्त 2018

सनातनसाठीच डाव्यांना उचलले : राज ठाकरे

औरंगाबाद : "कुणाच्या घरी शस्त्रे सापडली तर त्यात राजकारण कशाला आणायचे. तसेच सनातनवरुन लक्ष विचलित करण्यासाठीच डाव्यांना उचलले आहे,'' असे वक्‍तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. याला त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विधानाची पुष्टी दिली.
"व्हिजन औरंगाबाद' या परिसंवाद कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, "मराठवाड्यातून मुली पळविण्याचे प्रमाण अधिक आहे. याबद्दल कुणीच बोलत नाही. मात्र हा प्रकार गंभीर आहे. याला सरकारच जबाबदार आहे.''
काय म्हणाले राज ठाकरे.... 

- सत्तेसाठी शिवसेना आणि एमआयएमचे साटेलोटे आहे. निवडणुकीपुरते "ते' हैद्राबादवरुन येतात, भीतीदायक वातावरण निर्माण करतात. दोघांचाही लाभ करुन पाच वर्षासाठी निघून जातात.
- कामावर मतदान होते, याच्यावरील माझा विश्‍वास उडाला आहे. विकासावर मतदान होतच नाही. औरंगाबादचे राजकारण कित्येक वर्ष धर्मावरच सुरु आहे. कामाची पावती मतदानातून मिळाली तरच विकास होईल.
- थापा मारुनच सत्तेत राहता येते. तर महिना- दोन महिने मलाही भाजपात जाऊन यावे लागेल. तसेही आजच पंतप्रधान नेपाळला गेलेत. नवीन "थापा' आणायलाच गेले असावेत.
- 25 वर्षांत औरंगाबाद शहर आणि खासदार यातील काहीच बदलले नाही. लोकप्रतिनिधींना तुमची भीती वाटत नाही. त्यामुळेच कचरा प्रश्‍न तसाच रेंगाळत पडला आहे.
- प्रभागांमुळे मोठ्या शहरांची वाट लागली आहे. एका प्रभागात चार नगरसेवक त्यांची तोंडे त्या अशोकस्तंभावरील चार सिंहासारखी असतात. जो दिसत नसतो, तो प्रभागात काड्या करण्याचे काम करतो.
- कंपन्यांच्या "सीएसआर' फंडातून शहर विकासाची कामे होतात. मात्र त्यात पैसे खायला मिळत नसल्याने अडचणी येतात. त्याचा सामना करण्याची तयारी असेल तर तशी कामे औरंगाबादेतही करता येतील.
मराठा क्रांती मोर्चाची पोरं वाळूज प्रकरणात नव्हतीच 
वाळुजमध्ये कंपन्यांवर दगडफेक झाली, त्यात मराठा क्रांती मोर्चाची पोरं नव्हतीच. दंगल घडवणारे परप्रांतीयच होते, हेच मी केव्हापासून सांगतोय. मोर्चाला नेतृत्व नाही, त्यामुळेच कुणीही येतोय आणि बदनाम करतोय. पोलिसांकडून समोर आलेली नावे मराठी पोरांची असली तरी, माझ्याकडे आलेल्या रिपोर्टप्रमाणे दंगल घडवणारे परप्रांतीयच आहेत, असे राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.