शनिवार, 26 सितंबर 2009

राज ठाकरे यांना हवीय 'झेड' दर्जाची सुरक्षा

राज ठाकरे यांना हवीय 'झेड' दर्जाची सुरक्षा
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 26th, 2009 AT 10:09 PM


राज ठाकरे

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना यापूर्वी जीवे मारण्याच्या धमकीविषयीची माहिती पोलिसांना देऊनही त्यांना सरकारने 'झेड' दर्जाची सुरक्षा पुरवलेली नाहीच; उलटपक्षी त्यांची पूर्वीची सुरक्षाही काढून घेतलेली आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात या निवडणूक कालावधीत राज्यभरातील प्रचारदौरे व सभांसाठी त्यांची सुरक्षा पूर्ववत "झेड' दर्जाची करावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी राज्यपालांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. सद्यस्थितीत त्यांच्यासोबत दौऱ्याच्या वेळी कुठल्याही प्रकारचे सशस्त्र पोलिस सुरक्षा रक्षक नसल्याचेही, या पत्रात नमूद केले आहे.
राज ठाकरे यांची सुरक्षा पूर्वसूचना न देताच काढून घेणे, वारंवार मागणी करूनही त्यांना ती परत बहाल न करणे, मुंबईतील जातीय-धार्मिक दंगली, बॉम्बस्फोट अशा घटनांच्या वेळी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याची सुरक्षा व्यवस्था कमी न करता राज ठाकरे यांचीच सुरक्षा काढून घेणे यात त्यांचे खच्चीकरण करणे किंवा राजकीय पक्षाची खेळी तर नाही ना, अशी शंकाही मनसेने या पत्रातून व्यक्त केली आहे.