कोर्टानेच सांगावे सभा कुठे घ्यायच्या - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Thursday, May 06, 2010 AT 12:15 AM (IST)
मुंबई - आजपर्यंत अनेक राजकीय सभा आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचा साक्षीदार असलेले शिवाजी पार्क सायलेन्स झोन करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले. शिवाजी पार्कला ऐतिहासिक महत्त्व आहे. जर येथे राजकीय सभा घ्यायच्या नाहीत, तर न्यायालयानेच आता आम्हाला सांगावे सभा कुठे घ्यायच्या, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकाविले आहे; तर शिवाजी पार्कचा आवाज बंद करणे म्हणजे महाराष्ट्राचा आवाज बंद करण्यासारखे आहे, असे ठाम मत शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केले; तसेच सायलेन्स झोनची बंदी उठविण्याबाबत राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दुरुस्ती याचिका करण्याची मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष गोपाळ शेट्टी यांनी केली.
शिवाजी पार्कला सायलेन्स झोन करणे हे आता अति होत आहे. जर शिवाजी पार्कवर राजकीय पक्षांना मज्जाव केला, तर सभा कुठे घ्यायच्या? ज्यांच्या सभांना गर्दी होत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे; पण आमचे काय? असा थेट सवालही राज ठाकरे यांनी केला आहे. गिरगाव चौपाटीवर सभा नाही, आता शिवाजी पार्कवर सभा नाही. हे फक्त मैदान नव्हे, या मैदानाला राजकीय इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राचा "मंगल कलश' याच मैदानात आणला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या अनेक सभा इथेच झाल्या होत्या, याचे स्मरणही राज ठाकरे यांनी या वेळी करून दिले. राजकीय सभा रस्त्यावर घेतल्या, तर तेथे वाहतूक ठप्प होते. मग नक्की कुठे सभा घ्यायच्या ? मी सुद्धा शिवाजी पार्कचा नागरिक आहे. त्यामुळे येथील लोकांच्या भावना चांगल्या माहीत आहेत. मैदानावर होणाऱ्या सततच्या कार्यक्रमांमुळे मुलांना खेळण्यासाठी मैदान मिळत नाही, ते बरोबर आहे. त्यासाठी मैदानावरील कार्यक्रम कमी करा. निवडणुकीच्या काळातच फक्त राजकीय पक्षांना सभेची परवानगी द्या, असे मार्ग काढता येतील; पण ही बंदी घातली, तर आम्ही कुठे जायचे? खासगी हॉस्पिटलच्या आवारातही सायलेन्स झोन आहे, असेही त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
शिवाजी पार्क मैदान कार्यक्रमासाठी जे नाममात्र दराने देण्यात येते त्याचे भाडे वाढवा. मैदानाचे भाडे वाढविल्यास मुंबई महापालिकेलाही त्यातून महसूल मिळू शकतो. राजकीय पक्षांना त्यांच्या सभांसाठी 2 लाख रुपये डिपॉझिट जमा करण्याची अट घाला, मग कोणीही उठसूठ या मैदानावर राजकीय सभा घेण्यास तयार होणार नाही, अशी भूमिकाही राज ठाकरे यांनी मांडली.
आवाज बंद होईल - राऊत
शिवाजी पार्कचा आवाज बंद करणे म्हणजे महाराष्ट्राचाच आवाज बंद करण्याचा प्रकार आहे. न्यायालयाला शांतता हवी आहे ते ठीक आहे, न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर राखतो; पण न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केलेच पाहिजे असे नाही, असे मत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मांडले.
शिवाजी पार्क व शिवसेना यांचे एक वर्षांनुवर्षांचे भावनिक नाते आहे. ते नाते कदापि तुटणार नाही, असे स्पष्ट करतानाच राऊत म्हणाले, की शिवसेनेचा दसरा मेळावा आता कसा होणार, असा प्रश्न काही जणांना पडला असेल; पण काहीही झाले, तरी शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच, कारण हा फक्त शिवसेनेचा मेळावा नव्हे, तर महाराष्ट्राचा उत्सव आहे. या मेळाव्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राजकीय एकतेचे दर्शन होते, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचा आवाज कोणी बंद करू शकत नाही. जो कोणी शिवसेनेचा आवाज बंद करील त्याविरुद्ध शिवसेनेलाही न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
दुरुस्ती याचिका करावी - शेट्टी
उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शिवाजी पार्कवर सर्वच राजकीय पक्षांच्या पूर्वनियोजित सभा वर्षांनुवर्षे पार पडत आहेत; तसेच निवडणुकीच्या कालावधीत सर्वच राजकीय पक्ष शिवाजी पार्कवर सभा भरवून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ व सांगता करीत असतात. म्हणून राज्य सरकारने न्यायालयाच्या नजरेत या बाबी आणून देणे महत्त्वाचे आहे. सरकारने याबाबत त्वरित दुरुस्ती याचिका दाखल करावी, अशी मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष गोपाळ शेट्टी यांनी केली आहे.
दाद मागावी - बाफना
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते मदन बाफना म्हणाले, की शिवाजी पार्क हे राजकीय सभा-संमेलनांचे ऐतिहासिक स्थान आहे. या मैदानावर होणाऱ्या सभा आणि संमेलने ऐतिहासिक ठेवा म्हणून जपली जातात. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासात शिवाजी पार्कवरील सभांचे अनन्यसाधारण योगदान आहे. केवळ राजकीय सभाच नव्हे, तर महाराष्ट्राला भूषणावह ठरतील अशी संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवाजी पार्कवरून महाराष्ट्राला दिशा आणि विचार देण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. शिवाजी पार्कचे हे महत्त्व ओळखून राज्य सरकारने वरिष्ठ न्यायालयात दाद मागावी. या मैदानाला "सायलेन्स झोन' जाहीर करणे उचित नाही.
बाजू मांडावी - दलवाई
शिवाजी पार्कला इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राचे रणशिंग याच मैदानावर फुंकले गेले. कामगार व राजकीय लढे याच मैदानावर लढले गेले. शिवाजी पार्कला राजकीय महत्त्व आहे. मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात याबद्दल योग्य व समर्थपणे आपली बाजू मांडली नाही. म्हणून पालिका व राज्य सरकारने आता आपली बाजू योग्य प्रकारे सर्वोच्च न्यायालयात मांडावी, असे मत कॉंग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.