गुजरातमध्येही राज यांचा मराठी बाणा
राजेश मोरे - सकाळ वृत्तसेवा
Thursday, August 04, 2011 AT 05:00 AM (IST)
अहमदाबाद - गुजरातमध्ये सुरू असलेल्या
विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी सरकारी दौऱ्यावर आलेल्या
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
मात्र, त्याच वेळी काही बाबतीत महाराष्ट्र मागे पडताना दिसत असला तरी
औद्योगिक आदी क्षेत्रात महाराष्ट्र अद्याप पुढेच आहे, असे सांगून त्यांनी
आपला मराठी बाणाही जपला.
राज यांच्या दौऱ्याबाबत गुजरातमध्येही
प्रचंड उत्सुकता आहे. मुंबईत भाजपच्या जवळ जाण्याचे एक पाऊल म्हणूनही या
दौऱ्याकडे पाहिले जात आहे. तसेच केवळ महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या
कारभारावर टीका करण्यासाठी राज गुजरात दौऱ्यावर जात असल्याचे म्हटले जात
होते; पण स्थानिक वार्ताहरांनी वारंवार विचारणा करूनही राज यांनी
दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारवर टीका टाळली.
ते
म्हणाले, आजच्या घडीला देश पातळीवर विकासाकडे वेगाने जात असलेले राज्य
म्हणून गुजरातकडे पाहिले जात आहे. मलाही नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर
आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली नवनवीन योजना गुजरातमध्ये सुरू करण्यात आल्या
आहेत. महाराष्ट्राचा विकास हा माझा ध्यास आहे, गुजरातमधील विकास
प्रकल्पांची पाहणी करतानाच येथील सरकार आणि नोकरशहा हातात हात घालून कसा
कारभार करतात, याबद्दल आपणास उत्सुकता असल्यानेच आपण गुजरातमध्ये आलो
असल्याचे राज यांनी सांगितले.
सरदार पटेल यांच्या स्मारकाला आणि
साबरमती आश्रमला भेट दिल्यावर आपल्याला काय वाटले, असा प्रश्न उपस्थित
केल्यावर महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांनी देश जोडण्याचे काम केले. मीही
देश तोडण्याचे काम कधीही केले नाही असे राज म्हणाले. माझ्या तोंडची
वाक्ये तोडून-मोडून दाखविल्याने वेगळे चित्र निर्माण होते. आजही तुमच्या
भाऊगर्दीत साबरमती आश्रम नीट पाहता न आल्याने पुन्हा सवडीने येणार असल्याचे
ते पत्रकारांना उद्देशून म्हणाले.
हिंदीमध्ये संवाद महाराष्ट्रात
राज यांनी नेहमीच मराठीचा आग्रह धरला आहे. अगदी राष्ट्रीय
वृत्तवाहिन्यांना ते मराठीतच बाईट देतात. अशा वेळी गुजरातमध्ये ते कोणत्या
भाषेत संवाद साधतात याबद्दल उत्सुकता होती; मात्र महाराष्ट्रात केवळ मराठी
या आपल्या भूमिकेत अद्याप बदल झाला नसून आता गुजरातमध्येही आलो असल्याने
हिंदीत संवाद साधत आहे, असा खुलासा राज यांनी केला