राज हळवा आहे... मित्रांबाबत जरा जास्तच!
अतुल परचुरे
Sunday, August 07, 2011 AT 05:45 AM (IST)
राज आणि माझी मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. मी रुपारेल कॉलेजमध्ये होतो, तेव्हा राज तिथं भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करायला यायचा. त्या काळात आम्ही मित्र झालो. 1984 -85 चा तो काळ होता. चित्रपट आणि संगीत या दोन गोष्टींमुळं आम्ही जवळ आलो. राजनं एखाद्याला आपला मित्र मानलं की मानलं. मग त्यात कुठलाही अडसर येऊ शकत नाही.
राजनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तेव्हा मी त्याच्याबरोबर असणार हे त्यानं गृहीत धरलेलं होतं. दोन मित्र जसे एकमेकांशी अनेक बाबी शेअर करतात व एखादी नवीन गोष्ट करताना आपला जवळचा मित्र आपल्याबरोबर असेल, असं गृहीत धरतातच, तसं ते होत. त्यामुळं "मनसे'त मी आहे, यात विशेष काही नाही. माझ्यातील कलाकारावर राजचं प्रेम आहे. मला त्यानं कधी "मनसे'साठी हे कर, ते कर' असं सांगितलं नाही. आमच्यातील मैत्रीत खाणं, जेवणं आणि चित्रपट या विषयांवर नेहमी चर्चा होते. राज एकटा चित्रपटाला कधी जाणार नाही, खायला एकटा कधी जाणारं नाही, त्याला कोणी ना कोणी मित्र बरोबर लागतोच. मग तो काहीजणांना फोन करेल आणि त्यांना घेऊन जाईल.
आम्ही काही रोज एकमेकांना फोन करत नाही; पण जेव्हा केव्हा करतो, तेव्हा केवळ गप्पा आणि गप्पा हे समीकरण ठरलेलं असतं. त्याच्या राजकीय मोठेपणाचं मला कधीही दडपण वाटलेलं नाही. एखाद्दुसऱ्या मित्राबरोबर सुख-दुःखाचे क्षण आपण ज्या सहजतेने शेअर करतो, तसेच राजच्या बाबतीत माझे आहे. मध्यंतरी माझी बायको अमेरिकेला गेली होती, त्या वेळी राजही तेथेच होता. ती न्यूयॉर्कहून मुंबईला यायला निघाली होती; पण तिला तिकिटाच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाली. मी त्याला हे सांगितल्यानंतर त्यानं ती समस्या सोडवली. अर्थात हा एक प्रसंग झाला. असे अनेक प्रसंग मी सांगू शकेन. तो स्वभावानं खूप हळवा आहे आणि मित्रांच्या बाबतीत तर जरा जास्तच.
"वा ! गुरू ' हे माझं नाटक पाहायला तो आला होता. त्यातील शेवटच्या प्रवेशात माझा मोठा संवाद आहे आणि भावनेला हात घालणारी वाक्ये आहेत. ती भूमिका करताना माझ्या डोळ्यांत पाणी येतं. हा प्रयोग पाहिल्यावर मला तो म्हणाला, ""काय रे, हे रडवणारं नाटक.'' त्या प्रयोगानंतर तो बराच वेळ अपसेट होता. आमच्या दोघांचा वीक पॉईंट म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर. त्याचं गाणं हे आमच्यासाठी आनंदाचा ठेवा आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें