गुरुवार, 23 अगस्त 2012

बदलीतून पोलिस खात्याने योग्य बोध घ्यावा- राज

बदलीतून पोलिस खात्याने योग्य बोध घ्यावा- राज
- सकाळ वृत्तसेवा
Friday, August 24, 2012 AT 03:30 AM (IST)


ही बातमी सीडी पानात थोडक्‍यात आणि पुण्यासाठी मुळ स्वरुपात घ्यावी.

'कारभार जमत नसेल तर गृहमंत्र्यांनी राहूच नये'

पुणे- "मुंबईचे पोलिस आयुक्‍त अरुण पटनाईक यांच्या बदलीतून पोलिस खात्याने योग्य तो बोध घ्यावा. गृहमंत्र्यांना जर त्यांच्या खात्याचा कारभार जमत नसेल, त्यांना खाते उमगत नसेल, तर त्यांनी इथे राहूच नये,'' अशी टीका करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचे सांगितले. केवळ इंदू मिलचा मुद्दा उपस्थित करणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते इतर प्रश्‍नांच्या वेळी कोठे असतात, असा सवालही त्यांनी पुन्हा केला.

मुंबईतील विराट मोर्चात ठाकरे यांनी पोलिस आयुक्‍तांच्या बदलीची मागणी केली होती. पटनाईक यांना पोलिस आयुक्‍त पदावरून बाजूला व्हावे लागले. त्यावर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना ठाकरे म्हणाले, ""मोर्चाच्या निमित्ताने लोकांच्या मनात असणारा संताप व्यक्‍त झाला. पोलिस आयुक्‍तांशी माझी व्यक्तिगत दुश्‍मनी नव्हती. आझाद मैदानावर ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली गेली, त्यास तेच जबाबदार होते. महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार झाला; पण पोलिसांना योग्य आदेश दिले नाहीत. त्यामुळे या बदलीतून पोलिसांनी योग्य तो बोध घ्यावा. भविष्यात अशा पद्धतीने वागण्याची कोणाची हिंमत होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. गृहमंत्र्यांना त्यांचे काम जमत नाही हे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी हे खाते सोडून दुसरे खाते घ्यावे.''
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मोर्चाबद्दल दाखविलेल्या सहानुभूतीबद्दल विचारले असता ते म्हणाले, ""सामना किंवा उद्धव काय म्हणाले यापेक्षाही अशा परिस्थितीत आपापसांतील मतभेद विसरून सर्व बाजूंनी दबाव आणणे आवश्‍यक आहे.''

इंदू मिलबाबत केलेल्या वक्‍तव्यावरून रिपब्लिकन पक्षाने केलेल्या निषेधाचा समाचार घेत राज ठाकरे म्हणाले, ""डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेला वाचा, शिका हा संदेश हे लोक विसरलेले दिसतात. मी काय बोललो हे सर्वांनी पाहिलेले आहे. महाराष्ट्रात एवढे प्रश्‍न असतात त्या वेळी हे नेते कोठे असतात? प्रत्येक वेळी इंदू मिलचे नाव घ्यायचे. ती जमीन केंद्र सरकार देणार आहे. ती यांच्या हातात दिली जाणार नाही. त्या ठिकाणी सरकार स्मारक बांधणार आहे. चार टाळकी घेऊन हे लोक रस्त्यावर येतात. यांना त्यांच्या समाजातील लोकांचाही पाठिंबा नसतो. महाराष्ट्रातील जनतेचा "आयक्‍यू' चांगला आहे. त्यामुळे मला काय म्हणायचे हे त्यांना नीट समजले आहे.''

आमदार अबू आझमी यांच्यावर कोणतेही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. टोलबाबत पुन्हा आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज म्हणाले...
- आर. आर. पाटील यांच्याऐवजी टग्याने हे खाते हातात घ्यावे.
- नवीन पोलिस आयुक्‍त सत्यपालसिंह यांची सदिच्छा भेट घेणार.
- पटनाईक यांना भेटलो; पण ते कॅंटीनच्या सुविधेबद्दलच बोलले.
- घुसखोरांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा

बुधवार, 22 अगस्त 2012

राज यांचे शक्तिप्रदर्शन

राज यांचे शक्तिप्रदर्शन
-
Thursday, August 23, 2012 AT 04:00 AM (IST)


प्रक्षुब्ध जनभावनेला व्यक्त होण्याची संधी देत राज ठाकरे यांनी निष्क्रिय सरकारला धारेवर धरले. पण, मूळ प्रश्‍न पोलिस दलाच्या एकूण अपयशाचा आहे, हे विसरता येणार नाही.

आसाम आणि म्यानमारमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मुस्लिम संघटनांच्या पुढाकाराने आझाद मैदानात जमलेल्या जमावाने पोलिस आणि प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींवर केलेल्या अनपेक्षित हल्ल्याचा आणि हिंसाचाराचा मुंबईकरांना किती मोठा धक्का बसला, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला मिळालेल्या प्रतिसादावरून साऱ्या जगासमोर आले. चौपाटी आणि आझाद मैदानामध्ये या मोर्चासाठी जेवढे लोक जमले; त्यापेक्षा कित्येक पट मुंबईकरांनी टीव्हीसमोर बसून तेथून या निदर्शनात आपला सहभाग नोंदविला. खरे तर, पोलिस यंत्रणेवर झालेल्या हल्ल्यानंतर जनभावनेला आश्‍वस्त करण्याचे, जनमानसाची समजूत काढण्याचे आणि झाल्या घटनेच्या विश्‍लेषणाला दिशा देण्याचे काम राज्यातील सरकारचे, म्हणजे "पृथ्वीराजां'चे होते. पण, कसोटीच्या क्षणी तलवार म्यान करून दुसऱ्याकडे बोट दाखविणारे नेतृत्व ते करू शकत नाही. तेव्हा विरोधी पक्षातून "राज'सारख्यांवर ती जबाबदारी येऊन पडते. अस्वस्थ, अशांत, प्रक्षुब्ध जनभावनेला व्यक्त होण्याची वाट करून देऊन संबंधितांना इशारा देण्याची ही जबाबदारी राज ठाकरे यांनी योग्यवेळी पार पाडली. त्यामुळे त्याला मुंबईकरांनी एकमुखी पसंती दिली. राज्यात सत्तेवर असलेले लोकशाही आघाडीचे सरकार सुंदोपसुंदीत, परस्परांचे पाय ओढण्यात मग्न असल्याने आणि त्यात खुद्द नेतृत्वाचाच पुढाकार असल्याने हतबल, निष्क्रिय आणि निष्प्रभ सरकारला राज ठाकरे खणखणीत इशारा देऊ शकले. जनमानस नेमके ओळखण्याची आणि तरंगत्या जनभावनेवर स्वार होण्याची आपली क्षमता राज यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदादाखवून दिली.

मुस्लिमांच्या संघटनांनी आयोजित केलेल्या निदर्शनांना निषेधार्ह हिंसक वळण लागल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आणि तोच राजकीय कार्यक्रम असलेले राजकीय पक्ष दुसऱ्या बाजूने पुढे येतील, अशी अपेक्षा होती. पण, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, या दोन्ही पक्षांनी आपापल्या अंतर्गत मर्यादांमुळे केवळ अस्तित्व दाखविण्यापुरते कार्यक्रम केले. शिवसेनेने राजकीय अजेंडा आणि आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठीच या घटनेचा उपयोग करून घेतला. अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे अस्तित्व पत्रक काढणे आणि फार तर आझाद मैदानातच पत्रकार परिषदा घेण्यापुरते असल्याने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेच या सर्व पक्षांच्या आणि संघटनांच्या अनुयायांचे लक्ष होते. राज यांनी त्यांची अपेक्षा पूर्ण केली. आक्रस्ताळी हिंदुत्वनिष्ठ भूमिका घेऊन राजकीय लाभ उठविण्यापेक्षा त्यांनी समंजस आणि वास्तववादी भूमिका घेतल्याने मुंबईतल्या वातावरणातील ताण निवळला. मुस्लिम संघटनांच्या अनुयायांनी घातलेल्या हैदोसानंतर तशाच अरेरावी पद्धतीने इशारे देणे अवघड नव्हते. पण, तसे केल्याने मुंबईतील वातावरण अधिक अशांत होण्याखेरीज काहीच झाले नसते. गणपतीपासून दिवाळीपर्यंत येणाऱ्या साऱ्या सणासुदीवर त्याची कायमची अशुभ छाया राहिली असती. ती टाळून, घडलेल्या घटनेची गंभीर दखल मुंबईकरांनी घेतली आहे, हे दाखवून देत त्यांनी संबंधितांना योग्य तो इशाराही दिला. तमाम मुस्लिम जनसमुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यापेक्षा उपऱ्या, बांगलादेशी घुसखोरांनी येथे सामाजिक तेढ वाढविण्याचे उद्योग चालविले आहेत, त्यांना लगाम घालण्याचे आवाहन त्यांनी सुरक्षा यंत्रणेसह मुस्लिम समाजालाही केले. त्यांच्या भूमिकेवर त्यामुळेच फारसे आक्षेप घेतले गेले नाहीत. हिंसाचाराबद्दल सर्व बाजूंनी मुंबईचे पोलिस आयुक्त अरूप पटनायक यांना टीकेचे लक्ष्य केले गेले आहे. राज यांनीही तेच केले. वास्तविक, हिंसाचार झाल्यानंतर हाताळल्या गेलेल्या परिस्थितीपेक्षा तो घडण्यापूर्वीच नेस्तनाबूत करण्यामध्ये पोलिस दलाला अपयश आले, ही गंभीर बाब आहे. पण, अंडरवर्ल्डमध्ये जेवढे गॅंगवॉर नसेल; तेवढे ते पोलिस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर सुरू आहे, हे आता सर्वश्रुत आहे. ते आता उफाळून आले आहे आणि त्यात पटनायक यांचा बळी मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. त्यातून केवळ पटनायक किंवा गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याच खांद्यावर सगळी जबाबदारी टाकणे सोयीचे असले, तरी धोकादायक आहे. त्या दिवशी जे घडले; त्याला केवळ या दोघांचे अपयश कारणीभूत नाही, हे मनात सगळ्यांनाच कबूल आहे. ते जाहीरपणे स्वीकारून आता त्यापेक्षाही गंभीर अशा पोलिस दलाच्या एकूण अपयशाचीच चिकित्सा केली गेली पाहिजे. पोलिस कॉन्स्टेबलपासून निरीक्षकांपर्यंत सगळ्यांचाच बेफिकीरपणा दूर करण्याचे उपाय शोधले नाहीत, तर अशा घटना पुनःपुन्हा घडत राहतील. पटनायक-आरआर आबा बदलले गेल्याने त्यात फरक पडणार नाही, हे नीट समजून घेतले पाहिजे



मंगलवार, 21 अगस्त 2012

Raj Thackeray speech at Azad Maidan against August 11 violence





आधी बांगलादेशी घुसखोरांना हाकला- राज ठाकरे

आधी बांगलादेशी घुसखोरांना हाकला- राज ठाकरे
- सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, August 21, 2012 AT 04:30 PM (IST)
राज ठाकरे यांचे सरकारला आवाहन; गृहमंत्री, पोलिस आयुक्‍तांच्या राजीनाम्याची मागणी


मुंबई- आझाद मैदानावरील 11 ऑगस्टच्या हिंसाचारात बांगलादेशी मुस्लिमांचा सहभाग होता. हिंसाचाराच्या ठिकाणी सापडलेला बांगलादेशी पासपोर्ट हा त्याचा धडधडीत पुरावा आहे. तो पासपोर्ट दाखवितानाच, "आधी या बांगलादेशी घुसखोरांना हाकला,' असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (मंगळवारी) राज्य सरकारला केले.

आसाम आणि म्यानमारमधील मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याच्या निषेधार्थ मुंबईत 11 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात झालेल्या मुस्लिम संघटनांच्या हिंसक निदर्शनांना राज ठाकरे यांनी गिरगाव ते आझाद मैदान असा निषेध मोर्चा काढून जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर जाहीर सभेत, बांगलादेशी भारतात येऊन दंगली घडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करताना उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधून मुंबईत येणारे मुस्लिम समाजातील काही समाजकंटक महाराष्ट्रात अशा प्रकारच्या हिंसक घटना घडवून आणण्यात पुढाकार घेत असल्याचा संशय राज यांनी व्यक्‍त केला.

"कोणत्याही घटनेचा निषेध करण्याची एक सीमा असते. रझा अकादमीच्या निदर्शनात सर्व सीमा ओलांडून महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचे धाडस निदर्शकांनी केले. पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला केला, प्रसारमाध्यमांना लक्ष्य केले. यापुढे महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना चालणार नाहीत. महाराष्ट्र हा माझा धर्म असून, या महाराष्ट्रात पोलिस आणि प्रसारमाध्यमांवर हल्ले करण्याचे धाडस यापुढे कुणी केल्यास याद राखा,' असा खणखणीत इशारा राज ठाकरे यांनी या सभेत दिला.

या वेळी राज यांनी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, मुंबईचे पोलिस आयुक्‍त अरूप पटनायक यांच्यावरही टीकेची तोफ डागली. पाटील, पटनायक यांना थोडीशी जरी लाज असेल; तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रझा अकादमीवर राज यांनी हल्लाबोल केला. तीन वर्षांपूर्वी भिवंडी दंगलीत दोन पोलिसांना ठार मारण्यात आल्याचा दाखला देत राज ठाकरे यांनी आझमी आणि रझा अकादमी यांना टीकेचे लक्ष्य केले. भिवंडीमध्ये आमदार आझमी यांनी भडकाऊ भाषणे केल्यानेच ही दंगल घडल्याचा आरोप राज यांनी केला. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या हिंसक घटना वारंवार घडवून आणल्या जात असतानाही रझा अकादमीच्या मोर्चाला परवानगी मिळतेच कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दलित नेत्यांना कानपिचक्‍या
मुंबईतील हिंसाचाराचे पडसाद लखनौमध्ये उमटले. त्या मोर्चात सहभागी झालेल्या समाजकंटकांनी गौतम बुद्धांच्या प्रतिमेची विटंबना केली. त्यावर मायावती, प्रकाश आंबेडकर, गवई, रामदास आठवले यांनी चकार शब्द काढला नाही. त्या वेळी या नेत्यांचे दलितप्रेम कुठे गेले होते, असा सवाल करीत, केवळ इंदू मिल, इंदू मिल करीत हे नेते ओरडतात, असा टोला राज यांनी लगावला.

राज म्हणाले...
- भारतात येऊन दंगली घडविण्याचा बांगलादेशींचा प्रयत्न.
- काही परप्रांतीय समाजकंटकांचाही हिंसक घटनांत पुढाकार.
- महाराष्ट्र हा माझा धर्म. पोलिस, प्रसारमाध्यमांवर हल्ले केल्यास याद राखा.
- रझा अकादमीच्या मोर्चाला परवानगी मिळतेच कशी?

-------------------------------------------------------------
राजीनाम्याचा प्रश्‍नच नाही
आमदार हर्षवर्धन जाधव यांनी चार पोलिसांना मारहाण केली होती. त्यात दोन महिला पोलिस जखमी झाल्या होत्या. त्या वेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी औरंगाबादला सभा घेतली होती. या सभेत पोलिसांना मारहाण करणाऱ्या मनसे आमदाराचे त्यांनी समर्थन केले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी काढलेला आजचा मोर्चा हे निव्वळ राजकीय भांडवल करण्यासाठीचा आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्‍नच नाही.
11 ऑगस्टला काढलेल्या मोर्चात हिंसाचार करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई सुरू आहे. राज यांचा मोर्चा अडविता आला असता. मात्र, मुंबईत शांतता राहावी, यासाठी त्यांना पोलिसांनी अडविले नाही.
- आर. आर. पाटील, गृहमंत्री
-------------------------------------------------------------
राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने हा उपक्रम हाती घेतला; ते मला आवडले. कोणी तरी हे करायला हवे होते. समाजविघातक प्रवृत्तींनी सीमा ओलांडली होती.
- प्रीतिश नंदी
-------------------------------------------------------------
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विकासाचे राजकारण जमत नाही. त्यामुळे राज यांनी मनसेचा झेंडा गुंडाळून ठेवून पुन्हा शिवसेनेचा भगवा खांद्यावर घ्यावा.
- माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेस
-------------------------------------------------------------
मुंबई पोलिसांच्या अब्रूची लक्तरे काढली जात आहेत... हा अन्याय पचविणे अशक्‍य आहे. राजकारण बाजूला ठेवू. राज यांचा मुद्दा अतिशय योग्य आहे.
- निखिल भिर्डीकर (वाचक)
-------------------------------------------------------------
कॉन्स्टेबलकडून राजना गुलाबपुष्प
मनसेने आज आझाद मैदानात काढलेल्या मोर्चाला पोलिसांचाही मूक पाठिंबा असल्याचे चित्र दिसले. पोलिसांचे मनोधैर्य वाढविणे, हाही मोर्चाचा हेतू असल्याचे जाहीर करण्यात आले. जाहीर सभेनंतर पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद तावडे यांनी व्यासपीठावर जाऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांना गुलाबपुष्प दिले. दंगलखोरांनी विनयभंग केलेल्या पोलिसदलातील माता-भगिनी आणि मारहाण झालेल्या सहकाऱ्यांच्या वतीने आल्याचेही तावडे यांनी माध्यमांना सांगितले.

"जे होईल, त्याची पर्वा नाही'
""यापुढे आपले काहीही झाले तरी पर्वा नाही'' असे वक्तव्य तावडे यांनी केले. ""सीआयएसएफच्या जवानांशी झालेल्या हाणामारीचे प्रकरण सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यावर पोलिस आयुक्त पटनायक यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. एवढेच नव्हे, तर आयुक्तांनी "तू जास्त शहाणा आहेस' असे म्हणत माझा अपमान केला,'' असे गाऱ्हाणे तावडे यांनी मांडले. त्यानंतर त्यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले.



Raj Thakre Speech Aazad Ground pt3





Raj Thakre Speech Aazad Ground pt2


महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघाल तर खबरदार

महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघाल तर खबरदार!
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 21, 2012 AT 04:30 PM (IST)
मुंबई- महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघाल तर खबरदार. महाराष्ट्राकडे वाकडा डोळा करून बघायची हिंमत कुणी करणार नाही, अशी मराठी माणसाची ताकद दिसायला हवी, असे भावनिक आवाहन करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांच्यावर सडकून प्रहार केला. मनसेने आज (मंगळवार) गिरगाव चौपाटीवरून आझाद मैदानापर्यंत विशाल निषेध मोर्चा काढला होता. त्यानंतर आझाद मैदानावर राज ठाकरे यांनी सभा झाली. सभेला लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले,""लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याची, सभा घेण्याची आम्हाला परवानगी दिली जात नाही. दुसरीकडे रझा अकादमीचा इतिहास बघितला तर त्यांच्या प्रत्येक मोर्चात हिंसाचार झाला आहे. तरीही त्यांना आझाद मैदानासारख्या भागात परवानगी दिली जाते. मुख्यमंत्र्यांशी बोलल्यावर आम्हाला परवानगी दिली, ही कोणती लोकशाही? आर. आर. पाटील म्हणतात, की जो कुणी कायदा सुव्यवस्था मोडेल त्याला बघून घेऊ. परंतु, मुंबईत हिंसाचार झाला तेव्हा पाटील कुठे गेले होते? तेव्हा त्यांनी कठोर कारवाई का केली नाही?''

राज म्हणाले,""या हिंसाचारात पोलिसांचे खच्चीकरण झाले आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग झाला, पोलिसांना मारहाण झाली तरी कारवाईचे आदेश देण्यात आले नाही. उलट हिंसाचार करणाऱ्या व्यक्तीला पकडणाऱ्या उपायुक्त दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अरुप पटनायक लोकांसमोर झापतात. जर पोलिसांचे असेच खच्चीकरण सुरू राहिले तर लोकांनी कुणाकडे जायचे. मी हिंदुत्वाचा पुरस्कार करीत नाही. मला केवळ महाराष्ट्र धर्म समजतो. पोलिसांवर हात टाकणारा कुठल्याही धर्माचा असतो, त्याला फोडून काढलेच पाहिजे.''

राज म्हणाले,""आर. आर. पाटील आणि अरुप पटनायक यांचा राजीनामा मागण्यासाठी आणि हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आम्ही मोर्चा काढला आहे. पोलिसांना आणि प्रसार माध्यमांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आम्ही एकत्र उभे राहिलो आहोत. जेव्हा अशा घटना घडतील तेव्हा याच ताकदीने उभे राहायचे आहे. मी जेव्हा केव्हा तुम्हाला हाक देईल तेव्हा तुमचा मला असाच पाठिंबा राहील, अशी आशा करतो.''

भाषण झाल्यावर कॉन्स्टेबल प्रमोद तावडे या पोलिसाने व्यासपिठावर जाऊन राज ठाकरे यांना गुलाबपुष्प भेट दिले. त्यानंतर बोलताना तावडे म्हणाले, की मला कारवाईची भीती नाही. मी स्वयंस्फूर्तीने हे पाऊल उचलले आहे. राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी मी व्यासपिठावर आलो होतो.

सोमवार, 20 अगस्त 2012

मुंबईत मोर्चा काढणारच

मुंबईत मोर्चा काढणारच
- सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, August 21, 2012 AT 12:09 AM (IST)

मुंबई - 'पोलिसांची परवानगी मिळो अथवा न मिळो उद्या (ता. 21) आझाद मैदानातील हिंसाचाराच्या विरोधातील मनसेचा मोर्चा निघणार म्हणजे निघणारच,' असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) सरकारला दिले. "मोगलाईप्रमाणे कार्यकर्त्यांच्या गाड्या अडविण्याचा प्रयत्न केल्यास झालेल्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी सरकारने ठेवावी,' असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, राज यांच्या इशाऱ्यानंतर रात्री आठ वाजता पोलिसांनी आझाद मैदानावरील सभेस परवानगी दिली; मात्र गिरगाव ते आझाद मैदान या मोर्चाला परवानगी नाकारली.

मनसेच्या मोर्चासाठी आझाद मैदानात व्यासपीठ उभारणीचे काम सुरू असल्याचे ठाकरे यांनी "कृष्णकुंज'वर पत्रकार परिषदेत सांगितले. रझा अकादमीने आझाद मैदानात आयोजित केलेल्या निदर्शनात हिंसाचार झाला. त्याचा निषेध करण्यासाठी मनसेने गिरगाव ते आझाद मैदान या मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी मनसेने पोलिसांची परवानगी मागितली होती.

गिरगाव चौपाटीवर कोणताही कार्यक्रम घेण्यास न्यायालयाची मनाई असल्याचा दावा पोलिसांनी केला असला, तरी "आपण न्यायालयाचा निर्णय वाचलेला आहे, या निर्णयात चौपाटीवर "गॅदरिंग' करण्यास मनाई आहे. आपण येथे "गॅदरिंग' करण्यासाठी जमणार नसून, अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळावा, या मागणीसाठी जमा होणार आहोत,' असे ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास परिमंडळ एकचे उपायुक्‍त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आझाद मैदानात मनसेला सभा घेण्यास परवानगी दिली असल्याचे सहपोलिस आयुक्‍त (कायदा व सुव्यवस्था) रजनीश शेठ यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत सांगितले. ही परवानगी देताना मनसेला नव्याने अर्ज करण्यास पोलिसांनी सांगितले होते. मनसेच्या अर्जावर सोमवारी रात्री निर्णय झाला आणि त्यांना सभा घेण्यास परवानगी देण्यात आली. या सभेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त असेल. सभेला सुमारे एक लाख मनसैनिक अपेक्षित असल्याचे मनसेच्या वतीने पोलिसांना सांगण्यात आल्याचे समजते.