मुंबई - लखनभैया बनावट चकमक प्रकरणी
न्यायालयाने पोलिसांना सुनाविलेल्या जन्मठेप प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण
सेना (मनसे) पोलिसांना पूर्णपणे पाठिंबा देणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज
ठाकरे यांनी आज (शनिवार) स्पष्ट केले.
छोटा
राजनचा हस्तक असलेल्या रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैयाच्या बनावट चकमकीच्या
खटल्यात दोषी ठरलेल्या 13 पोलिसांसह 21 जणांना मुंबई सत्र न्यायालयाने
जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पोलिस अधिकारी प्रदीप शर्माच्या पथकाने 11
नोव्हेंबर 2006 रोजी लखनभैयाला वर्सोव्यात नाना-नानी पार्कमध्ये बनावट
चकमकीत ठार केले होते. मात्र, शर्माच्या विरोधात पुरेसा पुरावा नसल्यामुळे
त्यांची न्यायालयातून सुटका झाली. चकमकीचे नेतृत्व तत्कालीन पोलिस निरीक्षक
प्रदीप सूर्यवंशीने केले होते. शिक्षा झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांनी
राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
याविषयी बोलताना
राज ठाकरे म्हणाले, ''पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. राज्य सरकारने
पोलिसांच्या पाठीशी उभे रहाणे गरजेचे आहे. लखनभैया हा साधुसंत नव्हता. या
प्रकरणी आम्ही पोलिसांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यांना आम्ही सर्वप्रकारची
मदत करू. या प्रकरणातून सर्व पोलिस सुखरूप बाहेर पडून पुन्हा कामावर रुजू
होतील अशी माझी इच्छा आहे.''
राजचा पोलिसांना पाठिंबा
| |
शनिवार, 20 जुलै 2013 - 12:27 PM IST
| |