-
Thursday, January 31, 2013 AT 01:00 AM (IST)
शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून पुन्हा एकदा संघटनेची सूत्रं आपल्या हाती घेतल्यानंतर लगोलग "सामना' या मुखपत्राला दिलेली मुलाखत बघता उद्धव ठाकरे यांनी थेट वडलांच्या पावलावर पाऊल टाकून वागायचं ठरवलेलं दिसतं! अन्यथा, त्यांनी अप्रत्यक्षरीत्या राज ठाकरे यांना "आवतण' दिलंच नसतं. अर्थात, आता हे आवतण आहे की नाही, याची चर्चा मीडियामध्ये प्रदीर्घ काळ सुरू राहील! पण बाळासाहेबांची नेमकी हीच पद्धत होती. "सामना'मध्ये मुलाखत द्यायची आणि त्यात वादग्रस्त विधानं करून जनमानसात गोंधळ उडवून द्यायचा, त्याच वेळी प्रसारमाध्यमांनाही मोठं खाद्य पुरवायचं आणि सारा प्रकाशझोत आपल्यावरच राहील, अशी काळजी घ्यायची... हे सारं उद्धव यांनी थेट त्याच पद्धतीनं केलं आहे.
अर्थात, शिवसैनिकांसाठी त्या पलीकडचा एक मुद्दा आहे आणि तो म्हणजे उद्धव-राज पुढच्या निवडणुकीआधी एकत्र येतील काय? बाळासाहेबांच्या निधनापूर्वी आणि त्यांच्या अंत्ययात्रेला लोटलेल्या अलोट गर्दीनंतर हाच प्रश्न चर्चेत होता. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा तपशिलात जाऊन विचार केला, तर आकडे असं सांगतात की राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवसेनेचं बरंच नुकसान केलं. एवढंच नव्हे, तर राज यांची सेना मैदानात नसती, तर कदाचित शिवसेना-भाजप युतीच्या हाती राज्याची सत्ता जाण्याची शक्यताही निर्माण झाली असती. बाळासाहेबांच्या निधनानंतर केवळ शिवसैनिकच नव्हे, तर मराठी माणसाच्या अन्य गट-समूहांमध्येही एका वेगळ्या प्रकारानं विचार सुरू झाला आहे, हे कोणी नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या आजारपणाच्या शेवटच्या काळात आणि विशेषत: त्यांच्या निधनानंतर, अंत्ययात्रेच्या वेळी "मातोश्री'कडून राज यांच्या झालेल्या अवहेलनेच्या आणि अवमानाच्या ज्या काही बातम्या आल्या होत्या, त्या बघितल्या तरीही आता बदलत्या परिस्थितीत राज नव्याने काही विचार करणारच नाहीत, असं समजण्याचं काहीच कारण नाही.
पण यामुळे आता लगोलग "मनसे' विसर्जित करून राज हे शिवसेनेत दाखल होतील आणि पुन्हा तीच तथाकथित अभेद्य शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा "फोर्स' म्हणून उभी राहील, असं तर्कट लढवून कोणी राजकारणाचा विचार करू लागेल, तर ते मूर्खांच्या नंदनवनातच वावरत आहेत, असंच म्हणावं लागेल. तरीही या संदर्भात महाराष्ट्रातलंच एक ठळक उदाहरण देता येतं. सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवार यांनी 1999 मध्ये कॉंग्रेसमधून हकालपट्टी ओढवून घेतली. पुढे विधानसभेची निवडणूक त्यांनी कॉंग्रेसच्या विरोधात लढवली; पण कोणाचंच सरकार बनू शकलं नाही. तेव्हा अनेक पवारविरोधक, आता ते शिवसेना-भाजप युतीशी हातमिळवणी करतील, अशी भाकितं करत होते; पण पवारांची सेक्युलॅरिझमवरची श्रद्धा अधिक होती. त्यांनी कॉंग्रेसबरोबर जाणं पसंत केलं आणि सरकार बनवलं. एवढंच नव्हे, तर पुढच्या निवडणुका या दोन कॉंग्रेसनी जागावाटप करून लढवल्या. याचा अर्थ ते दोन्ही पक्ष एकमेकांत विलीन झाले, असा लावायचा का? उलट आजमितीला हेच सत्ताधारी आघाडीतील दोन पक्ष खऱ्या अर्थानं एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे उद्धव यांच्या या जाहीर आवतणानंतर भाजप राज यांच्याशी बोलणी करण्याबाबत नव्यानं पुढाकार घेऊ शकतो. नव्यानं म्हणायचं कारण एवढंच, की राजसेनेनं युतीत यायला हवं, ही भाजपची जुनी भूमिका आहे. गोपीनाथ मुंडे यांनी तर राज युतीत असतील, असं फार पूर्वीच जाहीर केलं आहे. पण राज यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं आजवर टाळलं आहे. उद्धव आणि राज, दोघांनाही आपल्या मर्यादा ठाऊक आहेत. शिवाय, आपण कोणत्याही कॉंग्रेसबरोबर कधीही जाऊ शकत नाही, हे राज यांना ठाऊक आहे. त्यामुळे सत्तेचा वाटा मिळावा म्हणून उद्धव यांच्या या "आवतणा'चा विचार करून, राज यांनी काही पावलं उचलली तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगं काहीच नसेल. पण असा काही निर्णय त्यांनी घेतलाच, तर त्यातून आणखी अनेक कठीण आणि सहजासहजी न सुटणारे प्रश्न निर्माण होऊ शकतात, हेही लक्षात घ्यावं लागेल.
आज युतीतील जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला विधानसभेच्या 171 जागा आल्या आहेत, तर भाजपकडे 117 आहेत. दोन वर्षांपूर्वी या युतीत रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष दाखल झाला आहे. त्यात राज आलेच तर त्यांच्यासाठी किती जागा सोडायच्या, त्या नेमक्या कोणी म्हणजे शिवसेना व भाजप यांनी किती सोडायच्या... त्यासाठी नेमक्या कोणत्या निवडणुकीतील मतांचे आकडे हे आधार धरायचे, हे सारं अत्यंत कठीण आणि कोणत्याही "गाईड'मध्ये उत्तरं नसलेले प्रश्न आहेत. अर्थात, त्याची उत्तरं आपल्याला द्यायची नाहीत, हे एक बरं आहे. ती ज्याला द्यायची आहेत, तो देईल की "वेट ऍण्ड वॉच'चा आपला जुनाच डाव पुढे सुरू ठेवील, हाच लाखमोलाचा प्रश्न आहे. पण एक मात्र खरं, की आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातही राजकारणाची रणधुमाळी सुरू झाली आहे