शनिवार, 17 अप्रैल 2010

मराठमोळ्या सुगरणीसाठी मनसेची शोधमोहीम

मराठमोळ्या सुगरणीसाठी मनसेची शोधमोहीम
सकाळ वृत्तसेवा
Sunday, April 18, 2010 AT 12:00 AM (IST)


मुंबई - मराठी संस्कृतीचे संवर्धन आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील संघर्षाचा नारा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता 11 कोटी लोकांच्या जिव्हेवर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीच्या संवर्धनाचा आणि तिच्या प्रचार-प्रसाराचा वसा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसेच्या महिला सेनेने मराठमोळ्या सुगरणीच्या शोधाची मोहीम हाती घेतली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने मुंबईतील 36 विभागांत येत्या 20, 21 व 22 एप्रिल रोजी महिलांसाठी पाक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की मनसेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचा प्रसार करण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून सर्वोत्कृष्ट मराठमोळ्या सुगरणीचा शोध घेतला जात आहे. सर्वसामान्य महिला तसेच गृहिणींच्या पाकगुणांना वाव मिळावा असाही हेतू यामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या सुगरणींनी तयार केलेल्या पाककृतींची चव नामवंत शेफ चाखून बघतील. त्यानंतरच विजेत्यांची निवड होणार आहे. प्रत्येक विभागातून सर्वोत्कृष्ट पाककृती बनविणाऱ्या पाच महिलांना पारितोषिक देण्यात येईल. प्रत्येक विभागात प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या महिलांचा समावेश पाक स्पर्धेच्या अंतिम फेरीत करण्यात येईल, अशी माहिती मनसेच्या उपाध्यक्षा रिटा गुप्ता यांनी दिली.

अंतिम फेरीतील विजेत्या महिलांना शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते सीडी, गृहोपयोगी, इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे व रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुनेत्रा जाधव यांच्याशी 9769350302 किंवा 24333799 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बुधवार, 14 अप्रैल 2010

मनसेच्या चार आमदारांचे निलंबन मागे घेणार?

मनसेच्या चार आमदारांचे निलंबन मागे घेणार?
सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 15, 2010 AT 12:00 AM (IST)


मुंबई - समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना विधिमंडळात चोप दिल्याने निलंबनाला सामोरे जावे लागलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार आमदारांविरुद्धचे निलंबन या अधिवेशनात मागे घेतले जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

मनसेचे आमदार शिशिर शिंदे, राम कदम, वसंत गीते व रमेश वांजळे यांना चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर काही वेळातच ही कारवाई झाली होती. हिंदीतून शपथ घेणाऱ्या आझमी यांनी मराठीतूनच शपथ घ्यावी, यासाठी मनसेच्या आमदारांनी सभागृहात अभूतपूर्व गोंधळ घालत, अबू आझमीला सभागृहातच चोप दिला होता.

निलंबन मागे घ्यावी, अशी विनंती मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केली होती. परंतु अशा अभूतपूर्व गोंधळानंतर अध्यक्षांनी कारवाई मागे घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे या चारही आमदारांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशन व सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होता आले नाही. हिवाळी अधिवेशनातही या चार आमदारांनी निदर्शने करून निलंबन मागे घेण्याची मागणी केली होती. चारही आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, यासाठी मनसेकडून मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांकडे सातत्याने विनंती सुरू आहे. महसूल मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातूनही निलंबन मागे घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांनी याबाबत काही प्रमाणात अनुकूलता दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. चौघांचे निलंबन याच अधिवेशनात मागे घेण्यासाठी मनसेच्या अन्य आमदारांचा विशेष प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच ठराव मांडून मनसेच्या चार आमदारांचे निलंबन मागे घेतले जाणार असल्याचे विधान भवनाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.