रविवार, 27 फ़रवरी 2011

'राज ठाकरे म्हणजे पकपक करणारी कोंबडी!'

'राज ठाकरे म्हणजे पकपक करणारी कोंबडी!'
सकाळ वृत्तसेवा
Monday, February 28, 2011 AT 12:15 AM (IST)
 
मुंबई - ""मराठीसाठी हे मी केले... मी ते केले, अशी कोणीही कितीही बोंबाबोंब करीत असले, तरी मराठी माणसांची "विच्छा' शिवसेनेनेच पूर्ण केली आहे. काही मंडळी घरी बसून आम्हीच मराठी माणसांची विच्छा पूर्ण केली, अशी पकपक करीत आहेत; पण कोंबडी जशी अर्धे अंडे घातल्यानंतर पकपक पकपक करते, तशीच ही मंडळी म्हणजे पूर्ण अंडे न घालता पकपक करणाऱ्या कोंबड्या आहेत, असा सणसणीत टोला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेनेने आयोजित केलेल्या मराठी भाषा दिनाचा शानदार सोहळा आज पार पडला. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेनेने मराठीसाठी काय केले ते जगाला ओरडून सांगा, लोकांनाही कळू द्या की आम्ही काय करतो ते, असे आवाहन करतानाच त्यांनी या वेळी एक उदाहरहण दिले. समुद्रात मासे शेकडो अंडी घालतात, काही मरतात, तर काही अंडी जगतात; पण मासे अंडी टाकतात, हे मात्र कोणाला दिसत नाही. यापेक्षा उलट कोंबडीचे आहे. कोंबडी एकच अंडे घालते; पण अर्धे अंडे दिल्यावरच तिची पकपक सुरू होते. त्याचप्रमाणे मराठीसाठी आपण हे केले, ते केले असे सांगणारी मंडळी म्हणजे पकपक करणारी कोंबडी आहे. आम्ही अंडी घालण्याचे काम करीत नाही; पण जेव्हा "त्यांचा' जन्म झाला नव्हता तेव्हापासून आम्ही मराठी भाषा व मराठी अस्मितेसाठी काम करीत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना त्यांनी प्रयत्न केल्यामुळे तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, याचे स्मरण करून देताना ठाकरे म्हणाले, ""मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यासाठी मी स्वतः राष्ट्रपतींची भेट घेईन. पंतप्रधानांनाही भेटेन. मराठी भाषेसाठी कुठलेही आंदोलन करण्यास शिवसेना तयार आहे.'' महाराष्ट्रात मराठी भाषा दिन साजरा करण्याची राज्य सरकारची इच्छा नाही. या सरकारला मराठी दिनाचा विसर पडला आहे. हे मुख्यमंत्री महाराष्ट्रात मराठी दिन नाही, तर इटालियन दिन साजरा करणार आहेत? असा टोलाही त्यांनी मारला. मुंबई ही मराठी माणसांचीच आहे, मराठी माणासांची राजधानी आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी मुंबईत वारकरी भवनाची निर्मिती केली, त्याचप्रमाणे आता मुंबईतच "मराठी भवन' उभारणार, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केला.

बाहेरून आलेली माणसे जैतापूर प्रकल्पाला विरोध करीत असल्याचे सांगण्यात येत आहे; पण आताचे मुख्यमंत्री फक्त सोनिया गांधींच्या घरात पाणी भरत आहेत. हे स्वतः त्यांना मुजरा करतात. त्या तुम्हाला आपल्या घरच्या वाटतात का? बाहेरचा व घरचा ठरविणारे तुम्ही कोण? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

या वेळी शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी प्रास्तविक केले; तर महापौर श्रद्धा जाधव, मनोहर जोशी यांची भाषणे झाली. शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी सूत्रसंचालन केले.

राज ठाकरे उपटसुंभ - मनोहर जोशी
मराठीसाठी पहिला लढा चार दशकांपूर्वी प्रथम शिवसेनेनेच दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच सभेत दादर रेल्वेस्थानाकातील सर्व पाट्या मराठीतच झाल्या पाहिजेत, असे आवाहन केल्यानंतर या पाट्या मराठीतच दिसू लागल्या, याचे स्मरण करून देताना शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला मारला. ते म्हणाले, पण सध्या मात्र काही उपटसुंभ मराठी-मराठी आम्हीच केले, असे सांगत आहे. आम्हाला मात्र तसे सांगायची गरज नाही.