अण्णांच्या 'कोर्टात' राज ठाकरेंची 'खास याचिका'
विश्वास देवकर
Wednesday, July 06, 2011 AT 12:30 AM (IST)
वेध : उत्तर महाराष्ट्र
राज्य भ्रष्टाचाराने बरबटले आहे, त्यामुळे लोकपाल राहू द्या, महाराष्ट्राकडे लक्ष द्या, असे अण्णा हजारे यांना आवाहन करतानाच अजित पवार व छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्यास "मनसे' हजारेंना पाठिंबा देईल, असा पवित्रा मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये घेतला आणि साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. अर्थात, राज ठाकरे महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून काहीही बोलले तरी सारा महाराष्ट्र हेच त्यांच्या भूमिकांचे "टार्गेट' असते. गेल्या आठवड्यात असेच लक्षवेधी टार्गेट राज ठाकरेंनी "अचिव्ह' केले आहे. नाशिकमध्ये येऊन हजारे, पवार व भुजबळ यांच्यासंदर्भात भाष्य करून ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीचा खास ठाकरी शैलीत "राज'कीय फायदा उठविला, असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र व एकूणच देशपातळीवर सध्या अण्णा हजारे हे लोकांचे लक्ष वेधून घेणारे व्यक्तिमत्त्व ठरले आहे. एरवी लोक, विशेषतः युवा पिढी राज ठाकरेंच्या वागण्या-बोलण्यावर फिदा होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून मात्र प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून माध्यमांसह सर्वांनाच हजारेंनी भुरळ घातल्याचे दिसत आहे. इतकी की महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर जाऊन थेट राजधानी दिल्लीवर स्वारी करत हजारेंनी भ्रष्टाचाराच्या, लोकपालाच्या मुद्यावर सारा देश हलवून सोडला आहे. त्यामुळे सध्या जणू फक्त हजारे फॉर्म्युल्याचीच चलती आहे, राज ठाकरेंनाही हजारेंच्या फॉर्म्युल्याची दखल घ्यावी लागली आहे. मराठी अस्मिता असो वा महाराष्ट्राचे अन्य प्रश्न, राज ठाकरे महाराष्ट्राबाबत आक्रमक असतात. असे असतानाही लोकपाल राहू द्या, महाराष्ट्राकडे लक्ष द्या, असे हजारेंना सांगण्याची वेळ राज ठाकरेंवर का आली, असा प्रश्न नाशिकमध्ये विचारला जात आहे. अजित पवार व छगन भुजबळ यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्यास आपण हजारेंना पाठिंबा देऊ, या राज ठाकरेंच्या वक्तव्याने सामान्य माणसाच्या मनात "अरे राज ठाकरे या स्वतःचा करिश्मा असलेल्या युवा नेत्याला हजारेंच्या कोर्टात याचिका सादर करण्याची वेळ का आली', असा प्रश्न पडला आहे. एरवी महाराष्ट्रात रस्त्यावरच्या आंदोलनात काहीही घडवायचे असेल तर केवळ राज ठाकरे, ही "मनसे' भावना बळावत असताना ठाकरेंना हजारे का हवेत, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. अर्थात, नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंना आपला "राज'गड अभेद्य करायचा आहे. बाळासाहेब हेच आपला विठ्ठल असे मानणारा हा वारकरी अस्वस्थ झाला, तेव्हाही नाशिकमध्येच आला होता. आपल्या अस्वस्थतेचा हुंकारही त्यांनी याच भूमीत दिला, बंडाचा झेंडाही नाशिकमध्येच फडकावला आणि पक्ष मोठा करण्यासाठीची व्यूहरचनाही ते अनेकदा नाशिकमध्येच रचतात. त्यासाठी नाशिकमध्ये मोक्याच्या जागेवर कॉर्पोरेट चेहरा असलेले कार्यालय त्यांनी आता थाटले आहे. मात्र, त्यानिमित्ताने झालेल्या मेळाव्यातच हजारेंना पाठिंब्याची तयारी दाखविणे म्हणजे "राज'गडाला हजारेंच्या आंदोलनाची कुबडी हवी आहे की काय, असा प्रश्न त्यांचे विरोधक विचारू लागले आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर राज ठाकरे असो वा अण्णा हजारे, कोणीही बोलले तरी सामान्य माणसांच्या संवेदनाच यानिमित्ताने जाग्या होतात. ज्यांना "राज'कारण करायचे असेल त्यांनी जरूर करावे, त्या गदारोळात सामान्य माणसांच्या भावनांचे राजकारण करू नये, हीच अपेक्षा